— अजिता पणशीकर —
संतापाने त्याचा आवाज टिपेला गेला होता. हातातला कॉफीचा कप त्याने खाली ठेवला.
“का, का, सहन करायचं मी हे सतत? नेहमी माझ्यावरच अन्याय होत गेला. सगळेजण आपल्याला वाट्टेल तसं वागत गेले, आणि….आणि मला मात्र नेहमीच मन मारून रहावं लागलं, वाळीत टाकलं गेलं. म्हणूनच मी ठरवलं तुम्हा सर्वांना पासून खूप दूर निघून जायचं, आणि वीस वर्षांपूर्वी स्वीडनला – एका अज्ञात देशात – निघून गेलो. कोणी माझी धड विचारपूससुद्धा केली नाही.”
“काय कमाल आहे तुझी! इतक्या वर्षांनी माझ्या घरी आला आहेस आणि ते ही जाब विचारायला? तू, तू सहन केलंस? अरे, आम्ही काय भोगलं ते माहिती तरी आहे का तुला? देश सोडून गेलास, पण यातना मागे ठेवून गेलास. घरासाठी एकटे बाबा राबत होते. खूप हलाखीचे दिवस काढले आम्ही सर्वांनी. आईच्या जीवाला घोर लावून आणि मनाला टोचणी देऊन गेलास.” समोरच्या खुर्चीवर बसलेली त्याची बहीण सुचेता तितक्याच उद्वेगाने म्हणाली. आईसारखीच उंच आणि रेखीव होती ती.
सतीश नकळत येरझारा घालत म्हणाला, “माझं सारं बालपणच शापित होतं. एकही आनंदाचा प्रसंग आठवत नाही मला! दादा माझ्याहून फक्त दोन वर्षांनी मोठा, पण सदा आई-बाबांना धमकावणं, त्यांच्याकडून भांडून पैसे घेणं, वाईट संगतीत राहून नसते धंदे करणं, पोलीस दारात येतील इतका दंगा करणं… माझ्याकडे पहायला कुणाला वेळच नव्हता! मीही मोठा होत होतो. माझ्यापरी आई-बाबांना मदत होईल असं वागूनही, माझं कधीच कौतुक झालं नाही. ही आई…आई कसली म्हणा… कौतुक तर सोडाच, माझ्याकडे साधं लक्षही दिलं नाही तिने”, सत्तरीच्या आईकडे रागारागाने पहात सतीश म्हणाला. ती खोलीच्या दुसऱ्या टोकाला बसून बहीण-भावांमधील हे संवाद खिन्न होऊन ऐकत होती. जीवनाचा चित्रपट झरझर डोळ्यांपुढून जात होता; आत अनेक खपल्या निघत होत्या.
“अरे, मी तर तुझ्याहून १२ वर्षांनी लहान… मग मी काय म्हणायचं माझ्या बालपणाबद्दल? तुम्हा दोघांपेक्षा मी बरीच छोटी असून मलाच मोठं व्हावं लागलं लवकर.” सुचेताच्या जुन्या भीतिदायक आठवणी, ज्या मनाच्या कप्प्यात खोल दडपून टाकल्या होत्या, त्या जाग्या झाल्या. पण तिने लगेच स्वतःला सावरलं. सतीशची गार झालेली कॉफी परत गरम करून त्याच्या हातात दिली. आज तिला ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच होता, कितीही कटू सत्य ऐकावं, बोलावं लागलं तरीही. दादा आणि बाबा तर केव्हाच ह्या जगातून निघून गेले होते. उरलेल्या ह्या भावाशी तरी सख्य असावं असं खूप प्रकर्षानी वाटत होतं. इतरांच्या भावंडांच्या गप्पा-गोष्टी ऐकल्या की नकळत मनात कळ उठत असे. का आपल्याला नशिबी एवढं साधं सुख नसावं?
सतीशच्या बोलण्याने ती भानावर आली. “तुझं लहानपण? मला स्पष्ट आठवतंय…कोपऱ्यात उभी राहून, कानावर घट्ट हात दाबून, जोरात किंचाळत रहायचीस तू. बाजूचा आरडाओरडा ऐकू येऊ नये म्हणून! आठवलं की मनाचा थरकाप होतो. तुझ्या चिंतेने अस्वस्थ होतो. वाढत्या वयातल्या अनुभवांची भुतं माझ्याभवती अजून पिंगा घालतच आहेत नं? “
सुचेताला आश्चर्य वाटलं. ह्याच्या मनात आपली काही आठवण असेल, आपल्याविषयी एवढी काळजी असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. तशी समजून घ्यायची संधी त्यांनी एकमेकांना कधी दिलीच नव्हती.
“मग का तू असा निघून गेलास, देशातूनच नाही तर आमच्या आयष्यातूनही? दादाकडून तर काही अपेक्षाच नव्हती. उधळपट्टी करत तो गावोगाव भटकला, आणि असाच एकदा निघून गेला. तो गेल्याचं दुःख करावं की हायसं वाटून घ्यावं हे ही कळेना आई- बाबांना! तू स्वार्थीपणे आपलंच आयुष्य जगलास, चिक्कार पैसे कमवूनही घराला हातभर लावला नाहीस. आपुलकीने नुसती चौकशीही केली नाहीस! तुझ्या कुटुंबालाही आमच्या जवळ येऊ दिलं नाहीस. काय मिळवलंस रे ह्या सगळ्यांतून?”
“खरं सांगायचं तर वंदना अनेकदा मला ‘मुलांना घेऊन भारतात जाऊया. तिथे तुझ्या आईला, बहिणीला, तिच्या कुटुंबाला भेटूया’ म्हणायची…पण माझी कधी इच्छाच नाही व्हायची….पूर्वीचं सर्व आठवून मन विषण्ण व्हायचं. आईने माझं लग्न तेवढं एका गुणी मुलीशी लावून दिलं; त्याबद्दल मात्र मी तिचा ऋणी आहे”, सतीशने प्रांजळपणे कबुल केलं. ह्या बाबतीत तो अगदी बाबांवर गेला होता.
आईला आनंदात ठेवायचा सुचेता अनेक वर्ष प्रयत्न करत होती; त्यात बऱ्याच प्रमाणात ती यशस्वीही झाली होती. पण एखाद्या काळ्या सावलीप्रमाणे ते सुखही कुठेतरी झाकोळलं जायचं. दादाच्या निधनाची आणि सतीशच्या दूर जाण्याची जखम कधीच भरून निघाली नव्हती. “माझ्या हयातीत मला ह्या दोघांना एकदा तरी एकत्र आलेलं बघायचंय” ही तिची आंतरिक इच्छा होती.
शब्दाला शब्द वाढतील, पण दरी मिटणार नाही हे सुचेताला जाणवत होतं. सतीशच्या मनातल्या अढीचा पीळ फारच घट्ट होता. सुचेताने त्याला बोलत राहू दिलं, अगदी रितं होऊ दिलं, तिला सर्व पटत नव्हतं तरीही! मग अचानक एक वेगळाच विचार मनात आला, आणि ती म्हणाली, “आईची चूक वाटते नं तुला ह्या सगळ्यांत? ती तुझी माफी मागेल, एकदा नाही, दोनदा नाही, चांगली दहादा मागेल….आई ये गं, तू ती मागितलीच पाहिजे.” आत्तापर्यंत भावनेचा प्रवाह पाहत असलेली आई पुढे आली. तिच्या चालण्याची लकब कित्ती त्याच्या छोट्या सोनालीसारखी होती!
हवालदील होऊन आई सतीशला म्हणाली, “आम्ही दोघे तुमच्या दादामुळे खूप त्रासलेले होतो रे, आला दिवस कसाबसा जगत होतो, तुम्हाला जगवत होतो,… त्यात माझ्याकडून दुर्लक्ष झालं तुझ्याकडे, मुद्दाम केलं नव्हतं …. खरंच माफ कर मला, मनातून माहित होतं की मी कुठेतरी कमी पडते आहे … तुला देखील वेळ द्यायलाच हवा होता राजा. खूप खूप चुकलं, मनापासून क्षमा मागते रे तुझी”, हळुवारपणे सतीशच्या खांद्यावरून, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली.
त्या स्पर्शाने, त्यातल्या साठवलेल्या मायेने, सतीश हेलावला. त्याला रडू आवरेना. “थांब आई, नको अजून माफी मागूस. वयाने, मानाने माझ्याहून कितीतरी मोठी असून, न कचरता तू क्षमा मागते आहेस. तुझं माझ्यावर प्रेम असल्याखेरीज हे करताच आलं नसतं. आपल्या भावना आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात, पण त्याच जेव्हा आपल्याला गिळून टाकतात तेव्हा आपण, आपण रहात नाही, कुणीतरी वेगळॆच होऊन जातो…माझंही तसंच झालं. तुमचा त्रास मला दिसला नाही, इतका मी रागाने आंधळा झालो की आयुष्य विषारी केलं – स्वतःचं आणि तुमचंही. तुझा स्पर्श आज खूप काही बोलून गेला.” हळव्या झालेल्या आईला जवळ घेत सतीश म्हणाला.
आत्तापर्यंत लांब उभी असलेली सुचेताही सतीशच्या आणि आईच्या जवळ आली. संध्याकाळच्या उन्हाची एक तिरीप दारातून आत येत होती. वातावरणातील तणावाने हळूच काढता पाय घेतला. कित्येकदा अप्रिय विषय, भांडण-तंटे नको म्हणून आपण बोलणं टाळतो खरं, पण त्याने नात्यांचा गुंता सुटत नाही, उलट वाढतच जातो. माफी मागणं आणि ती ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी, सतीशच्या इतक्या वर्षांच्या जखमांवर फुंकर घालायला, अलगद मलम लावायला, गरजेच्या होत्या हे सुचेताला कळलं होतं. पण त्याची किमया मनापासून आलेल्या सहज स्पर्शाने दाखवून दिली!
त्या पुढच्या आठवड्यातील वास्तव्यातला सतीश हा आमूलाग्र बदलेला होता. जसे काही आत साचलेली वाफ हवेत अगदी विरून गेली होती. एक तरलपणा आला होता – त्यांच्या सर्वांच्या नात्यांत, आणि ओघानेच, त्यांच्या गप्पात, त्यांच्या हसण्यात, आणि त्यांच्यातल्या शांततेतही! आईच्या बाजूला सोफ्यावर बसून त्याचं गप्पा मारतांनाचे दृश्य पाहिलं आणि सुचेताला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. एक मुलगी म्हणून आणि एक बहीण म्हणून ती आज परिपूर्ण झाली होती.
