—शिल्पा धर्माधिकारी—
कुठलीही गोष्ट छान घडण्यासाठीचा प्रवास हा मुळी बिघडण्यापासूनच होतो असा माझा समज आहे . आपण म्हणतो ना की “अपयश ही यशाची पहिली पायरी असते.” अगदी तसंच काहीसं. थोडक्यात काय तर प्रयास महत्त्वाचा, यश कधी ना कधी तरी मिळतंच. मला आठवतं ना, माझा चित्रकला शिकताना, वाघ रेखाटण्याचा प्रवास हा कुपोषित मांजरापासूनच झाला होता.
सारांश काय तर “कुठलीही गोष्ट चांगली जमण्यापूर्वी बिघडलीच पाहिजे. तरच उत्कृष्ट कलाकृती निर्माण होऊ शकते.” असा शोध दुसरं तिसरं कोणीही नाही तर मीच माझ्या पाककलेच्या प्रगतीकडे पाहून लावला.
त्याचं असं बघा, लग्नाआधी माझा आणि स्वयंपाकघराचा संबंध मुळी फक्त खाण्यापुरताच आला. क्वचित प्रसंगी चहा बनवणं किंवा भाजी निवडून, चिरून देणं इतकाच. ह्याचा अर्थ मी लाडाकोडात वाढले असा निश्चितच नाही हं. तर माझा स्वयंपाकातील रस आणि गती ह्या दोन्हींचा परिणाम होता तो. अर्थात मी इतकीही “ढ” नव्हते बरं का. कारण माझी आई पाहुणे आले की कधीतरी मला चहा बनवायला सांगायची. हं चहाचा रंग कधी काळपट तर कधी पांढरा बनायचा एवढंच. पण का कोण जाणे पुढच्या वेळेला तो पाहुणा आला की, “तुमची लेक छानच चहा बनवते हो, पण उगाचच तिला त्रास कशाला देता. असू द्या.” असं म्हणत चहा न पिण्याचा पर्याय स्वीकारायचा. पण नंतर नंतर का कुणास ठाऊक पण पाहुण्यांसाठी आईच चहा करायला लागली. बरं असो.
पण एकदा मात्र, कितीही टाळू म्हंटलं तरी माझ्यावर खाणं बनवायची वेळ आलीच. त्याच झालं असं की, मी साधारण १०वी-१२ वीत असेन. आई बाहरे गेली होती. माझे सख्ख्ये, मामे अशा तीनचार भावंडांची टोळधाड घरी दुपारी ४ वाजता येऊन थडकली. एरवी बाहेर खाऊन येणारे त्या दिवशी मात्र खूप भूक लागली म्हणून माझ्याच हातचं खाण्यासाठी हटून बसले. मला आईचा स्वयंपाकघरातील सुपरफास्ट आणि सराईतपणे असलेला वावर बघून स्वयंपाक काय उजव्या हाताचा मळ असंच वाटायचं. त्याच तोऱ्यात मी त्यांना म्हंटलं , “त्यात काय? मी आत्ता तुम्हाला पोहे करून खायला घालते.” मी १० मिनिटांत मस्त गरम पोहे बनवून त्यांच्या समोरील ताटलीत वाढले. वाढताक्षणीच “टण्ण्” असा आवाज झाला. सगळ्यांनी पटकन चमकून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “हे काय तू पोहे डायरेक्ट डब्यातून कढईत टाकले की काय?” झालं माझं अज्ञान पूर्णतः उघडं पडलं आणि मी सपशेल त्या कच्च्या पोह्यांच्या आवाजासारखी दाणकन तोंडावर आपटले. पण माझ्या पडलेल्या चेहर्याकडे बघत मोठा भाऊ म्हणाला, “दही आण. आम्ही मस्त दह्याबरोबर खातो.” खात खात तो म्हणाला, “वाह! खूपच टेस्टी लागतं आहेत हे. अगं, तू चक्क चक्क नवीन डिश शोधून काढलीस की! यू आर रिअली ग्रेट कूक! ह्याचे नाव आपण “दचिपो” असे ठेवू या का? “दही चिवडा पोहे”. वाह मस्तच!” प्रेमळ भावाने मला सांभाळून घेतलं खरं, पण मी मात्र तेव्हापासून स्वयंपाकाचा धसकाच घेतला. सेकंड इअरला गेल्यावर मात्र “आता हळूहळू स्वयंपाक शिकायला लागं, तेव्हा कुठे तू लग्नापर्यंत काहीतरी बनवायला शिकशील.” असं आई ओरडून सांगू लागली. मग काय मला शिकण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. पण माझी पाककलेतील प्रगती मात्र गोगलगायीप्रमाणे मंदगतीने होत होती.
पुढे लग्न ठरतानादेखील नवर्याने “स्वयंपाक येतो का?” असा प्रश्न विचारला. तेव्हा “तुला उपाशी ठेवणार नाही ह्याची खात्री देते.” असं स्मार्ट उत्तर देत माझं यथातथा असलेलं पाककौशल्य फार कौशल्यानं झाकलं.
“माणसाच्या हृदयात शिरण्याचा मार्ग हा पोटातून जातो.” ही उक्ती लग्न झालेल्यांनाच म्हणजे पूर्णतः आईलाच लागू होते असं मीच ठरवून टाकलं होतं. पण माझ्या लग्नानंतर नवरा आणि त्याचं कुटूंब, यांचा विश्वास आणि हृदयातील स्थान मात्र पाककलेच्या खडतर ( माझ्या दृष्टीने हो!) मार्गातूनच मिळवावं लागणार हे माझ्या लक्षात आलं होतं.
माझा नवरा खवय्या, विविध पदार्थ ट्राय करणारा, तरीही चोखंदळ आणि मी मात्र जेवण म्हणजे “उदरम् भरणम्” ह्या वृत्तीची. पण मग नवर्याला खुश करण्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ बनवायचा सपाटा चालू केला. कधी टिव्ही चॅनलवरून, कधी पाककलेची पुस्तकं वाचून तर कधी शेजारच्या काकूंना विचारून वेगवेगळे पदार्थ बनवू लागले. नोकरीनिमित्याने आम्ही दोघे बाहेर गावी रहात असल्यामुळे सगळे प्रयोग सर्वस्वी नवर्यावर चालायचे. एखादवेळेस पदार्थ चांगला बनला तर घरात खुशीचं वातावरण असायचं. पण त्यावरूनच आपला नवर्याच्या हृदयात शिरण्याचा प्रवास ,खडतर असला, तरी योग्य दिशेने चालला आहे हे लक्षात येऊ लागलं.
मग मी अजूनच जोमाने पण शिस्तबद्ध पद्धतीने, स्टेप बाय स्टेप कुकिंगमध्ये शिरायचे ठरवले. साधे रोजच्या जेवणातले पदार्थ आणि त्यात वैविध्यता अशा सोप्या सोप्या गोष्टींनी सुरवात करायची ठरवली. पाकाच्या पदार्थांना मात्र इतक्यात बिलकुल चिकटायला जायचे नाही असंही मनात पक्क करून टाकलं.
पहिला आठवडा छान जमला. मग भाज्यात वैविध्य म्हणून आई बनवते तशी गवार-गोळा भाजी बनवायचं ठरवलं. रंग, रूप आणि खमंग वास सगळं जमलं. भाजी खूपच टेम्टिंग दिसतं होती. नवर्याची डबा भरून ऑफिसला बोळवणी केली. आता मला भाजी खुणावत होती. नाश्त्यातच पोळीबरोबर तिचा चट्टामट्टा करायचा असं ठरवत खायला सुरवात केली. गवार काय नेहेमीचीच, त्यापेक्षा गोळ्यापासून सुरवात करावी म्हणून गोळा तोडायला घेतला. पण तो पठ्ठया फारच हट्टी, तुटता तुटेना. शेवटी लाटण्याने फोडला. संध्याकाळी ह्याच गोळ्यांनी आप्पारप्पी होणार हे लक्षात आलं. तडक आईला फोन लावला. आई म्हणाली, “अगं बेसनात मोहन घालायला विसरली असशील.” मी, “मोहन?” मग माझा “मोहन” या विषयावर मोठा वर्ग झाला. “मोहन म्हणजे गरम तेल. ते योग्य प्रमाणात पदार्थात घातलं तर पदार्थ छान खुसखुशीत होतो. ते जास्त झालं की पदार्थ विरघळतो आणि कमी झालं की कडक होतो , तुझ्या ह्या गोळ्यासारखा. चकलीलासुध्दा हाच नियम लागू होता बरं का. ”
झालं! मग “मोहन” समजण्यासाठी “चकली” हे माझं पुढचं टार्गेट ठरलं. पण “मोहन” कधी जास्त तर कधी कमी ह्या चक्करमध्ये दळून आणलेलं पार किलोभर पीठ संपल. चकल्यांचे काही तुकडे तर काही अखंड असे करत माझा चकल्या बनवायचा पहिला प्रयोग कसाबसा पार पडला.
“तुकडे किंवा सहज तुटणार्या चकल्याच दे आणि उरलेल्या खाली मुलांना फ्रीझबी म्हणून खेळायला दे. किंवा आर्मीमध्ये आजच्या काळातील सुदर्शनचक्र म्हणून पण कामी येऊ शकतील नाही?” इति पतीदेव. मला खरंतर खूप राग आला होता. पण फोकस ढळू द्यायचा नाही असं मनाला समजावत प्रयत्नपूर्वक शेवटी चकलीवर विजय मिळविलाच.
आता माझी हिम्मत वाढली होती. आईला “पाकाकडे वळू का?” असं विचारल्यावर ती म्हणाली, “खूप घाई होती आहे हं. आताच नको. अनायसा उन्हाळा आहे तर तुला सोपा बिनपाकाच गुळांबा सांगते.”
पाककृती मिळाली. “कैरी आणि साखर मिश्रणाचा गोळा कढईच्या बुडाशी दिसणे ही गुळांबा झाल्याची लक्षणं! मग तडक गॅस बंद करायचा.” ही खास महत्वाची टिप होती.
लागलीच मिशन गुळांबा पूर्ण करण्यासाठी कैर्या आणल्या आणि कामाला लागले. जवळपास १०-१५ मिनिटं झाली तरी कढईच्या बुडाशी गोळा काही दिसेना. शेवटी कंटाळून गॅस बंद केला आणि टीव्ही सिरियल बघायला निघून गेले. ३-४ तासांनी पाहते तर काय, गुळांबा आणि उलतन्याची कढईशी घट्ट मैत्री झाली होती. पण आता अनुभवातून मी शहाणी झाले होते. पाणी टाकून गुळांब्याला पातळ करायचा निर्णय घेतला. गुळांब्याला थोडा काळपट रंग आला होता खरा पण कन्सिस्टन्सी एकदम बरोब्बर! रात्री जेवताना नवर्याच्या ताटात गुळांबा वाढला. हळूच त्याने गुळांबा बोटाने उचलला. बोटाला चिकटला नाही म्हणून त्याने तो सुदर्शनचक्रासारखा फिरवत विचारले,” तुला काय वाटतं की हा पोस्टात गोंद म्हणून कामी येईल का? ” तेव्हा आईच्या “पाकाचे पदार्थ शिकण्यासाठी घाई करू नकोस.” ह्याचा अर्थ कळला. हेही कळलं की “पाक बनवायला” शिकण्यासाठी चिकाटीची फारच गरज असते.
अहो, एकदातर मी आईसारख्या बनवलेल्या पुरणपोळीचे सँपल मावशीला खायला दिले तर माझे भाचे तिला म्हणाले होते, “थांब आजी. थांब. आम्ही तुला ती पोळी तोडायला मदत करतो.” त्यावेळी त्यांनी माझ्याच पाककौशल्यचे पार तुकडे तुकडे केले असं मला वाटलं.
असेच एकदा उकडीचे मोदक शिकत असताना, मोदक पात्रातून मोदक काढायला गेले तर हातात नुसतंच मोदकाचं कवच आलं आणि आत पत्रात डोकावले तर सारणाने मात्र उकडीच्या पाण्यात आत्मसमर्पण केलेलं दिसलं.
असे बरेच बिघडत बिघडत घडत गेलेल्या माझ्या पाककलेच्या सफरीचे किस्से आहेत. लिहायचं ठरवलं तर चांगलं जाडजूड पुस्तक बनेल.
पण शेजारी नवीनच लग्न होऊन रहायला आलेल्या रेणूने खास आज सकाळी येऊन, “काकू, तुम्ही परवा बनवून पाठवलेले गुलाबजाम काय भारी झाले होते हो. अगदी विकतच्यासारखे! मला शिकवाल?” असं विचारले तेव्हा माझ्या पाककलेची २२ वर्षांची सफर सुफळ होते आहे असं वाटून मी हवेत उडायला लागले, तेवढ्यात, “आई, आजची तुझी खीर नेहेमीसारखी नाही जमली.” असे माझ्या मुलाने सांगितल्यावर मी धाडकन जमिनीवर आपटले आणि माझी पाककौशल्याची ही सफर अजून पूर्ण सफल व्हायची आहे ह्याची जाणीव झाली.
