–पंकज पंडित–
या विश्वाचे , मी आवर्तन,
ही अवघी अवनी , माझे तन ; या तरु-लता, माझेच श्वसन
सरिता करिती रुधिराभिसरण; वायूचे मी , करिते प्रोक्षण ;
अग्नी उदरी, करीतसे भक्षण; पंच-प्राण करिती औक्षण ,
सर्व चराचर, माझे संकीर्तन; या विश्वाचे, मी आवर्तन (१)
हृदयि वसे, नित्य-नूतन आकाश; त्यात मांडले अवघे घन-अवकाश
तेथेच वसती , सकल सृष्टीचे नि:श्वास आणि नांदते “साक्षीतत्व, अविनाश”
पती-सूर्य एकला, चिरंतन सहचर; परी चंद्र-सखा, माझा चंचल-प्रियकर
ग्रह-नक्षत्रे, करि ऋतू परिवर्तन; या विश्वाचे मी आवर्तन (२)
जीवन होऊनि उर्ध्वपतन, पर्जन्य देतसे पुनर्जीवन,
मेघ होऊनि, बरसे भुवन; वीज कडाडून, देई चेतन,
पुन्हा अंकुरती, लक्ष-लक्ष तर्पण; एक सूर्यबिंब उजळी, प्रत्येक दर्पण
खेळ चालला नित्य निरंतर, परी खेळिया, अदृश्य दिगंतर (३)
या विश्वाचे मी आवर्तन…
हे आहे एका स्त्रीचे आत्मकथन. “स्त्री” रूपाने, बहुप्रसवा निसर्गाला पाहिले आहे.
पहिल्या कडव्यात , निसर्गातील पाचपैकी चार पंचमहाभूत (पृथ्वी,आप,अग्नी,वायू ) पृथ्वी देहाची रूपक आहे तरु-लता श्वसन संस्था चालवितात तर नद्या रक्त अभिसरण करतात. जठरात अग्नी आणि पंच-प्राण, वायुरूपाने, आपल्या शरीरामध्ये स्थानापन्न आहेत
दुसऱ्या कडव्यात, आकाश रूपाने , साक्षी-आत्मतत्व हृदयात वसत आहे हे सांगितले आहे. सूर्य हे चिरंतन आत्म्याचे(पती) तर चंद्र, चंचल मनाचे प्रतीक; म्हणून चंद्राला सखा, प्रियकर म्हंटले आहे. ग्रह, नक्षत्रे आणि बदलते ऋतू हे या वसुंधरेवर आणि आपल्या वैयक्तिक जीवनांत आवश्यक असे बदल घडवतात.
तिसऱ्या कडव्यात, पावसाच्या रूपकाने पुर्नजन्म घडतो अशी कल्पना केली आहे. जीवन म्हणजे पाणी,(रूपक जीवतत्व) वाफ होऊन आकाशात जाते.ढगांतर्फे तप्त भूमीवर बरसते. वीज चमकल्यामुळे, पृथ्वीवर पहिला जीव जन्माला आल्याची आणि सजीव सृष्टी निर्माण झाल्याची एक शास्त्रीय मीमांसा आहे. एक सूर्य बिंब, जसे विखरलेल्या लक्ष आरशात प्रतिबिंब स्वरूपात दिसते, तसेच अदृश्य खेळिया, परम आत्मा, प्रत्येकाच्या जीवनात आपली प्रतिमा बघतो.
असे आहे हे जीवन चक्र; निसर्ग, सृष्टीचा हा खेळ अव्याहत, अनंतापर्यंत चालूच राहणार आहे. मानवी आयुष्य, या वैश्विक जीवन चक्राचा , एक अविभाज्य भाग, विश्वाचा हुंकार आहे.

वाचतांना विचारांची लय जाणवते. चाकोरीबाहेरचा आविष्कार आहे. मला ही कविता आवडली.
धन्यवाद 🙏