मेट्रो मॅन श्रीधरन
(आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ६ एप्रिल २०२५ रोजी रामेश्वरम ते रामनाथपुरम ला जोडणा-या नवीन पंबन पुलाचे उद्घाटन केले आहे त्यानिमित्ताने हा पुस्तक परिचय.)
आंध्रप्रदेश मधील काकीनाडा येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. इंडियन रेल्वे इंजिनीरिंग सर्विसेस ( IERS ) ही परीक्षा ते ७व्या क्रमांकाने पास झाले आणि रेल्वेच्या सेवेत रुजू झाले. टी एन शेषन हे त्यांचे वर्गमित्र, शाळेपासूनच त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाचा विशेष उल्लेख आहे.
ई श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ साली केरळ मधील पलक्कड जिल्ह्यातील कुरकपुथूर येथे झाला. सध्या ते पोनन्नी येथे राहतात.त्यांचे सर्व भाऊ उच्च शिक्षित व मोठ्या हुद्द्यावर काम केलेले आहेत.त्यांचे मोठे बंधू कृष्णा मेनन यांनी शिक्षण व करिअर मध्ये श्रीधरन यांना मार्गदर्शन केले.त्यांचे भाऊ सांगतात की कोणतेही काम योग्य वेळेत व निगराणीने करणे हा श्रीधरन यांचा स्वभाव आहे.माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना मोठ्या बहिणीकडे रहावे लागले. त्यांच्या बहिणीचे पती नारायण मेनन यांच्या आदर्श सवयी , कष्टाळू वृत्ती व मूल्यांनी श्रीधरन यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घातला असे ते आवर्जून सांगतात. शाळेला जाताना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागे तेव्हा त्यांना रेल्वेचे जवळून निरीक्षण करता आले .
१९५८ मधे सर्वात तरुण विभागीय अभियंता (बसवाडा विभाग) बनायचा मान श्रीधरन याना मिळाला. त्यांच्या कामाचा पहिला ठसा म्हणजे पाम्बन पुलाची पुनर्बांधणी !
या कामासाठी त्यांना ३ महिने दिले होते.२३ ऑक्टोबर १९६४ साली समुद्री वादळामुळे त्या काळातील सर्वात जास्त लांबीचा समुद्री पूल (२३४५ मीटर ) उध्वस्त होऊन रामेश्वरम भारतापासून तुटले होते.हा पूल ब्रिटिशांनी १९१४ मधे बांधला होता. या पुलाला १४६ तुळया होत्या, त्या पैकी १२५ वाहून गेल्या होत्या. तुळया निर्मितीचे कारखाने गुजरात व आसाममधे होते.२ दिवस परिसराची पाहणी करून, स्थानिक मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याच मदतीने समुद्र पिंजून काढलाअसता , मिळालेल्या तुळया साफ करून, रंगवून, त्यांना उचलण्यासाठी लागणारी क्रेन स्वतःच रचना करून बांधून घेतली. मप्पीला खलाश्यांच्या मदतीने मुदतपूर्व ४४ दिवस आधी काम पूर्ण केले.ह्यानंतर त्यांची एक प्रतिभाशाली अभियंता म्हणून ओळख झाली. त्यांचाच शब्दात हा ” अभियांत्रिकी कल्पकतेचा विजय ” होता.
अजून एक मला भावलेले काम म्हणजे १९७६ साली श्रीधरन यांनी कोचीन गोदीचे अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला.या गोदीत ” राणी पद्मिनी” या पहिल्या नौकेचे बांधकाम करण्यात आले. या वेळी त्यांना सुसंघटित कामगार संघटनांच्या ताकदीला सामोरे जावे लागले. आधिकारी आणि कामगार यांच्यात व्यावसायिक शिस्त व वेळापत्रकाविषयी आदर व निष्ठा रुजवण्याचे काम प्रथम करावे लागले. ९ फेब्रुवारी १९८० रोजी ही नौका पाण्यात उतरली. याच गोदीतील एका वेल्डरने त्यांचे वर्णन ” सद्विवेकी तंत्राधिकारी ” असे केले आहे.
नोकरीत बदलीचा आदेश आला की विनातक्रार स्विकारण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे भारतभर अनेकवेळा बदल्या झाल्या. १९८७ मधे रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्त होऊन,ते १९९० साली ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. अशा या रेल्वेला ते “प्रचंड कुटुंब ” म्हणून संबोधतात. त्यांच्या मते वाचनाला, स्वतःच्या विचारात गढून जायला रेल्वे प्रवास उत्कृष्ट आहे.
आपल्या सगळ्यांना ते सुपरिचित आहेत ते मेट्रोमुळे! ह्या मेट्रो विषयी जपानमधील आंतरराष्ट्रीय परिषदेमधे सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. यावर आधारित कलकत्ता मेट्रोचा पाया त्यांनी घातला. निवृत्ती नंतरचा कोकण रेल्वेचा प्रकल्प ही तांत्रिक कुशलतेला मिळालेली अवाढव्य कल्पकतेची जोड होय.त्यानंतरची अत्यंत कमी वेळात पूर्ण झालेली दिल्ली मेट्रो.. नियोजित वेळेत काम पूर्ण करणे व कामाच्या वेळेत फक्त कामाचाच विचार करणे हे त्यांच्या यशाचे गमक असावे असे वाटते. कार्यकारी पातळीवरही अधिकाऱ्यांनी ” समाजाच्या भल्यासाठी स्वतःचं कर्म करत राहणे व त्याबरोबरच स्वतःला उत्फुल्ल ठेवण्यासाठीचे मार्ग शोधणे,सर्व संकटाना सामोरे जाऊन कर्तव्यपूर्तीची प्रेरणा मिळावी ” म्हणून ते भगवद्गीता व स्वामी विद्यप्रकाशानंद यांनी लिहिलेला गीतेचा भावार्थ अधिकाऱ्यांना भेट देत असत.
आत्तापर्यंत त्यांना ६० पुरस्कार, १५ सन्माननीय डॉक्टरेट मिळाल्या असून पुरस्कारांची रक्कम त्यांच्याद्वारे दान केली जाते. जगातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य अभियंत्यांमधे त्यांचा समावेश आढळतो.
पारंपरिकतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, स्वतःचा प्रामाणिकपणा, कार्यक्षमता ,सूक्ष्मनिरीक्षण, निडरता, दुसऱ्याच्या गुणांची पारख व कदर करणाऱ्या तसेच भारतीय वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदललेल्या ई. श्रीधरन यांची ही कर्तृत्वगाथा !
मुळ लेखक : एम एस अशोकन
अनुवाद : अवधूत डोंगरे
परिक्षण : वैशाली तोरवी
वैशाली तोरवी

1 thought on “वाचू आनंदे”