शब्दाक्षरी विजेत्यांचे मनोगत
शाळेत असल्यापासून मराठी हा माझा आणि माझ्या नवऱ्याचाही आवडता विषय आहे. मराठी भाषेतल्या गंमतीजमतींवर आधारित कोडी सोडवायला आवडतात. वर्तमानपत्रातलं शब्दकोडं सोडवणे हाही एकेकाळी माझा आवडता छंद होता. शिवाय पुस्तकं वाचण्याची आम्हा दोघांनाही आवड आहे. त्यामुळे ‘शब्दाक्षरी’ स्पर्धेची घोषणा नॉर्थ बंगळूरच्या ग्रुपमध्ये वाचली, तेव्हा आपण या स्पर्धेत भाग घ्यावा, असं वाटलं. पण रोजच्या धावपळीच्या दिनक्रमात त्यावर काही अधिक विचार केला गेला नाही. मात्र अंजली कुलकर्णींनी जेव्हा नॉर्थ बंगळूरकडून स्पर्धेत भाग घेण्यासाठी विचारलं, तेव्हा ही संधी न घालवता पटकन नावं देऊन फॉर्म भरून टाकले.
पहिल्या फेरीसाठी जाताना कशा प्रकारचे प्रश्न असतील याची काहीच कल्पना नव्हती, पण स्पर्धा (खरं तर स्पर्धा म्हटलं, तरी हा खेळच होता.) सुरू झाली आणि थोडे कठीण, आव्हानात्मक, तरीही किचकट नसलेले आणि आनंददायी असे प्रश्न सोडवताना मजा यायला लागली.
पहिल्या फेरीत आमच्यासहित एकूण सहा संघ होते. या फेरीतला आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला राऊंड म्हणजे पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ बघून लेखक ओळखणे. या आणि जवळजवळ सगळ्याच राऊंड्ससाठी वेळेची मर्यादा होती. काही वेळा वेळ पुरेसा होता, पण काही वेळा असं वाटलं की अजून थोडा वेळ मिळायला हवा होता.
आमच्या प्राथमिक फेरीतून आम्ही तीन संघ उपांत्य फेरीसाठी निवडले गेलो. अशाच प्रकारे अजून दोन प्राथमिक फेऱ्यांमधून दोन-दोन संघ उपांत्य फेरीत आले.
उपांत्य फेरीतले प्रश्न प्राथमिक फेरीपेक्षा जास्त कठीण होते.शिवाय नियमही जास्त कडक होते. उदाहरणार्थ, दिलेल्या अक्षराच्या बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावरून किमान एकेक शब्द लिहायचा. असे बाराही शब्द लिहिले, तरच पूर्ण गुण, अन्यथा शून्य! शिवाय वेळेचं बंधन होतंच.
या फेरीतला सर्वात जास्त आवडलेला राऊंड म्हणजे पडद्यावर दाखवलेल्या उताऱ्यावरून ते पुस्तक आणि पुस्तकाचे लेखक ओळखणे आणि त्या लेखकाचं अजून एक पुस्तक सांगणे. खूप मजा आली याही फेरीतल्या सगळ्याच राऊंड्समध्ये.
आता पुढचा टप्पा होता अंतिम फेरीचा. या फेरीसाठी आम्ही समास, अलंकार, संधींचे नियम, विविध पारितोषिकं मिळालेल्या लेखकांची नावं वगैरे आठवतील तशा गोष्टींची जमेल तशी उजळणी करत होतो. पण स्पर्धा उद्यावर आली आणि मला नेमका थोडा ताप आला. मे महिन्यात गावाला जाऊन केलेली धावपळ बहुतेक याला कारणीभूत होती. पण स्पर्धा तर बुडवायची नव्हती. अंतिम फेरी तर नाहीच नाही. त्यामुळे आयोजकांना तसं कळवलं आणि त्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं. याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
अंतिम फेरीचे प्रश्न अपेक्षेप्रमाणे कठीणच होते. जमतील तसे सोडवत होतो. बाकीचे संघही चांगल्या तयारीने आले होते. तीन संघ बंगळूरचे, तर तीन उर्वरित कर्नाटकातले होते. ही फेरी अगदी अटीतटीची झाली.
प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका माधुरी शानभाग आलेल्या होत्या. त्यांचं भाषण अतिशय उत्तम झालं. बक्षीस समारंभाची वाट बघत असताना अगदी शाळेच्या वयासारखी नसली, तरी थोडी धाकधूक होत होतीच! शेवटी आम्हाला पहिलं बक्षीस जाहीर झालं तेव्हा मात्र अगदी शाळकरी वयाची आठवण करून देणारा आनंद झाला!
मात्र, बक्षीस मिळण्यापेक्षाही स्पर्धा खेळण्याचा आनंद किती तरी मोठा होता.
एकंदरीत एका आनंददायी प्रवासाची अशा प्रकारे सुरेख सांगता झाली.
स्पर्धेतले प्रश्न अगदीच सोपे असले तर त्यात काही मजा येत नाही. प्रश्न खूपच कठीण, किचकट असतील तरी मजा येत नाही. शिवाय, स्पर्धा ही fair असायला हवी, कुणाला झुकत़ं माप मिळायला नको. नियम सगळ्याच स्पर्धकांकडून काटेकोरपणे पाळले जातील, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे. तरीही, अति गंभीर वातावरणही नसलं पाहिजे, कारण ही मजेमजेचीच स्पर्धा होती. हे सगळं जमवणं ही अक्षरशः तारेवरचीच कसरत होती. ही कसरत पार पाडल्याबद्दल आयोजकांना शंभरपैकी एकशे एक गुण आम्हा सर्व स्पर्धकांकडून मनातल्या मनात वारंवार दिले गेले हे नक्की!
Vishakha Pandharpure
-x-x-x-x-x-x-x-x-x-x-x-