(शब्दाक्षरी विजेत्यांचे मनोगत)
खरंच किती सुंदर अनुभव! चार मे दिवशी प्राथमिक फेरी…अकरा मे रोजी उपांत्य फेरी… आणि अंतिम फेरी पंचवीस मे… जणू अडथळ्याची शर्यतच..पण किती खेळीमेळीच्या वातावरणात!!!सांगायचं राहिलं.. झूम काॅलवर सराव सुद्धा घेतला हं .. आपल्या स्पर्धकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व बाजूंनी विचार करून आयोजकांनी स्पर्धा भरवली.सर्वप्रथम तोंडभरून कौतुक .
किती, किती प्रकारचे खेळ.अगदी मनात येणारही नाहीत असे.खेळ सुट्टीतला या फेरीमध्ये नाव,गाव, फूल,फळ सांगणे,शाळेनंतर जणू हा खेळ खेळलाच नव्हता …’ल’अक्षरावरुन सांगणं ही आठवण ताजी करून गेली, बोलू घडाघडा,’म’मराठीचा, म्हणी,वाक्प्रचार ,समास, अलंकार सगळा मराठीचा अभ्यास.बेंगळुरू हे तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते याची झलक या स्पर्धेत स्पर्धा सुरू झाल्यापासून दिसतच होती पण मेंटीमीटर या फेरीमध्ये ती ठळक वाटली.किती प्रगल्भता आणि उत्साह.
संपूर्ण नियोजनच जबरदस्त.. स्पर्धा दोघांचीच आहे असं वाटत असतानाच पुन्हा एकेकांचेही परीक्षण. म्हणजे दोघांचाही अभ्यास तपासला गेला…. आणि स्पर्धा झाल्यानंतरही घरी पोहोचला की मेसेज करा .. आपुलकी वाटली हो!!!
अगदी अंतिम फेरीच्या निकालावेळी डाॅ.माधुरी शानभाग यांचे व्याख्यान,छानशी व्हिडिओ क्लिप सगळं म्हणजे सगळं… छान छान!!
आमच्या ज्ञानात भर पडली.मराठीचा अभ्यास पुन्हा झाला.आणि जोडीने खेळल्यामुळे मज्जा,मस्तीही झाली.इतक्या फेरींतून दुसरा क्रमांक मिळाला याचं आम्हाला म्हणजेच ‘कपडे वाळत घालणारी बाई ‘हा काव्यसंग्रह प्रसिद्ध असलेल्या हर्षदा सुंठणकर व मी स्नेहल पोटे ….. दोघीही मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका,वि.गो.साठे मराठी प्रबोधिनीच्या सदस्या .
शब्दाक्षरी स्पर्धेला पुढील वाटचालीसाठी खूप सार्या शुभेच्छा..
स्पर्धक-कुसुमाग्रज गट
हर्षदा सुभाष सुंठणकर व स्नेहल संजय पोटे
वि.गो.साठे प्रबोधिनी बेळगाव
शब्दाक्षरी स्पर्धेतील अंतिम फेरीतील द्वितीय क्रमांक विजेते