वृत्तांत

महानादाचा नाद घुमला केरळमध्ये

‘महानाद’ महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष. मंडळाने घेतलेल्या ढोलताशा कार्यशाळेमुळे वादकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आणि सगळेजण बाप्पाच्या भव्य मिरवणुकीची स्वप्न बघू लागले. त्यांनी नुसती स्वप्न बघितली नाहीत तर ते साकार करण्याची जोरदार तयारी केली. 

          गुढीपाडव्यापासून महानाद गेले अनेक वीकेंड्स गणेशोत्सवाची तयारी करत होते. मिरवणुक जशी जवळ येऊ लागळी तशी आमच्या तयारीने अजूनच वेग घेतला.

          त्यात अनेक ठिकाणाहून फोन आणि चौकश्या चालू असताना इंस्टाग्रामवर Query आली वैकोम – केरळच्या एका गावातून. वैकोम नाव ऐकताच लगेच गूगल सर्च सुरू झाला आणि घेऊ या का ही सुपारी (वादनाची बरं का )अशी चर्चा सुरू झाली. ह्या चर्चेत बाकी ठरलेल्या सर्व मिरवणुका व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी होतीच. ढोल-ताशा पथक बेंगळूरुमध्ये सुरू करून हे तिसरे वर्ष, आत्ता लोकल मॅनेजमेंट हळूहळू उमगायला लागली होती, तेवढ्यात बेंगळूरु बाहेर नाही, तर डायरेक्ट केरळमध्ये जाऊन वादन करायचे. आपण कधी केरळ तर लांबच राहिलं बेंगळूरु बाहेरही गेलो नाही, त्यात इतक्या लोकांना घेऊन जायचंय. आपल्याला ही झेप घेणं शक्य होईल का, ही धाकधूक होतीच. पण मनाशी ठरवून टाकलं की जाऊया आपण. वैकोमच्या बाल गोकुलम शोभायात्रा ह्या उत्सवाचा भाग होण्याची महानादला संधी मिळणार होती. ही जबाबदारी मोठी होतीच, त्या बरोबरच महाराष्ट्राच्या परंपरेचा मान राखणे ही त्याहूनही मोठी जबाबदारी होती.

६ सप्टेंबरला महाराष्ट्र मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन झाले आणि टीम लागली केरळच्या तयारीला. जवळपास ३५ लोक रेल्वेने 13 सप्टेंबर, शनिवारी सकाळी ६ ला वैकोमच्या मोहिमेवर निघाले. संध्याकाळी ५.३० ला एर्नाकुलमला पोहचून टीम वैकोमसाठी निघाली.  ह्या सगळ्यात आदल्या दिवशी लोड केलेले ढोल, ताशे आणि सर्व साहित्य वेळेत वैकोमला पोहचवत आहेत की नाही ह्याची सतत चिंतावाटत होती. काही लोक रात्रीच्या बसने तर काही रविवारी विमानाने येणार होते. वैकोमला पोहचताच पथकाने जेवण करून, फ्रेश होऊन ढोल बांधायला घेतले. ह्यावेळेस थकवा वैगरे असला, तरी तो दूर झटकून द्यावा लागतो. कारण वाद्यांचा मेन्टेनन्स नीट तर वादन नीट!

रात्री १ पर्यंत हे संपवून सकाळी पुन्हा ५ ला उठून ७.३० ला सगळे ३६ जण वैकोम महादेव मंदिरात वादनाला हजर. वैकोम महादेव मंदिर हे जागृत देवस्थान आहे हे आम्हाला खूप लोकांनी सांगितले होतेच आणि ह्या संधीचे सोनं करायची इच्छा महादेवाने पूर्ण केली.        

देवाचे दर्शन घेऊन आम्ही नाश्ता करून पुन्हा तयारीला लागलो. खऱ्याखुऱ्या परीक्षेची वेळ आली होती; ती म्हणजे तब्बल २.५-३ किलोमीटरची मिरवणूक. केरळ मुळातच दमट त्यात इतका वेळ मिरवणूक पण सगळे मावळे आणि हिरकण्या सज्ज होत्या ही खिंड लढवायला.  

          ढोल-ताशे तपासून ४.३० ला सुरू झालेली मिरवणूक रात्री ८च्या आसपास संपली. ह्या मिरवणुकीत महानाद पथक पुढे आणि त्या मागे सगळे कृष्ण आणि राधेच्या वेशात असलेली अगदी लहान ते मोठी मुलं होती. इतके लोक, इतका मोठा सोहsळा आणि त्यात वादन करायचा मान महानादला मिळणे ही त्या महादेवाचीच योजना असणार, कारण आम्ही अजून खरं तर नवखे आहोत. RSS चा कार्यकर्ता आणि त्याचे साथीदार इतके मस्त होते, त्यांची एक टीम आमच्या आसपास होती. खूप लाघवी माणसे. मुळातच गाव छोटे, त्यांना झेपेल अशी पण नीटनेटकी व्यवस्था आणि आदरातिथ्य मनात घर करून गेले. असे अजिबात वाटले नाही की कुठल्या एका संघाचा सोहळा आहे, अख्खा गाव ह्या कार्यासाठी सज्ज होता. ढोलाचे ट्रान्सपोर्टेशन असो, जेवण-पाणी असो किंवा आमचे ट्रान्सपोर्टेशन असो सगळं इतक्या पद्धतशीर करत होते की वाटलंच नाही आम्ही त्या सगळ्यांना पहिल्यांदा भेटलोय. वादनानंतर जो भेटेल तो कौतुक करत होता आणि ह्या मुळे दमलेले मावळे आणि हिरकण्या आनंदात परतीच्या प्रवासाला लागले.

हा असा पहिला वहिला अनुभव महानादचा यशश्वीरित्या पार पडला आणि खूप गोड आठवणी देऊन गेला. ही मिरवणूक इतकी छान होण्यासाठी गाठीला जोडलेली पथकातली सगळी लोक आहेत. ते आहेत म्हणून तर महानादला शोभा आहे.

ध्वज नाचवू अखंड गगनात

झांजेची आहे सुंदर साथ!

ढोल ताश्याच्या गजरात नाहू देत

महानाद असाच अखंड फुलू देत !

विशेष गोष्ट सांगायचीच राहिली…आमचे छोटे मावळे घरी येऊन दुसऱ्या दिवशी परीक्षेलाही गेले. 😊 😊

पूजा जोशी

 

अनुक्रमणिका

1 thought on “वृत्तांत”

  1. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी वैकोम हे गाव तिथल्या मंदिर प्रवेश सत्याग्रहासाठी प्रसिद्ध झाले. यंदा मंडळाच्या महानाद पथकाने तिथे आपला ध्वज रोवून ढोल ताशांची सलामी महादेवाला दिली ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्व चमूचे अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *