वैशाली चौधरी
एकदा मी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करत होते. एकटीच होते आणि त्याकाळी माझ्यासाठी, एकटं जेवणे म्हणजे जेवण न जाणे असे होते. जसं जेवताना चवीला चटणी किंवा लोणचे लागते, तसे मलाही गप्पांचे लोणचे बरोबर असल्याशिवाय घास घशाखाली उतरायचा नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे फोनवर गप्पा मारत मी माझा नाश्ता संपवला आणि नंतर डेस्कवर जायला निघाले.
तेव्हाच एका मैत्रिणीने गाठले, “काय गं?? सकाळी सकाळी इतका वेळ कुणाशी गप्पा मारत होतीस? बॉयफ्रेंड?” डोळे मिचकावत तिने मला विचारले.
मला हसूच आले, “नाही गं. माझ्या आईशी बोलत होते.”
“खोटे नको बोलू. मी तुला बऱ्याचदा असे कॅन्टीनमध्ये आणि इतर ब्रेक्स वेळी असे हसत खिदळत फोनवर बोलताना पहिले आहे,” ती.
“अरेच्या! मग आईशी काय रडत बोलू??” मी.
“तसं नव्हे ग. तू खूप खूश दिसत असतेस फोनवर बोलताना. आणि इतका वेळ काय बोलतेस ग आईशी? कुणालाही वाटेल कि बॉयफ्रेंडशी बोलत असावीस ते. बरं ठीक आहे, बॉयफ्रेंड नसेल तर निदान बेस्टफ्रेंड?” तिला काही केल्या पटेना.
“अगं कसं सांगू तुला आता?? मी आईशीच बोलत असते. आणि माझी आईच माझी बेस्टफ्रेंड आहे असे समज. आणि इतका वेळ, मी तिला दिवसभराच्या घडामोडी सांगत असते. आपले ऑफिस, रूम्स मधले किंवा इतर प्रॉब्लेम्स, गमतीजमती, सर्व काही. तिच्याशी बोलल्यावर माझे मन मोकळे होते. छान वाटते मला. ” मी.
“मग काय अगदी बॉयफ्रेंड वगैरे अशा गोष्टीसुद्धा?” तिने आश्चर्याने विचारले.
“मुळात मला बॉयफ्रेंड नाहीच. पण असता तरी मी आईशी त्यावर बोलले असते. तिचा सल्ला घेतला असता आणि तिने मला योग्य मार्गदर्शनही केले असते,” मी.
“काय सांगतेस? सॉलिड आहेस तू!! आणि काकूसुद्धा !! मला नसतं बाई जमले हे. मला तर आई बाबांची खूप भीती वाटते.”
“अगं मी बाबांशी सुद्धा कोणत्याही विषयावर बोलू शकते. आम्हां तिघांमध्ये छान मैत्री आहे.”
“कमाल आहे, आईबाबांशी मैत्री?? अशक्य आहे. असो, चालू दे तुझे ,” असे म्हणून ती निघून गेली.
मला माहित आहे कि हे प्रत्येकाच्या बाबतीत कदाचित शक्य नसावे. पण मी खरेच खूप भाग्यवान आहे कि मला सर्वात चांगले मित्र मैत्रीण आई-बाबांच्या रूपात मिळाले.
आज, म्हणजे या घटनेच्या तब्बल १५- १६ वर्षांनंतर, आता मी स्वतः २ मुलांची आई आहे. बऱ्याचदा कित्येक कठीण प्रसंगांना समोर जावे लागते. समजतच नाही कसं हाताळावे? तेव्हा मी विचार करते, आईने कसं केले असते आणि मग मला आपोआप उत्तर मिळते.
आणखी एक प्रसंग तुमच्याशी शेअर करते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तशी माझी मुलगी लहानच होती, नुकतीच शाळेत जायला लागली होती. ती शाळेतून घरी येताना रोज मी तिला विचारायचे, “आज काय केले शाळेत? मॅडमनी काय शिकवले? मित्र मैत्रिणींनी मिळून काय काय केले. पण माझ्या मुलीला हे सगळे सांगण्यात काही इंटरेस्टच नसायचा.
“रोज काय तेच तेच विचारतेस ग मम्मा? मला कंटाळा येतो, नंतर सांगते,” म्हणून, ती नुसती TV बघायची किंवा शेजारच्या मुलींबरोबर खेळायला पळायची.
मला खूप वाईट वाटायचे. मग वाटले, तिच्या पप्पांवर गेली असणार, त्यांना तरी कुठे असतो घडाघडा बोलण्यात इंटरेस्ट. असो. मग मला एक कल्पना सुचली. म्हटले हिच्याशी आपण चांगली मैत्री करू. मग मी रोज माझे ऑफिस सुटले कि तिला शाळेतून घरी आणायला जायचे, तेव्हा तिला मी माझ्या ऑफिसमधल्या गप्पा सांगायला सुरुवात केली. “चिऊ, तुला माहित आहे का? आज मी माझ्या फ्रेंड्सबरोबर, लंच ब्रेकमध्ये बाहेर जेवायला गेले होते, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला. खूप धमाल केली आम्ही, आईस्क्रीम पण खाल्ले.”
“अय्या खरेच?? कुठले आईस्क्रीम? चॉकलेट कि वॅनिला?” तिने उत्साहाने विचारले.
पहिले काही दिवस मी रोज दिवसभरातल्या घटना तिला सांगू लागले. आज कुणी डब्यात काय आणले? आमच्या बॉसने कुणाला काही रागाने ऐकवले? माझे कुणाशी भांडण झाले? माझ्या कामाचे कोडकौतुक कसे झाले? माझे आज काय चुकले? अशी प्रत्येक गोष्ट मी तिच्याशी शेअर करू लागले. सुरुवातील ती फक्त ऐकून घ्यायची. हळूहळू तिला इंटरेस्ट वाटू लागला, मग ती प्रश्नही विचारु लागली. कधी मी सांगितले नाही तरी ती स्वतः चौकशी करू लागली. माझ्या ऑफिसमधील सर्वांची नावे तिला तोंडपाठ झाली होती. आणि मग तीही तिच्या शाळेतील गोष्टी मला सांगू लागली. एकदा तर म्हणाली, “मम्मा, मला तुझ्या बॉसबरोबर एकदा PTM (पेरेंट्स टीचर मीटिंग) करायची आहे. सारखे काय गं कुणालातरी ओरडत असतात ते??” मला खूप हसू आले.
आता सध्याची परिस्थिती काय सांगू तुम्हाला?? आज ती, शाळेत पोहोचल्याबरोबर सर्व घटनांचे मनात रेकॉर्डिंग करून ठेवते आणि दारात पाऊल टाकल्या टाकल्या ते रेकॉर्डिंग मला ते प्ले करून ऐकवते.
आता आणखी एक उदाहरण देते. covid मुले २ वर्षे मुलांच्या शाळा ऑनलाइनच होत्या. मुलांचे लिखाण खूप मागे पडले. पण अभ्यास कर, लिखाण कर, सराव असू दे जरा असे कितीदातरी ओरडले तरी माझ्याच काय कित्येक पालकांच्या मुलांनी न ऐकण्याची जणू मोहीमच चालू केली होती. शेवटी, एके दिवशी पुन्हा मला एक कल्पना सुचली. आपण नाही का कित्येक गोष्टी आपल्या मित्र मैत्रिणींकडे बघून शिकतो. मग मी काय केले, मी लिहिलेल्या १-२ कथा माझ्या मुलीला वाचून दाखवल्या. तिला जाम आवडल्या हो. मग काय, “मम्मा, मी पण लिहिते एक स्टोरी,” असे ती म्हणताच मला किती आनंद होतो न होतो तोच, तिने स्टोरी लिहिण्यासाठी लॅपटॉप हातात घेतला. मी डोक्याला हात लावला. मग काय? माझे डोके अगदी कल्पनांचे भांडार आहे. पुन्हा एक कल्पना. मी तिला माझी एक वही आणि त्यात लिहिलेल्या कथा, त्याची मांडणी , कच्चा मसुदा तिला दाखवला. तुही आधी वहीमध्ये लिही मग लॅपटॉपवर पटापट टाईप कर असे सांगितले. नशिबाने तिलाही पटले आणि तिने खरेच वही पेन्सिल घेऊन एक स्टोरी लिहिली. तेव्हा वाटले, खरेच काही गोष्टींचा आपण किती बाऊ करतो पण शांतपणे विचार केला तर त्या खूप सहजपणे हाताळता येतात.
तर सांगायचं मुद्दा काय, तर प्रत्येक नात्यामध्ये मैत्री हा मूलभूत पाया आहे. मग ते नाते पालक आणि मुलांमध्ये का असेना. मैत्री खूप निखळ असते, ती नात्यामध्ये सहजता आणते, नाते फुलवते, त्यात रुसवा आणि गोडवा सर्व काही असते. पण मैत्रीमध्ये कोणतेही बंधन नसते,
तसेच जर आपण आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट मित्र म्हणून शिकवली तर ते पटकन शिकतात आणि महत्वाचे म्हणजे ते स्वतःहून शिकतात त्यासाठी आपल्याला त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करावी लागत नाही, अगदी शिस्तसुद्धा.
मग अशी हि सुंदर मैत्री का बरं आपण आपल्या मुलांबरोबर करू नये? माझे प्रयत्न तर चालूच आहेत, बघा तुम्हालाही जमतीये का तुमच्या मुलांशी मैत्री?