छोटुकली पण धिटुकली
खूप लहानपणची आठवण आहे,अगदी मी शाळेत होते त्यावेळची.मी शाळेत असताना पुण्यात शिकत होते. पुण्यात बालपण गेल्यामुळे सणवार किंवा आपले सर्व महत्त्वाचे दिवस हौसेने व उत्साहाने साजरे करायचे जणु बाळकडूच मिळाले. आषाढीची वारी सुरू झाल्यापासूनच पुण्यात नेम-नियम, देव-धर्म, व्रतवैकल्ये, यांची हवा चालू होते. पालख्या पुण्यात येत तेव्हा केवढं स्वागत, कौतुक होई त्यांचे. पालख्या पुण्यात थांबतात, त्यांचे जेवण व मग दोन्ही पालख्यांचे एकत्रित प्रस्थान.. पुण्यातील मोठा सोहळाच असतो हा.आणि आषाढी एकादशीचं महत्त्व तेव्हापासून मनावर बिंबते.ओढ लागते मोठ्या एकादशीच्या उपासाची. आम्हा लहान मुलांना तर आपण उपास करणार याचाच आनंद जास्त. रोजची वरणभात, भाजीपोळीची सक्ती नाही.त्यादिवशी आवडती साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा चिवडा, साबूदाण्याचा वडा,दाणे-गूळ मनसोक्त मिळणार हाच आनंद. शिवाय दुसऱ्या दिवशी मैत्रिणींच्यात प्रौढी मिरवणार…मी कसा उपास केला ,पर्वतीला कसे जाऊन आलो, काय काय मजा केली या सर्वाची.
हो.सकाळी पर्वतीला डबे घेऊन जाणे हा आमचा या दिवशीचा सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम असे. तीन चार दिवस आधीपासूनच याची तयारी व बेत चालू असत.तसं पाहिलं तर पुण्यात किंवा आसपास विठोबाचे देऊळ नव्हते असे नाही. उपाशी विठोबाचे देऊळ तर आमच्या घराच्या अगदी जवळ. तसे देहू-आळंदी ही फारसे लांब नाही. जवळची विठ्ठलवाडी तर बहुतेक तरुणांची, हौशी परिवारांची अगदी नेहमीची हक्काची पिकनिकची जागा. पण आम्हा छोट्या मुलांना मात्र पर्वतीवरच जायचं असायचं. दोन्ही मोठ्या एकादशा,महाशिवरात्र, क्वचित् हरतालिका, यादिवशी आम्ही सकाळी लवकर उठून, उपासाचे पदार्थ डब्यात घेऊन सायकलवरून किंवा चालत पर्वतीला जायचो. यादिवशी आमच्या शाळांना सुट्टी असायची, पर्वतीवर विठोबाचे देऊळही आहे.
एखाद्या वाड्यातील, चाळीतील किंवा अगदी आळीतील मुलंमुली एकत्र जमून या सहलीला निघत.शाळेतील मित्र-मित्र किंवा सात-आठ मैत्रिणी मिळूनही बेत ठरवत.एखाद्या मोठ्या परिवारातील आते-मामे-चुलत-मावस भावंडे मिळून एकत्र जात. पण एक गोष्ट नक्की, हा कार्यक्रम फक्त मुलामुलांचाच असे. मोठी माणसे यांत सहसा भाग घेत नसत,लक्षही घालत नसत.त्यावर्षी अशीच आम्ही आमच्या वाड्यातील सर्व मुले-मुली घरून डबे घेऊन निघालो सगळे एकत्र होऊन निघेपर्यंत सात वाजलेच.उत्साह मात्र सर्वांचा अवर्णनीय. रस्त्याच्या कडेने चालायचं, रस्ता क्रॉस करतांना लहान मुलांचा हात धरायचा, धांवायचं,पळायचं नाही. अशा सर्व सूचना लक्षांत ठेवत आम्ही जात होतो. चालतांना गाणी,म्हणजे आपल्या पुस्तकांतील कविता म्हणत होतो. सर्वांत लहान मूल ६-७ वर्षांच्या आसपास ,म्हणजे साधारण पर्वती चढून जाऊ शकेल इतपत मोठे व मोठी मुले १२-१३ वर्षांच्या आंतबाहेर.बहुतेक सर्व ग्रुप असेच असत.
पर्वतीवर मुख्य देवळांत दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूस निघालो. मुख्य देवळाच्या मागे पेशव्यांचा दरबार,कार्तिकेयाचे देऊळ,व अगदी मागच्या टोकावर विठ्ठलाचे देऊळ आहे.विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर आम्ही तिथेच मागच्या बाजूला थोडीशी जागा साफ करून गोल करून डबे खायला बसलो. मागच्या कडेने छोटीशी भिंत बांधलेली आहे.त्यावर आम्ही दोघी-तिघी चढून बसलो.पर्वतीच्या पाठीमागच्या परिसराचे द्रुश्य आजही जसेच्या तसे डोळ्यासमोर आहे.
पर्वती पुण्यातून कुठुनही दिसते, आणि पर्वतीवरून सर्व पुणे दिसते. त्यावेळी पर्वतीच्या मागच्या बाजूने दिसणारा परिसर अजिबात गजबजलेला नव्हता. मागच्या बाजूचा टेकडीचा उतार मोठी मोठी झाडे किंवा जंगलाने वेढलेला नाही.तुरळक मध्यम झाडे, कुठे झुडुपांची जाळी,बाकी सर्वत्र खडकाळ जमीनच.कांही खडक बऱ्यापैकी मोठे पण यावेळेस पावसामुळे हिरवीगार शाल पांघरलेले,कुठे कुठे शेवाळ्याने निसरडे झालेले. मोठी झाडे नसल्याने नजर उतारावरून उतरत थेट पायथ्यापर्यंत पोचते. आणि तिथेच थांबते….पर्वतीच्या पायाला बिलगून वेढा घातलेल्या ‘ कालव्या ‘पाशी.खूप मोठा रुंद व जवळजवळ दोन-तीन पुरुष खोल असलेला हा कालवा पुणे शहराला पाणी पुरवतो.पर्वतीची अर्धी प्रदक्षिणा मागच्या बाजूने पूर्ण करून हा पुण्यात प्रवेश करतो. त्या पलिकडे थोडी ओसाड जागा. त्यावर कुठे तुरळक घरे किंवा एखादी छोटी वस्ती.त्यापलिकडे विठ्ठलवाडीकडे जाणारा रस्ता. रस्त्याच्या दुतर्फा उंच,उंच झाडे.. आम्ही वरून बघत होतो, कांही मुले मागच्या बाजूने उतारावर खाली उतरून बसली होती. कांही कालव्याच्या कांठापर्यंत पोचली होती, कांही दुसऱ्या पायवाटेने तिथे पोचली होती, कालव्याच्या कांठावर बसली होती आषाढांत पावसाने धरण तुडुंब भरले असावे, कालव्यातही भरपूर पाणी होते. गढूळलेलं मळकट पाणी आभाळात ढगांची गर्दी झाल्याने आणखीनच गहिरं दिसत होतं. इतक्यांत खाली कालव्याजवळ एकदम गलका झाला, वरून थोडंसं दिसत होतं. पाण्यात कुणाचे तरी हात-पाय मधेच डोकं दिसले.
” अगबाsई पाण्यात पडलं वाटतं कुणीतरी? “
तेवढ्यात आणखी एक आवाज व पाणी उसळलेले दिसले,आणखी ” कुणी पडलं?कां उडी मारली? “
बाप रेs आम्ही घाबरलोच.कांठावर गलका वाढतच होता गर्दी वाढत होती. पलिकडच्या कांठावरही माणसं दिसत होती. कांहीतरी अनुचित घडलं होतं नक्की. वरून फारसं कळत नव्हतं. आम्ही चुपचाप आमचे डबे वगैरे आवरून घरी जायला निघालो. येता येता कुणीतरी कैनॉलमधे पडले, एवढंच कळलं.–पुढे काय झाले?
दुसऱ्या दिवशी ‘सकाळ ‘मधे पहिल्याच पानावर बातमी व फोटो..
नांवाप्रमाणेच ‘ सुकन्या ‘! व तिचा फोटो.
फोटो पाहताच ओळखले. अरेs ही तर आमच्याच शाळेत आहे. एक वर्ष माझ्या मागे. काल पर्वतीवर दिसली पण होती चढतांना.
‘ सुकन्या पोंक्षे वय वर्षे ११ ‘.आमच्या सारखीच ती पण मुले-मुले पर्वतीवर आली होती.तिथे एक मुलगा पाय घसरून पाण्यात पडला.
‘ वय वर्षे –७ ‘. पोहता येत नव्हतं. गटांगळ्या खाऊ लागला. बुडण्याच्याच बेतात होता. पण सुकन्याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. तिला छान पोहता येत होते. एका हाताने त्याला पाण्याच्या वर धरून ती पोहत पोहत कांठापर्यंत घेऊन आली. कालव्याचे काठ म्हणजे सरळसोट बांधलेल्या सीमेंटच्या भिंतीच होत्या. धरणार कुठे?वर कसं येणार?कांठावर जमलेल्या लोकांनी मदत केली व दोघांना वर घेतले. त्या मुलाचे नांव मी आता विसरले. कांठावर आणले तेव्हा गुदमरून बेशुद्ध झाला होता. नाका-तोंडातले,पोटांतले पाणी काढून टाकायचा तिथेच प्रयत्न केला, थोडा श्वास घेऊ लागल्यावर लगेच हॉस्पिटलमध्ये हलवले… वाचला तो.
शाळेत मुख्य नोटिसबोर्डवरच ‘ शाबास सुकन्या!’ असे लिहून तिचे कौतुक व अभिनंदन केले होते… स्वतः मुख्याध्यापिका मैडमनी.प्रार्थनेच्या वेळी शिक्षकांनी तिला शाबासकी दिली. ही गोष्ट लवकरच सर्वतोमुखी झाली. हे तिचं कौतुक थोडं विरतं न विरतं तोच तिला राष्ट्रपतींकडून ‘ वीरबाला ‘ पारितोषिक मिळाल्याची बातमी आली. परत एकदा सर्वत्र अभिनंदनाची,कौतुकाची लाट आली. आता सर्वांना तिचा अभिमानही होता. पुण्याच्या कीर्तीत तिने भर घातली होती. हा सर्व कौतुक सोहळा आम्ही अगदी जवळून पाहिला, अनुभवला.ती आमच्या शाळेत आहे, मी ओळखते तिला, हा अभिमानही मिरवला. शाळा संपल्यावर सर्व मुली आपल्या आपल्या वाटेने आयुष्यात पुढे गेल्या.अगदी वर्गातील मैत्रिणींनाही थोडंफार विसरायला झालं असेल, पण हिला कसं विसरणार?एवढ्या मोठ्या देशात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच मुलांच्या भाग्यात हा पारितोषिक–सन्मान लिहिला असेल. त्यांतीलच एक… शाळेत माझ्या बरोबर होती, मी तिला ओळखते.. मनाच्या एका कोपऱ्यात आजही हा अभिमान जपला आहे, तो तिला कसं विसरू देईल!
खरंच सुकन्या, इतक्या लहान वयांतील तुझ्या धाडसाला शतशः प्रणाम!तुझं नांव तू सार्थ केलेस!
