संवाद

सप्रेम नमस्कार,

सर्वांना नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा. !!

मंडळी श्रीखंडाचा आस्वाद घेत, गुढीपाडव्याचा सण सर्वांनी आनंदात साजरा केला असेलच. मंडळात सुद्धा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे मंडळाच्या सभागृहात श्रीसत्यनारायणाची महापूजा श्री. आणि सौ. ओंकार संगोराम ह्याच्या हस्ते करण्यात आली. त्याच बरोबर ‘अभिमान आणि योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र मंडळाच्या ‘महानाद’ ढोल ताशा पथकाने आता बाळसे घ्यायला सुरुवात केली आहे. ढोल ताशाच्या निनादाने वर्धापनदिन सोहळ्याचा आरंभ झाला. समारंभाचा सविस्तर वृत्तांत अंकात आहेच.

महाराष्ट्र मंडळाने राज्य स्तरीय शब्दाक्षरी स्पर्धा आयोजित केली आहे. प्राथमिक फेरीचा पहिला भाग 5 एप्रिलला मंडळाच्या सभागृहात झाला. उर्वरित प्राथमिक फेरी  २०एप्रिलला होईल.

१२ एप्रिलला ‘ये जो पब्लिक हैं ‘ ह्या नाटकाचे दोन प्रयोग रंगशंकरा नाट्यगृहात होणार आहेत. त्याची तिकीट विक्री जोरात सुरू आहे.

२६ एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता SIRF संस्थेच्या संस्थापिका श्री. सुमेधा चिथडे यांचे व्याख्यान होणार आहे. विषय आहे, ‘प्रेरणा… स्वतःपलीकडे जगण्याची’ सविस्तर माहिती अंकात आहेच.

मंडळी दिवस किती पटपट जातात, ते लक्षातच येत नाही.  बघता बघता वर्ष उलटून जाते. असेच सभासदत्वाचे होते, आपल्या सभासदत्वाची मुदत संपली असेल तर लगेच अद्ययावत करावी.

बरं मंडळी,  आपला इ सनविवि अगदी खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक झालेला आहे. इ सनविवि चे पुढील अंक आता आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटवर  वाचायला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला अंक कधीही वाचता येईल , शेअर करता येईल. आपली मते /अभिप्राय अगदी “तिथेच”  मांडता येईल. एखादा संवाद तिथेच सुरु होईल म्हणाना.  दर महिन्याला आम्ही त्या त्या अंकाची लिंक पाठवूच , पण तुम्हाला बाकी अंक  https://snvv.mmblr.org/  इथे टिचकी मारून वाचता येतील. तुम्ही आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या. मार्चचा अंक कसा वाटला? नवीन लेख, कथा आवडल्या का? मार्च चा अंक http://bit.ly/4hqN8gX  इथे  वाचता येईल

तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की पाठवा, तसेच तुमचे स्वलिखित साहित्यसुद्धा पाठवा.

स्मिता बर्वे

टीम स न वि वि

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *