सनविवि संवाद डिसेंबर snvv संवाद 2022

डिसेंबर snvv संवाद 2022

सप्रेम नमस्कार विनंती विशेष 

वाचकहो,

वर्षाचा अखेरचा महिना आला की आपण सर्वजण अगदी सहजच हे सरते वर्ष कसे गेले याचा लेखाजोखा तपासू लागतो.  

महाराष्ट्र मंडळाने 2022 ह्या वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबविले, तसेच एकापेक्षा एक सरस असे मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले आहेत.यापुढे देखील अनेक कार्यक्रम होत राहतील. मंडळातील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत स.न.वि.वि.च्या माध्यमातून पोहोचवत असतो. मंडळाच्या सभासदांना ही सेवा विनामूल्य दिली जाते. आपल्याला किंवा आपल्या ओळखीच्या सभासदांना इ-स.न.वि.वि. मिळत नसेल तर आमच्याशी संपर्क साधावा. 

पुढेजाण्याआधी मंडळातर्फे आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. दिनांक 5 आणि 6 नोव्हेंबरला झालेल्या ‘मी स्वरा आणि ते दोघं!’ ह्या नाटकाच्या प्रयोगांना आपण भरघोस प्रतिसाद देऊन दोन्ही प्रयोग यशस्वी केले याबद्दल सर्व प्रेक्षकांना अनेकानेक धन्यवाद! मंडळाचे सर्व कार्यक्रम तुमच्या सहभागाने यशस्वी होत रहावे अशी आमची नेहमीच अपेक्षा असते. 

डिसेंबर मधील आगामी कार्यक्रम म्हणजे 4 डिसेंबर रोजी मंडळाच्या सभागृहात सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार डॉ. पुष्पा द्रविड यांच्या जीवनातील काही वेचक क्षण जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.अर्थात, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास शब्दांकित करणारे पुस्तक ‘कॅनव्हास ते वॉल’ मधील निवडक परिच्छेदांचे अभिवाचन लेखिका शर्मिला पटवर्धन करतील आणि डॉ.पुष्पा ताई आपले मनोगत मांडतील.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका सानियाजी लाभल्या आहेत. ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे.

29नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र मंडळाचे मानद सदस्य श्री. विक्रम किर्लोस्कर यांचे दुःखद निधन झाले. संपूर्ण स.न.वि.वि टीम तर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण 

करत आहोत. 4 डिसेंबरला मंडळाच्या सभागृहात त्यांना आदरांजली वाहण्यात येईल.

पुढील वर्षात म्हणजे दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने स्त्री सखी मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. हा समारंभ मंडळाच्या सभागृहात होणार आहे. 

तसेच स.न.वि.वि च्या साहित्योन्मेष स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नवोदित लेखकांनी आणि काही नियमित वाचकांनी लेखन कार्यशाळेविषयी विचारणा केली होती. साहित्यप्रेमींच्या आग्रहास्तव ९ जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र मंडळाने एक लेखन कार्यशाळा आयोजिली आहे. सुप्रसिद्ध लेखिका डॉ.अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. 

वरील दोन्ही कार्यक्रमांबद्दल सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल. आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय राहील. कळावे,

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. 

 

राधिका मराठे 

स.न.वि.वि टीम 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *