– राधिका मराठे –
संपादक मंडळ , स.न.वि.वि.
सप्रेम नमस्कार विनंती विशेष…
वाचकहो, बघता बघता हवेत पावसाचा सुखद गारवा येईल आणि हा ऋतु अक्षरशः हिरवा होईल. 5 जून रोजी *जागतिक पर्यावरण दिन* साजरा करण्यात येतो. या वर्षीचे घोषवाक्य आहे ‘Only One Earth’. किती चांगली कल्पना! ‘आपली पृथ्वी हेच आपले सर्वस्व!!’
आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण केलेच पाहिजे. आमच्या वाचकांना आम्ही तसे आवाहन करत आहोत.
हा अंक रसिक वाचकांच्या हाती देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या अंकात विविध वाचनीय लेख तर आहेतच शिवाय मंडळाच्या अनेक कार्यक्रमांची माहिती देखील आहे.
29 मे रोजी मंडळाच्या सभागृहात एक अनौपचारिक स्नेह सभा झाली. महाराष्ट्र मंडळाच्या सर्व स्नेह मंडळानी त्यात मोठया उत्साहाने सहभाग घेतला होता. उस्फूर्तपणे चर्चा होऊन सभा यशस्वी झाली.
शनिवार 25 जून 2022 रोजी 4 ते 5.30 पर्यंत मंडळाच्या सभागृहात सर्वसाधारण सभा घेतली जाईल. सर्व सभासदांची उपस्थिती अपेक्षित आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी होणार्या सूरमणी सानिया पाटणकर यांच्या सुश्राव्य गायनाचा रसिक श्रोत्यांनी जरूर आस्वाद घ्यावा.
दिनांक 9 जुलै रोजी रविंद्र कलाक्षेत्र येथे आषाढी एकादशी निमित्ताने *तुका म्हणे *ह्या नृत्य नाट्याचे सादरीकरण होणार आहे. सभासदांना त्याच्या प्रवेशिका घेता याव्यात याकरता लिंक्स दिल्या आहेत. आपले आसन लवकरात लवकर आरक्षित करा.
या वर्षी आपण आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत मंडळाच्या सभागृहात ऑफलाइन पद्धतीने करणार आहोत. बाप्पाची आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घडून येणार ही तो श्रींची इच्छा आहे!! आम्ही तर तयारीला लागलो आहोत. तुम्ही पण विविध स्पर्धांमध्ये भाग घ्या व आपला हा उत्सव दिमाखात साजरा करा.
नेहमीप्रमाणे छोट्यांसाठी आणि मोठ्यांसाठी भरपूर कार्यक्रम आणि स्पर्धा घेतल्या जातील .त्याबद्दल या अंकात सविस्तरपणे माहिती दिली आहे.
स. न. वि. वि. तर्फे घेतल्या जाणार्या साहित्योन्मेष स्पर्धेतील लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्या इमेल आयडी वर नक्की पाठवा.
आमच्या स्पर्धकांना देखील निरनिराळे साहित्य प्रकार हाताळायला आवडत आहे असे आमच्या लक्षात आले आहे. तेव्हा ही वाचन शृंखला अशीच चालू राहणार हे नक्की.
तूर्तास इथेच पूर्णविराम देते.
कळावे, लोभ असावा ही विनंती.
