–स्मिता बर्वे–टीम सनविवि–
चोखंदळ वाचक हो!
सप्रेम नमस्कार,
बघता बघता नवीन वर्षातील सहा महिने संपले सुद्धा.
जून महिन्याची सुरुवात मंडळाने आयोजित केलेल्या वर्षा सहलीने झाली. सुग्गी रिसॉर्ट अनेकल येथे जवळपास 75 आबालवृद्धांनी सहलीचा आनंद घेतला. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळतील. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहलीतील लहान मुलांना बियाणे आणि कंद देण्यात आले.
महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या वेबसाईटवर जानेवारी ते जून सनविविचे अंक अपलोड झाले आहेत. www.mmblr.org ह्या आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आगामी सर्व कार्यक्रमाची सूचना साईटवर मिळेल.
मंडळाचा आणखी एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे रेडिओ सनविवि. अंकात प्रकाशित झालेले उत्तम साहित्य आपल्या गुणी सभासदाच्या आवाजात आपण ऐकू शकता. साहित्योन्मेष स्पर्धेचे सहा महिने पूर्ण झाले आहेत. त्यातील स्पर्धकांचे त्यांना आवडलेले लेख लवकरच आपल्याला रेडिओ सनविविवर ऐकायला मिळतील.
25 जूनला मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेचा वृतांत अंकात वाचायला मिळेलच. त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता मंडळाच्या सभागृहात जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सुरमणी सानिया पाटणकर यांची सुरेल मैफिल रंगली. त्यांच्या जादुई स्वरांनी सभागृह भारावून गेले होते.
रसिक हो! उर्वरित वर्षसुद्धा वेगवेगळ्या उपक्रमानी धमाकेदार असणार आहे. गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. त्याबद्दलची माहिती लवकरच!
सध्या जुलै मधील कार्यक्रमाविषयी…..
3 जुलै 2022 महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू नॉर्थ, आनंद मेळा आयोजित करीत आहे. सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे. 9 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवींद्र कलाक्षेत्र येथे “विठ्ठल गीती गावा” हा अभंग गायनाचा कार्यक्रम आणि “तुका म्हणे” हा नृत्य नाट्य आविष्कार सादर होणार आहे. तिकीट विक्री सुरू झाली आहे, निराशा टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले तिकीट घ्या.
कोणताही कार्यक्रम रसिकांविना अपूर्ण आहे. उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित करा.
सामाजिक बांधिलकी ह्या उपक्रमांतर्गत 17 जुलै 2022 रोजी 10 ते 5 ह्या वेळात मंडळाच्या सभागृहात इ श्रम कार्ड आणि ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्प आयोजित केला आहे. आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तीना घेऊन यावे.
गणेशोत्सव विशेष सनविविच्या स्पर्धा जाहीर झाल्या आहेत. त्याला भरभरून प्रतिसाद द्या.
शेवटी महत्त्वाचे म्हणजे आपल्या सूचना, प्रतिक्रिया, कल्पना आमच्यापर्यंत जरूर पोहचवा. आपला अभिप्राय हीच आमची ऊर्जा आहे. भेटू लवकरच!
