सभासदांची लेखणी

निमित्त

डोळ्यांमधली झोप खाडकन उतरली आणि कडाक्याच्या थंडीने गारठून गेलेलं शरीरही एकदम अलर्ट झालं .

प्रत्येकाचे प्राण डोळ्यात आणि कानात साठवले गेले. जंगलातल्या त्या धूळभरल्या रस्त्यावर थांबलेल्या उघड्या जीपमध्ये इतकी शांतता पसरली की स्वतः चे श्वास सुद्धा ऐकू  यावेत.

            आजूबाजूला पसरलेल्या भल्या थोरल्या जंगलातून मगाचपासून माकडांचं चीss ची ss आणि नरहरणांचे कॉल्स ऐकू येत होतेच ,एवढ्यात समोरच्या सागवानाच्या वाळक्या पाचोळ्यातून खसफस ऐकू आली आणि झळझळीत पिवळंधम्म, काळेपट्टेवालं मोठं धूड आपल्याच तंद्रीत बाहेर आलं .

सगळ्यांचे श्वास रोखले गेले कारण समोर मोठी पोसलेली वाघीण होती ती. जंगलाची राणी !प्रत्यक्ष आमच्या पुढ्यात. बापरेsss ती कल्पना करून आत्तासुद्धा शहारायला होते. डोळ्यांवर अजून विश्वास बसतोच आहे तोवर रस्ता क्रॉस करून उंच वाढलेल्या गवतात ती निघून देखील गेली.

पुढची पाच मिनिटे सर्व मंत्रमुग्धवस्थेतच  होते.

            आजूबाजूचे “कान्हाचे” सुंदर जंगल .मोठाली वृक्षराई, खूप सारे ग्रासलँड ,दूरवर दिसणारे हरणांचे कळप ,कधी न ऐकलेल्या अत्यंत मधुर आवाजातल्या पक्षांच्या गानलकेरी. थंड पडलेल्या नाकांनाही जाणवणारा गवत आणि झाडीचा थोडासा तिखट, काहीसा उग्र वास .सूर्याची किरणे पडल्याने चमचमणारे पिवळे दवभरले गवत. व्वा! भान हरपायला लावणारा तो क्षण !

            हळूहळू सर्वजण भानावर आले आणि जिप्सची इंजिने धडधडत सुरू झाली आणि पुढचा प्रवास परत सुरू झाला.

            माझ्या मावसभावाने सर्व कुटुंबीयांसाठी ही एकत्रीकरण सहल अरेंज केली होती.डिसेंबरची सुट्टी साधून. नागपूरहून मोठी बस घेऊन ऐंशी वर्षांपासून तीन वर्षांपर्यंत सर्व वयोगट मजा करत निघाला. वाटेत बोरे,ओले हरभरे ,गोड पेरू यांच्या सोबतीला नागपूर स्पेशल संत्री अगदी करंड्या भरभरून  घेतलेली होती.

हात तोंड काळे करत बकाबक खाल्लेले,वाटेत घेतलेले गरमागरम उकडलेले,भाजलेले शिंगाडे ! वाहवा, थंडीत या सगळ्या खाण्याची मजा काही औरच !

संत्री तर पोटभर खाल्लीच पण त्यानंतर त्याच्या बिया सर्वांनी एकमेकांना फेकून मारल्या. बिया संपल्यावर मग  संत्र्यांच्या सालांचे तुकडे .लहानांनी तर मारामारी केलीच पण मोठ्या वयाच्या लोकांनीही शक्यतो गंभीर चेहरे ठेवत हळूच हळूच सालांची फेकाफेकी आणि आपण काही केलेच नाही असे चेहरे ठेवले.इतका कचरा झाला की बस थांबवून सगळ्यांना कामाला लावून कचरा झाडायला लावला. गाणी, गोष्टी ,उखाणे , लव्हमॅरेजवाल्यांच्या loveस्टोरीज ऐकत ऐकत संध्याकाळी कधी कान्हाला पोहोचलो ते कळलंच नाही .

            रात्री मात्र बाहेर पडावसंच वाटू नये इतकी मरणथंडी .पण कॉटेजेसमध्ये राहवतय कोणाला ? सगळे शेकोटीजवळ हजर .प्रत्येक माणूस दुप्पट जाड झालेला .प्रत्येकाला ओळखा पाहू कोण ?असं म्हणायची वेळ आली कारण थर्मल ,स्वेटर, कानटोप्या मफलर्स ,जॅकेट्स ,शालींनी प्रत्येकाचा फक्त थोडासा चेहराच दिसत होता, त्यातून फक्त शेकोटीचाच काय तो उजेड ! सर्वांनी शेकोटीत कांदे, बटाटे, रताळी, हरभरे भाजून खाल्ले मनसोक्त!

पहाटे सर्व उत्साही मंडळी जरा जास्तच पॅक होऊन जिप्सपाशी जमा झाली .सहा वाजता बाहेर अंधारकुट्ट .उघड्या जिप्सने रिसॉर्ट ते जंगलाचा एंट्रन्स हे पाच किलोमीटर जायचं दिव्य करायचे होते .हवेचे तापमान दोन डिग्री सेल्सियस.पण जंगलात अजूनच पारा खाली गेलेला प्रत्येकाला जाणवलं.प्रत्यक्ष जंगलात शिरेपर्यंत प्रत्येकाची कुल्फी झालेली. कुठलाही अवयव हलवला तर बहुधा मोडेल असं प्रत्येकाला वाटत होतं.

             जंगलातल्या नागमोडी धुळवटांनी जाता जाता सूर्योदय झाला .अवर्णनीयच ते दृश्य.झाडाच्या शेंड्यांवरती पडलेली सूर्यकिरणे खरीच सुवर्णसोनेरी होती. हळूहळू उजाळत गेलेल्या दिशा, वाटेतल्या तळ्यात तर पाण्याच्या पृष्ठभागावरून वर येणाऱ्या वाफांनी तळ्याला एक वेगळंच सौंदर्य दिलं होतं. इंडियन रोलर, मैना ,टिटव्या, सुतार , खाटीक आणि अनेक छोटे छोटे सुरेल ताना घेणारे असंख्य पक्षी दिसत होते.

 माणसाला सगळ्याचीच हाव असते .आता आम्हाला मोठे प्राणी कधी दिसतात असं होऊ लागलं .अचानक जीप वळवली आणि समोर  असंख्य हरणे टणाटण उड्या मारत रस्ता क्रॉस करू लागली.

            रस्त्याच्या उजवीकडे मोठा पोसलेला बारासिंगा !(Swarm deer  )आपल्या बायको पोरांसकट उभा होता . त्याच्या मोठाल्या शिंगांमध्ये गवत अडकलेलं होतं आणि तो जोरजोरात कॉल देत होता. सगळी हरणे अतिशय सावध झाली होती ,त्याच्या प्रत्येक कॉलला त्याच्या नाकातून वाफ निघत होती !

थंडी धुक्यात ते सगळं बघायला खूप छान वाटत होतं .पुढे जाऊन लक्षात आलं की दोन छोट्या कोल्ह्यांसाठी हा त्याचा आरडाओरडा सुरू होता.

 कोल्हे मात्र कुत्र्यासारखे जीप्स भोवती आरामात फिरत होते. खूप सारे मोर , हरणे एखादे अस्वल ,एखादे मुंगूस, माकडं, घारी ,गरुड,घुबडेअसे अनेक प्राणी पक्षी दिसत राहिले.     खूप फोटो व्हिडिओज  रेकॉर्डिंगही झाले .आजकाल प्रत्येक जणाजवळ मोबाईलवर फोटो व्हिडिओ आणि डिजिटल कॅमेरे तर असतातच जवळ.

रिसॉर्टवर जेवताना त्यांच्याच शेतात उगवलेल्या ताज्या वाफ भरल्या गरम गरम भाज्या खाऊन सगळे अगदी तृप्त झाले. प्रत्येक टेबलवर आपलेच नातेवाईक म्हणून सगळ्यांना गंमतही वाटत होती .कधी यांच्याबरोबर तर कधी त्यांच्याबरोबर .  सकाळ -संध्याकाळ जंगलात फिरणे ,रिसॉर्टवरचे ताजे गरमागरम जेवणे ,संध्याकाळी शेकोटी जवळचे नाच -गाणे, गप्पा -गोष्टी , मनोरंजन आणि अनेक जुन्या जुन्या कथा एकमेकांबद्दलच्याच.

            खूप खूप वर्षानंतर भेटलेले आपलेच सर्व नातेवाईक काही  नव्या वहिन्या,काही नवे मेहुणे,काही नवी भाचे मंडळी,नवी नाती, वेगवेगळ्या गावांमध्ये-देशांमध्ये राहणारे, कारणांशिवाय भेटीं ना होणारे आपलेच सर्व नातेवाईक. इतक्या मजेने एकत्र आले ,नाती दृढ झाली .सगळ्यांनी आपापले लहानपण परत एकदा नव्याने अनुभवलं

चेष्टामस्करी, चिडवाचिडवी, गमतीजमती  यात तीन दिवस कसे संपले कळलेच नाही. परतीच्या प्रवासात ईमेल ,फोटो, व्हिडिओज , एकमेकांना देणे घेणे झाले .खूप जण जमल्याने भाऊ -भाऊ ,बहिणी -बहिणी, भाऊ -बहिणी , नणंदा-भावजया, सगळ्यांचा ग्रुप ,आजी -आजोबा -नातवंडे असे असंख्य फोटो काढले गेले .

प्रत्येकाने ते फेसबुकवरही टाकले .न येऊ शकलेल्या नातेवाईकांना ,”अब तुम जलो” अशी  या सहलीची रसभरीत वर्णने ऐकवली गेली. पुढेही असेच भेटत राहूया याचे वायदे झाले .

            मी कशाने सुखावले?

ट्रीपमुळे, नातेवाईकांच्या सहवासाने, भेटीने, निसर्गाच्या सुंदर सानिध्यात, तिथे बघितलेल्या अनेकविध रंगांनी ,तरतऱ्हेच्या पशुपक्ष्यांनी, आयत्या आयत्या जेवणाने, घरातल्या रुटीन मधून बाहेर पडल्याने की नॉस्टॅल्जियाने??   असा विचार करत करत घरी परतले .

            लग्नकार्यातून तर आपण सगळे एकत्र जमतोच पण ज्याच्याकडे कार्य ते सगळे कामांमध्ये बिझी होतात पण मग अशा ट्रिप्स मध्ये सगळेच सुट्टीला आले  .त्यामुळे सगळेच एन्जॉय करू शकले . मनाला तरतरीत करणाऱ्या अशा भेटी तुम्हीही अरेंज करू शकता . निसर्गाचे सान्निध्य खूप सुखावणारं असतं ,त्यातून अनेक गोष्टी आपल्याला उलगडतात .अशी ही निसर्गात रमवणारी ट्रीप तुम्हीही अरेंज करू शकता .घ्या पुढाकार आणि आणा सगळ्यांना जवळ!

 ऑल द बेस्ट ! सांगा बरं आम्हाला तुम्हाला कसे वाटले ते!

–विद्या पळसुले

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *