सांगावेसे वाटले म्हणून

नमस्कार

दि. १ मार्च २०२६ रोजी, बेंगळूरुच्या मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याची, मी लेखन-दिग्दर्शन केलेला ‘यात्रा’ हा दीर्घांक सादर करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरुचे खूप खूप आभार.

       असं म्हणतात की मराठी कलाकारांसाठी मराठी रसिक हेच मायबाप असतात, पण असं वेगळ्या राज्यात मराठी कलाकारांसाठी तुम्ही हे एक माहेर उभं केलं आहे आणि ही फार सुंदर गोष्ट आहे.

       लाभले आम्हास भाग्य – आपल्या प्रत्येकाला तोंडपाठ आहे. पण त्यातील कोणतीच ओळ महाराष्ट्राबद्दल न बोलता फक्त मराठीवर का बोलते हे इथे आल्यावर मला कळलं, कारण मराठीपण हे जागतिक आहे; आणि ते तुम्ही सगळे जपताय.

       बेंगळूरुचं महाराष्ट्र मंडळ खूप active आहे, असं कौतुक आम्ही कायम पुण्यातही ऐकत असतो. पण कोणतंही मंडळ म्हणजे काही इमारत किंवा स्ट्रक्चर नसतं तर त्यातली माणसं असतात. या निमित्ताने ती सर्व माणसं पाहून खूप छान वाटलं. बेंगळूरुचं नाही तर आपलंच महाराष्ट्र मंडळ असं म्हणावं इतका आपलेपणा वाटला.

       मराठी भाषेत काम करणं, मराठी लिहिणं हे आजच्या काळात करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, असं मला वाटतं आणि नुसतं मराठीत लिहिणं नाही, तर मराठीत विचार करणं हे महत्त्वाचं आहे. कारण आता जितकं आपल्या मातीतलं असेल तितकं ते जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी आहे. आता काम करतानाही हे जाणवतं की Sci-fi काही असेल तर ते मराठी नको – नात्यांची हळवी गोष्ट मात्र मराठी होऊ शकेल. हे वर्गीकरण आपण थांबवलं पाहिजे. जागतिक विचारही मराठीतून करता येतो तो निश्चितच केला पाहिजे.

या स्पर्धेच्या निमित्ताने जे लेखन झालं आहे ते वाचण्यासाठीही मी उत्सुक आहे, मला नक्की ते वाचायला आवडेल.

       मी खरं तर लहान आहे, त्यामुळे तुम्ही बोलावलंत याला निमंत्रण न म्हणता प्रोत्साहनाची थाप असं म्हणेन आणि मराठीवर प्रेम करणारी ही जी पुढची पिढी तुम्ही महाराष्ट्राबाहेर असूनही घडवताय तिला मराठीत काहीतरी सकस बघायला-वाचायला मिळत राहावं यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत राहीन.

या सुंदर अनुभवासाठी, अत्यंत उत्तम रसिकवर्गासमोर सादरीकरण करण्याचं समाधान दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

—मुक्ता बाम

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *