— पंकज पंडित —
आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा…….तिने ठरवले. मनात एकवार सगळ्याची उजळणी केली. भराभरा चालत जाऊन तिने पुढच्या नाक्यावरून टॅक्सी पकडली. पुढच्या दहा मिनिटात ती तेथे पोहचली. दाराची बेल वाजवली…. काहीच प्रतिसाद नाही म्हटल्यावर कडी वाजवली. दार उघडेच होते . तिने ते किलकिले केले. आत डोकावताच तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही..
आतील खोलीतील पंख्यावरून तिच्या नवऱ्याचे प्रेत , लटकत होते . मान मोडली होती .स्टूल एका बाजूला पडले होते आणि पंख्याखालच्या पोकळी मध्ये त्याचे कलेवर , अधांतरी लटकत होते तिच्या नवऱ्याचे डोळे आणि जीभ बाहेर आली होती .अंगावरील शर्टच्या गुंड्या सुटलेल्या होत्या . पायातील बूट , मोज्यासकट , सैल झाले होते. शेजारी TV मोठ्या कर्कर्श्य आवाजात चालूच होता. मालिका होती, “क्योंकी सासभी कभी बहू थी”
हे दृश्य बघून ती बधिर झाली. तिचे हात पाय गळून गेले. ती मटकन खाली बसली. तिचा घास पार सुकून गेला किंकाळी आतमध्येच हरवून गेली . शेजारील तांब्यातील पाणी तिने घटाघटा प्याले. पदराने घाम पुसला, केस नीट नेटके केले. कर्कश्य आवाजात चाललेला TV बंद केला. आता तिच्या जीवात जीव आला. तिने शेजाऱ्यांना बोलावले; त्यांनी पोलिसांना फोन केला आणि ती पोलीस येण्याची वाट बघू लागली ….
गेल्या काही दिवसातील घटनांचा चित्रपट तिच्या समोर तरळला ….
कांदे पोहे , म्हणजे दाखवण्याचा समारंभ. तिला बघायला , मोठे श्रीमंत , शेजारच्या गावातील, देशमुख येणार होते . त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी मुलाची आई, वडील, काका, काकू आणि नवरा मुलगा अशी मंडळी तिला बघायला, म्हणजे तिची वधुपरीक्षा घ्यायला आले होते त्यांच्या समोर , चहा आणि पोहे घेऊन जाताना , तिचा हात कापत होता. अशा समारंभात भाग घेण्याची तिची पहिलीच वेळ होती. आईविना, आजीकडे वाढलेली, ती अश्राप पोर होती. दिसायला शुक्राची चांदणीच होती.
मुलाच्या आईने तिला काही प्रश्न विचारले ..तुला स्वयंपाक येतो काय ? पुरण पोळी , उकडीचे मोदक वगैरे करता येतात काय ?आवडते पदार्थ कोणते ? वगैरे वगरै
यानंतर, मुलाच्या काकाने तिला इंग्रजी पेपर वाचून दाखवायला सांगितलं. तिने तो फाडफाड वाचून दाखवला. यानंतर एकोणतीसचा पाढा पाठ आहे का ? त्याची पण परीक्षा घेतली. आजीने , तिच्याकडून रोज पाढे पाठ करून घेतले होते त्यामुळे तिने बिनचूक उत्तरे दिली.
यानंतर, मुलगा आणि मुलीला एकमेकांशी बोलण्याची संधी देण्यासाठी, दुसऱ्या खोलीत नेण्यात आले. “तिच्या” पेक्षा “तो”च बोलायला लाजत होता जुजुबी प्रश्न, तिनेच त्याला विचारले . “ तुम्हाला कोणता चित्रपट आवडला” ? तर त्याने “सैराट” असे उत्तर दिले होते. शोकांतिकाच त्याला आवडायच्या.
“प्रेमासाठी सर्वस्व अर्पण करायला लागते “असे त्याला वाटत असे. तिला मात्र शोकांतिका बिलकुल आवडत नसत “परम ईश्वर कायम आपल्यामागे आहे म्हणून आपल्या जीवनात जे जे काही होते, ते ते चांगल्यासाठीच होते” असा तिचा ठाम विश्वास होता. लवकरच तिला होकार कळवण्यात आला. सगळ्यांनी तिचा होकार गृहितच धरला होता. मोठ्या धूमधडाक्यात. लग्न पार पडले.
आणि ती आतुरतेने वाट पाहत होती ती पहिली रात्र आली. आतापर्यंत तिने जपून ठेवलेला हा सुंदर देह , आज ती, पतीच्या चरणावर अर्पण करून टाकणार होती. “लाज ही स्त्रीचा दागिना” असं ती मानायची. मात्र फक्त काही क्षणापुरती ती आज रात्री, लाज विसरणार होती. मिलनाच्या अत्युच्च स्पर्शामध्ये तिचं अर्धांग, पतीच्या अर्ध्या देहात विरून जाणार होते . ते दोघेही प्रेमसागरात विरघळून , विश्व् आत्म्याशी , एकरूप , एकरूप होऊन, जाणार होते.
आली हासत पहिली रात ,
उजळत प्राणांची फुलवात
आली हासत पहिली रात ….
प्रकाश पडाता माझ्यावरती , फुलते बहरुन ,
माझे यौवन
हसली नवती, चंचल होऊनि , नयनाच्या महालात ,
आली हासत पहिली रात …
नववधू प्रिया मी बावरते: मधूशय्येवर सुवासिक फुलांच्या माळा लावल्या होत्या. दाराला कडी लावून ती आली. दोधेही, लग्न घरातील पाहुणे रावळे , यांची वर्दळ, लग्न समारंभ, भरजरी कपडे , यांनी अगदी थकून गेले होते. तरीही पहिल्या रात्रीची उत्सुकता तिला होती. तो घामाने डबडबला होता. कपडे उतरवण्यास त्याने सपशेल नकार दिला . तिलाही आपले कपडे उतरवायला अवघड वाटले. मग तिने त्याच्या केसावरुन हात फिरवायला सुरवात केली आणि बघता बघता तो , एका लहान मुलासारखा झोपून गेला आणि काही वेळाने चक्क घोरू पण लागला ..
पहिल्या मधूचंद्राच्या रात्रीचा तिचा अनुभव विदारक होता “याला आईची गरज होती ; स्त्रीची नाही”…“नारळ विकत घेताना , आपण टिचकी मारून पाहतो , हलवून पाणी किती आहे” , याची खात्री करूनं घेतो मग इथे तर, संपूर्ण जन्माचा निर्णय , आपण इतक्या गाफीलपणे कसा घेतला ? असा प्रश्न तिला पडला की देशमुख कुटुंबाची जमीन जुमला, गाडी घोडे, मोठा वाडा , यामुळे आपली दिशाभूल झाली ? तिच्या मनात , भावनांचा कल्लोळ उठला . या कुशीवरून त्या कुशीवर, असं करत, तिची रात्र संपत नव्हती…पहाटे,पहाटे तीचा डोळा लागला.
जेव्हा ती जागी झाली ..तेव्हा .आपल्या पुढे काय ताट वाढून ठेवले आहे याची तिला आता कल्पना आली. आई वेगळी वाढलेली अश्राप पोर , म्हाताऱ्या आजीला काय सांगणार? सासू , सासऱ्याकडून, या नाजूक विषयाला आता कशी वाचा फोडायची असा ती विचार करू लागली. अनेक महिने असेच निघून गेले. नव्याची नवलाई . हळू हळू कमी व्हायला लागली. सासू तिला “पाळणा कधी हलणार“ असे प्रश्न विचारू लागली.
सासूने या नाजूक विषयावर बोलायला सुरवात केली ….“तुझ्या मधेच काही प्रॉब्लेम असणार ! आमचा मुलगा म्हणजे खणखणीत नाणे आहे. जा! सर्व टेस्ट करून घे “असं सासूबाईचे फर्मान निघाले . तिने सर्व टेस्ट केल्या ; CT स्कॅन, , अल्ट्रा साऊंड, ovary रिपोर्ट. Polycystic ovary syndrome हल्ली म्हणे त्यात cyst असल्याने, स्त्रियांना गर्भधारणा होत नाही. मात्र तिचे सर्व टेस्ट रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आले. मग तेथील डॉक्टर साहेब म्हणाले की “आता तुमच्या नवऱ्याला घेऊन या . त्याच्या वीर्यात किती शक्ती आहे त्याचे परीक्षण करायचे आहे” . खूप आढेवेढे घेतल्यानंतर तिचे , “हे”, ही पौरुषाची परीक्षा करायला तयार झाले . सासूबाई तर संतापल्याच! “तुझ्यातच काही खोटअसणार डॉक्टर समोर विवस्त्र होण्यास “त्यां”नी सपशेल नकार दिला. तरीही कशी तरी sperm count ची परीक्षा झाली. त्याचे रिपोर्ट्स येण्यास अजून दोन दिवस होते.
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रश्नांची उकल , फक्त जीवाभावाची मैत्रीणच करू शकते. तिने तिच्या जीवस्य-कंठस्य मैत्रिणीला फोन केला
“अग काय म्हणतेस ? कसा झाला मधूचंद्र ?”
तिने केलेली टोलवा टोलवी. तिच्या मैत्रिणीला समजली
“मला सांग पाहू काय प्रॉब्लेम आहे” ?
“अग, माझे “हे”, प्रथम पुरुषी , एक वचनी , पुरुषच नाहीत ग ! आता टेस्ट रिपोर्ट्स यायचे आहेत. पण हे कटू सत्य आम्हा दोघांना, आधीच माहिती आहे ”
या कठोर सत्याला सामने जाण्याची “त्या”ची तयारी नव्हती म्हणून “त्या”ने आधीच रडून भाकुनं , कोपरापासून नमस्कार करून , तिची माफी मागितली .ओक्शाबोक्शी रडत होता तो!
“मी तुझा शंभर अपराधी आहे! मला माफ कर!”
“आता यावर काय उत्तर आहे , सांग ना ?”
रिपोर्ट्स आले , अपेक्षेप्रमाणे “तो ” नपुंसक निघाला…आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा…….तिने ठरवले. मनात एकवार सगळ्याची उजळणी केली. भराभरा चालत जाऊन तिने पुढच्या नाक्यावरून टॅक्सी पकडली. पुढच्या दहा मिनिटात ती तेथे पोहचली. दाराची बेल वाजवली…. काहीच प्रतिसाद नाही म्हटल्यावर कडी वाजवली. दार उघडेच होते . तिने ते किलकिले केले. आत डोकावताच तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही……
पहा …पुन्हा एक नवीन सुरवात, ज्याला कधीच शेवट नाही…