— शिल्पा धर्माधिकारी —
(ही कथा तुम्ही इथे ऐकूही शकता https://anchor.fm/maharashtra-mandal-bengaluru/episodes/ep-e1jvj4b)
आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक का आपल्या बाहूपाशातील चांदणीचे अधिक त्याला ठरवता येईना. आपल्याच भाग्याचा हेवा त्याला वाटायला लागला. तेवढ्यात… काळ्या मेघांनी चांदण्यांना झाकून टाकले. आणि बघतो तर काय त्याच्या मिठीतही कोणीच नव्हते.
तो भानावर आला. सत्य आणि आभास ह्यातली रेषा पुसट झाली होती. त्याचे पुन्हा भान हरपले….
हा त्याचा जणू रोजचाच खेळ झाला होता. सुखाच्या अभासामध्ये रमण्याचा आणि सत्याच्या जाणिवे नंतर दुःखाच्या खाईत तडफडत राहण्याचा.
तिच्या आठवणीने व्याकुळ झालं की, तो तिच्या जुन्या आठवणी मध्ये रमत असे.
तो बाल्कनीमधील तुळशी वृंदावनपाशी येऊन थबकला. इथेच, इथेच तर ती उभी आहे तुळशी वृंदावनाजवळ. तिथे दीवा तेवत होता. उदबत्तीच्या घमघमाटने घर भरून गेलं होतं. अगदी तसंच पूर्वी सारखं. तुळशीच्या वाळलेल्या झाडाने त्याच्या बोटाला जखम झाली. वेदनेच्या जाणिवेनं तो भानावर आला. घरात, बाल्कनीमध्ये सगळीकडे अंधार, फक्त मनात तेवत होती ती तिच्या आठवणीची ज्योत.
आताशा जवळपास घराबाहेर जाणं त्याने बंदच केले होतं. कोणाला भेटण्याची इच्छा शून्य. फक्त तिची आठवण उराशी बाळगत एका खोलीत कुढत बसायचा. कधी इच्छा झालीच तर घराजवळच्या तिला आवडणार्या तळ्याकाठी जायचा, एकटाच. तळ्याच्या पाण्यात तिचा चेहरा दिसतो का ते पहात रहायचा. तिथे ती भेटेल ह्या खोट्या आशेनं, जे होणारच नाही त्याच्या अपेक्षेनं. मग मनाशीच बोलायचा.
“हे काय होऊन बसलंय. मीच, मीच कारणीभूत आहे याला, हो मीच.”
हसतमुख, आनंदी, उत्साही, बडबडणारी आणि तरीही शांत स्वभावाची उमाकाकूंची “प्रिया”, त्याची बाल मैत्रिण. लहानपणी एकत्र खेळलेल्या जोडीदाराशी, आता तरुणपणी प्रत्यक्षात संसार मांडता यावा अस त्याला वाटायचं.
तिच्या बोलक्या डोळ्यांमध्ये त्याच्या विषयीचे प्रेम शोधण्यासाठी असंख्य बहाणे बनवत मुद्दाम तिला भेटायला जायचा. तिच्या प्रत्येक भेटीमध्ये त्याला अगदी सिनेमात दाखवतात तसेच काहीसे सातारीचे स्वर झंकारलेले ऐकू यायचे. मनमोहक मोगऱ्याचा सुगंध वार्यावर दरवळायचा. तिच्या मनाचा कौल मात्र त्याला काही केल्या कळत नव्हता. पण एक दिवस त्याने तिला खिडकीच्या पडद्या आडून चोरून बघताना पाहिलं आणि त्याच्यावरच्या तिच्या प्रेमाची साक्ष त्याला मिळाली.
एकदिवस हिम्मत करून त्याने धडधडत्या छातीने तिला लग्नाची मागणी घातली आणि काहीही आढेवेढे न घेता तिने चक्क होकार दिला. तो आनंदाने आणि तरीही आश्चर्याने म्हणाला, “इतक्या पटकन होकार दिलास? ” त्यावर ती छानशी हसत म्हणाली, ” शुभ काम में देर किस बात की!” अन् ती छानशी लाजली.
लग्न झालं. सुखी संसार सुरू झाला. त्या संसाराला चिमुकल्या दोन कळ्या उमलल्या. मुलींच्या किलबिलाटने घर भरून गेलं. मुलींमध्ये तो त्यांच्यातला होऊन खेळायचा, त्यांच्याबरोबर मस्ती करायचा.
उत्साही प्रिया घर सजवत होती. घराची चौकट फुलवत होती. संसार आनंदने आणि सर्वस्व झोकून देऊन सांभाळत होती. बहरणार्या संसाराबरोबर त्याची नोकरीतील प्रगती देखील उंचावत होती. बायको मुलींमध्ये रमणारा तो हळूहळू घरात कमी अणि ऑफिस मध्ये जास्त राहू लागला. कधी कधी अडून ती त्याला त्या विषयी टोकातही असे. पण त्याची करियरची नशा तीव्र होऊ लागली होती. नंतर नंतर कंटाळून तिनं त्याला टोकणं ही सोडून दिलं. नवर्याच्या करियरमुळे तसही तिचं सोशल लाइफ फारच कमी होतं. मग काळाच्या गरजेनुसार मुलींना अवांतर शिक्षणाच्या क्लासेसना घेऊ जाणं, नवनवीन पदार्थ बनवणं ह्यात तिनं स्वतःला रमवून घेतलं होतं. परंतु त्याच्याबरोबर फिरणं, मनमोकळेपणानं बोलणं किंवा नुसतेच एकमेकांसोबत रहाणं हे सगळं ती मिस करत होती. प्रियाला त्याची सोबत कायमच हवी हवीशी वाटायची. “नुसती सोबतही खूप काही बोलून जाते रे.” असे ती नेहमी म्हणायची. पण आता तो तिच्या वाट्याला कमीच येत होता. ती कुठेतरी गृहीत धरली गेली होती. शांतता प्रिय असलेल्या प्रियाने न कुरकुरता ते स्वीकारलं होतं.
कधी कधी मुलींच्या हट्टा खातर तो त्यांना बाहेर घेऊन जाई, पण तेही क्वचितच. मुली मोठ्या आणि स्वतंत्र होऊ लागल्या तशी तिला त्याची घरात कमी असण्याची जाणीव जास्त तीव्र जाणवू लागली. एकटे पडल्याची भावना बळावू लागली.
कधीतरी त्याने आपल्या सोबत राहावं, बाहेर फिरायला न्यावं असं तिला खूपदा वाटायचं. तेव्हा तो “अगं आत्ताच तर करियर करायचं वय आहे, फिरायला काय आयुष्य पडलंय” असं म्हणायचा. आणि तिच म्हणणे मात्र “never postpone the happiness. आनंदासाठी मुहूर्त शोधू नये माणसाने.” परंतु त्याची करियरची नशा अधिक तीव्र होऊ लागली होती. त्यामुळे तो तिच्या अशा वाक्यांना सोईस्कररित्या इग्नोर करत होता.
मुली जरी मैत्रिणी होत्या तरी त्यांच्या लग्नानंतर त्यांचं स्वतंत्र आयुष्य बनल होतं. अचानक त्यांच्या प्रायोरिटीज् बदलल्या होत्या. त्याही नोकरी निमित्याने गाव सोडून दुसरीकडे रहायला गेल्या. आता एकटेपणाच्या जाणिवेनं प्रिया गांगरली, घाबरली. वयोपरत्वे होणार्या मानसिक आणि शारीरिक बदलामुळे जास्त भावूक बनली, भित्री बनली होती. कोणीतरी सोबत असावं अशी सतत जाणीव तिला होऊ लागली.
एक दिवस शेवटी ती त्याला स्पष्टपणे म्हणाली, “मुलींच्या लग्नानंतर मी एकटी पडलीय आहे रे. मला तुझ्या आधाराची गरज आहे. माझ्यासाठी थोडा वेळ दे. आपण दोघे कुठेतरी फिरून येऊ.” त्याला तिचा एकटेपणा कळत होता, त्रास समजत होता पण तो हतबल होता. नोकरीच्या कमिटमेंटस् त्याला दुसर्या कशा कशाचीच परमिशन देत नव्हत्या. करियरमध्ये तो खूप पुढे निघून गेला होता. मोठ्या जबाबदार्या पैसा तर देत होत्या, पण कुटुंबाबरोबर जगण्याचा आनंद फारच कमी मिळत होता. तो तिला म्हणाला “बस अजून एक दोन वर्षे रिटायर्डमेंटेला! मग बघ मी आणि तू कायमच एकत्र. तू म्हणशील तिथे मी तुला घेऊन जाईन. ”
त्याच्या ह्या बोलण्यावर ती नुसतीच हसली. “वर्ष दोन वर्षे किंवा जास्तीही, नाही का? म्हणजे ५००-६०० दिवस.” खूप जोरात ओरडत जवळपास मनात साठलेला एकटेपणाचा आक्रोश तिच्या आवाजातून बाहेर पडला आणि जोरात हसत ती म्हणाली, “अरे एक दिवस मला एकटीला जगणं अवघड झालं आहे आणि तू अजून काही शे दिवस माझ्याकडे मागून घेतो आहेस. माझी मानसिकता तुला कळते आहे का?” आजपर्यंत त्यानं तिचं असं रूप कधी पाहिलंच नव्हतं. त्याने पटकन तिचा हात हातात घेतला. “प्रिया, शांत हो.” पण ती बोलतच राहिली “किती वेळा सांगतेय तुला, मी खूप एकटी पडलेय. मला घर खायला उठतय, मला घर खायला उठतय, तरीही तुला ते कळतच नाहिये.” “तसं नाहिये प्रिया. मला सगळ कळतंय. फक्त मला थोडा वेळ दे.” असे म्हणत त्याने तिला शांत केल. तिच्या ह्यावेळच्या बोलण्याला त्याने खूप सिरियसली घेतलं होतं. कामे लवकरात लवकर संपवून, जबाबदारीतून मुक्त व्हायचं आणि फक्त तिच्यासोबत रहायचं. त्याने त्या दृष्टीने कामे लवकर संपविण्याचा सपाट लावला. त्यामुळे तो कामात परत बिझी झाला. तिला मात्र त्याचाकडून असलेली शेवटची आशासुद्धा संपुष्टात आली असं वाटायला लागलं. हळूहळू ती अंतर्मुख होऊ लागली, आतून खंगु लागली. कामाच्या व्यापात तिच्यात होणारा हा बदल मात्र त्याच्या लक्षात आला नाही. त्याला वाटलं, त्यानं जे काही तिला समजावलं आहे ते तिला पटलंय आणि तिला धीर देणारं पण वाटलंय. पण उलट तिच्या मनाची परिस्थिती अजूनच बिकट होऊ लागली होती.
एक दिवस तो दार उघडून घरात शिरला. घरात अंधार होता. तिला आवाज देत प्रत्येक खोलीत शोधत होता. शांत असलेलं घर त्याच्या प्रियाला दिलेल्या आवाजाने घुमत होतं. अखेर त्याला ती मुलींच्या खोलीत एका कोपर्यात घाबरून बसलेली दिसली. तो जवळ जाताच ती त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली “बर झालं तू आलास ते. मी एकटी असल्याचा फायदा घेत तो घरात शिरला. तो.. तो.”
“तो? तो कोण? “
“चल मी तुला दाखवते. ” असं म्हणत ती जवळपास खेचतच त्याला घेऊन गेली, जणू ती कोणाचा तरी पाठलाग करत होती आणि म्हणत होती, “तो बघ, तो बघ, तुला पाहून कसा पळतोय बघ तो.”
काय घडतंय हे कळायला त्याला काही क्षण लागले. तो थांबला आणि त्याने तिचे दोन्ही खांदे पकडत तिला हालवल आणि जोरात ओरडत म्हणाला, “भानावर ये प्रिया”. तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. पण आज त्याला तिच्या डोळ्यात वेडसरपणाची झाक स्पष्ट दिसली. तो घाबरला.. त्याने तिला घट्ट मिठी मारली. त्याला तिचं वाक्य आठवलं, “NEVER POSTPONE THE HAPPINESS”, “मी तिला माझ्यासोबतीचा आनंद नाही देऊ शकलो?” त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. “शुभ काम में देरी किस बात की!” म्हणणाऱ्या प्रियाच्या बाबतीत मात्र त्याच्याकडून उशीर झाला होता. तिला सावरण्याला त्याला वेळच मिळाला नाही. तिच्या ह्या परिस्थितीला आणि त्यातच झालेल्या तिच्या मृत्यूला तो स्वतःलाच कारणीभूत समजू लागला आणि तिच्या जिवंत असल्याच्या आभासाला घट्ट कवटाळून बसला, कायमचा.