— विशाखा पेंडसे-पंढरपुरे —
लहानपण ते मोठेपण या प्रवासात, वेळोवेळी कराव्या लागणार्या लहानमोठ्या प्रवासांची कारणं आणि साधनं काळानुरूप बदलत गेली. लहानपणी लांबचे प्रवास कधी कुटुंबाबरोबर नातेवाईकांकडे जाण्याच्या निमित्ताने, तर कधी मित्रमैत्रिणींबरोबर शाळेच्या सहलीच्या निमित्ताने घडायचे. प्रवासाचं साधन मुख्यतः एसटी. लहानपणी प्रवासाची चिंता अजिबात नसायची, उलट गंमतच वाटायची. काही लहानमोठी गैरसोय जरी झाली, तरी प्रवासाचं अप्रूप इतकं असायचं, की त्या गैरसोयींचंही काही वाटायचं नाही. मग एसटीच्या गर्दीत धक्के खात उभं रहायला लागो, नाहीतर चाक पंक्चर झाल्यामुळे अर्ध्यापाऊण तासाचा खोळंबा होवो. एखाददुसरा प्रसंग सोडला, तर गाडी लागण्याचा फारसा त्रास आम्हाला कुणाला कधी झाला नाही. त्यामुळे प्रवासाची मजा पुरेपूर घेता येत होती.
श्रीवर्धन तालुक्यातलं आमचं गाव लहान असल्यामुळे आम्हाला ’हॉटेलमध्ये जाऊन खाणं’ या गोष्टीची सवय नव्हती. त्यामुळे एसटीने मुंबई-पुण्याला जाताना बाहेरचे बटाटेवडे, इडली-डोसे वगैरे खाण्याचं, किमानपक्षी उसाचा रस पिण्याचं एक आकर्षण असे. नवनाथ, कानिफनाथ अशा नावांची रसवंती गृहं, उसाच्या चरकाला लावलेल्या घुंगरांच्या मंजुळ आवाजाचं पार्श्वसंगीत आणि जाड तारेच्या खास ट्रेमध्ये ठेवलेले, फेसाळलेल्या गारेगार उसाच्या रसाचे काचेचे पेले घेऊन एसटीच्या खिडकीशी येणारा विक्रेता हे दृश्य अगदी हवंहवंसं वाटायचं.
एसटी स्थानकावरच्या दुकानांमधून किशोर, ठकठक, चंपकसारखी साप्ताहिकं, मासिकं मिळत. हेही एक मोठं आकर्षण असायचं. नंतर खूप दिवस पुरवून पुरवून त्यातल्या गोष्टी वाचणं, कोडी सोडवणं, चित्रं रंगवणं असं सगळं चालायचं.
आमच्या भागातून पुण्याला जाण्यासाठी तेव्हा वरंधा घाट वापरला जायचा. त्या घाटातल्या कठीण वळणांवर भीती वाटायची खरी, पण पावसाळ्यात खाली उतरलेले ढगही त्याच वळणांनी दाखवले. ताम्हिणी घाटात अशी कठीण वळणं नसली तरी, किंबहुना नसल्यामुळेच वरंधा घाटाची मजाही त्यात नाही. एकदा रात्रीच्या वेळी वरंधा घाट उतरताना चक्क एक बिबट्या आमच्या समोरून उडी मारून रस्ता ओलांडून गेला होता.
माझ्या बाबांकडे ’राजदूत’ मोटरसायकल होती. जवळपासचे, म्हणजे शंभर किलोमीटरच्या आतले प्रवास बाबा मोटरसायकलवरच करायचे. मी बाबांबरोबर मोटरसायकलवरून बर्याच वेळा केलेले प्रवास म्हणजे गोरेगावच्या आत्याकडे आणि जंजिरा-मुरुडला आजोळी. गोरेगावला जाताना रस्त्याच्या आजूबाजूला दाट झाडी आहे. एकदा सकाळच्या वेळी गोरेगावला जाताना रस्त्याच्या कडेला रानडुकरांचं कुटुंब दिसलं होतं. मादी आणि तीनचार पिल्लं असावीत. एकदा घराजवळच्या एका रस्त्याच्या वळणावर अवचित दोन मोर समोर आले होते. ससेही दिसायचे कधीकधी.
जंजिरा-मुरुडला जाण्याच्या प्रवासाची वेगळीच मज्जा असायची. आधी आमच्या गावापासून गाडीवरून किंवा एसटीने दिघीला. मग लॉन्चमध्ये बसून दिघी ते आगरदांडा/राजपुरी ही खाडी पार करायची. लॉन्चचं तिकीट एसटीच्या तिकिटापेक्षा वेगळं, जाड, रंगीत कागदाचं असायचं. लॉन्चमधून फक्त माणसंच नाही, तर मोटरसायकली आणि स्कूटर्सचीही वाहतूक चालायची. तिथे काम करणारी माणसं या जड गाड्यासुद्धा लीलया लॉन्चच्या टपावरदेखील चढवायची. खारा वारा खात हा प्रवास मजेत पार पडायचा. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वार्याचा वेग जास्त असायचा. त्यामुळे लॉन्च हेलकावे खायची. ज्यांना या प्रवासाची सवय नसायची, ते प्रवासी घाबरायचे. आम्ही मात्र दरवर्षी नेमाने प्रवास करत असल्यामुळे शूर! आता हाही प्रवास सोपा झालाय. मोठ्या फेरी बोटीतून चारचाकी गाड्याच नाही, तर बसही आरामात नेता येते.
एकदा या मार्गाने मी बाबांबरोबर मोटरसायकलने अलिबागला गेले होते. आठवी-नववीला असेन. शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर घरून निघालो. मुरुडमार्गे अलिबागला पोचलो. तिथलं काम आटपून दुपारनंतर परत निघालो. पण थोडा उशीर झाला आणि राजपुरीहून दिघीला जाणारी संध्याकाळची शेवटची लॉन्च चुकली. आता काय करायचं! खरं म्हणजे दुसर्या दिवशी रविवार असल्यामुळे मुरुडला आजीकडे राहून सकाळी घरी येणं हा पर्याय चांगला होता, पण रविवारी नेमकं आमच्या शाळेत कसलंतरी शिबिर होतं आणि मला ते चुकवायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही खाडीला वळसा घालून यायचं ठरवलं. बाबांना तळा-इंदापूरवरून जाणारा तो मार्ग साधारण ठाऊक असला तरी पक्का माहिती नव्हता. गूगल मॅप्स ही संकल्पना जगात अस्तित्वातच नसण्याचे ते दिवस. काळोख पडायला लागला होता. आम्ही तळ्याला जाणार्या रस्त्याला लागलो. कुठलं तरी वळण चुकलं किंवा एखादा फाटा घ्यायचा राहिला असावा, पण आम्ही रस्ता चुकलो हे खरं. रात्रीची वेळ. निर्जन रस्ता. आपला रस्ता चुकला असण्याची शंका बाबांना आली होती, पण नेमकं कुठे चुकलो हे लक्षात येत नव्हतं, त्यामुळे मागे फिरण्याऐवजी पुढे दुसरा एखादा रस्ता सापडेल अशा अपेक्षेने आम्ही पुढे जात होतो. तेवढ्यात समोरून स्कूटरवर येणारं एक जोडपं भेटलं. त्यांना थांबवून आम्ही तळ्याकडे जाणारा रस्ता विचारल्यावर त्यांनी आम्हाला नेमकं कुठे जायचंय याची चौकशी केली. बाबांनी ’श्रीवर्धन’ म्हटल्यावर ते अचंबित झाले. कारण श्रीवर्धन तसं तिथून बरंच लांब आणि वेळ रात्रीची. ते इंदापूरचे होते आणि घरीच जात होते. ते म्हणाले, आमच्या पाठोपाठ या. मग उलट्या दिशेला वळून आम्ही त्यांच्यापाठोपाठ जात राहिलो आणि तळ्याला न जाता वेगळ्याच रस्त्याने अर्ध्या तासात इंदापूरला पोचलो. इंदापूर हे मुंबई-गोवा महामार्गावरचं ओळखीचं गाव. तिथून पुढे मग काहीच अडचण उरली नाही आणि रात्री साडेदहाच्या सुमारास आम्ही घरी पोचलोसुद्धा! घरी आई आणि आजी अर्थातच काळजी करत वाट पहात होत्या. माझं ते वय काळजी करण्याचं नसल्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास म्हणजे एक साहसी, पण मजेचा अनुभव ठरला.
जेव्हा प्रवासाची जबाबदारी आपल्यावरच येते, तेव्हा मात्र या प्रसंगांचं गांभीर्य समजायला लागतं. तीन वर्षांपूर्वी मी आणि माझ्या एका ताईने एका निसर्गनिरीक्षण शिबिराला जाण्याचा बेत आखला होता. डेहराडूनपर्यंतचा प्रवास आमचा आम्ही करायचा होता. तिथून पुढे सगळे सदस्य एकत्र असणार होते. आम्ही दुपारी विमानाने दिल्लीला पोचलो. डेहराडूनला जाणारी ट्रेन रात्री १०.२५ ची होती. वेळ होता, म्हणून ताईच्या एका परिचिताकडे जायचं ठरवलेलं होतं. त्यांच्याकडे जाऊन, भरपूर गप्पा मारून, जेवून आम्ही साडेआठच्या सुमारास स्टेशनवर जाण्यासाठी टॅक्सीने निघालो. साडेनऊपर्यंत पोचू असा अंदाज होता. साडेनऊच्या सुमारास आम्ही स्टेशनपासून एखाद्या किलोमीटरवर पोचलोही, पण त्यानंतर मात्र वाहतुकीच्या प्रचंड मोठ्या कोंडीमध्ये अडकलो. टॅक्सी मिनिटाला एखाद्या सेंटीमीटरने पुढे सरकत होती. दहा वाजून गेल्यावरही कोंडी सुटण्याची काही चिन्हं दिसेनात, तेव्हा मात्र आम्ही टॅक्सीतून उतरलो आणि सामान घेऊन शक्य तितक्या वेगाने चालत-धावत स्टेशनच्या दिशेने निघालो. सव्वादहा वाजून गेले आणि आम्ही स्टेशनवर पोचलो खर्या, पण नेमक्या पूर्ण उलट्या बाजूच्या फलाटावर. ट्रेन होती १ क्रमांकावर आणि आम्ही होतो १६ वर. तेवढ्यात, हल्ली स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी असतात, त्यातली एक विजेवर चालणारी गाडी सुदैवाने आम्हाला दिसली. त्या गाडीवाल्याने आम्हाला बरोब्बर आमच्या डब्यासमोर नेऊन उतरवलं, आम्ही ट्रेनमधे जाऊन बसलो आणि घड्याळात बघितलं तेव्हा १०.२३ झाले होते! आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.
प्रवासात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे, आपण ठरवल्याबरहुकूम होत नसतात. अनिश्चितता हा एक महत्त्वाचा घटक सतत आपल्याबरोबरच प्रवास करत असतो. पण खरं सांगायचं तर अनिश्चितता आहे म्हणून प्रवासाला गंमत आहे आणि आयुष्यालाही!
