— उज्वला तायडे —
आज हवा अवखळपणे वाहत होती, वेगळाच रुक्षपणा होता हवेत.सवयीप्रमाणे रोजनिशी लिहायला घेतली होती त्याने. बेधुंद वाऱ्याने त्याच्या डायरीची पाने फडफडत होती.आकाशात आज शुक्राची चांदणी नेहमीपेक्षा जरा जास्तच टपोरी दिसत होती.आकाशातील तारकांकडे एकसारखा बघत होता.
तिची वाट बघत तो तीन तास कानात हेडफोन घालून धुंद मधुमती रात रे नाच रे …सारखी जुनी गाणी ऐकत बसला होता. जणू काही एक एक मिनिट एका तासाचे झाले होते .गाणे ऐकताना त्याला पहिल्यांदा जाणीव झाली, की तिनेच त्याच्या मनामध्ये आपल्या नवऱ्याचा खून करण्याची कल्पना रुजवली होती.आता त्याचा खुनाचा विचार बदलला होता.त्याला कारणही तसंच होतं.
त्याच्या डोक्यात तिचे वाक्य फिरत/आठवत होते, ‘की जीवनात योगायोग घडतात. लोक आजारी पडून किंवा ॲक्सिडेंटमुळे मरतात.’
वास्तवात तिची ही योजना होती .
अंधार पडल्यावर ती आपल्या कारमधून आली.
ती आपली कार गॅरेजमध्ये पार्क करून भराभर जिना चढून मुख्य प्रवेशद्वारापाशी आली. तिने बरोबर तिच्या नवऱ्याच्या गाढ झोपेची वेळ साधली होती.तिला येतांना बघून तो खोलीतून हॉलमध्ये गेला आणि गुपचूप एका सोफ्याच्या मागे दडला.त्याला त्याचा प्लॅन बदलला हे सांगायला वेळच मिळाला नाही. मुख्य दरवाजा उघडून ती हॉलमध्ये आल्याचे त्याला आवाजावरून समजले. ती आली क्षणभर इकडे तिकडे बघून हॉलमध्ये जाऊन जिना चढून वर गेली. ती गेल्यावर तो हळूच हॉलमध्ये आला आणि हॉलचा दरवाजा लॉक करून किल्ली त्याच्या खिशात टाकली. कानोसा घेत उभा होता. ती पॅसेजमधून त्याच्या खोलीकडे जात असल्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. थोड्यावेळाने सर्व्हन्ट रूममधील बेल वाजल्याचा आवाज त्याला ऐकू आला. जिन्यावरील जाड कार्पेटमुळे त्याच्या बुटांचा अजिबात आवाज होत नव्हता.
नेहमी नोकर तिने बेल वाजवली, की ताबडतोब हजर होत असत.पण आता तसे झाले नाही. दरवाजा त्याने मुद्दामच किंचित उघडा ठेवला होता. यावेळी पुन्हा एकदा बेल वाजली. त्याने दरवाजाच्या फटीतून बघितले, तिच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव त्याला स्पष्ट दिसत होते. नेहमीप्रमाणे तिने तिचा काळा फ्रॉक घातला होता. ती जिन्याच्या कठड्यावरून पुढे हॉलमध्ये वाकली आणि कानोसा घेऊ लागली. हॉल मधून फक्त भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. तिने नोकरांच्या खोलीचा नंबर फिरवला. दुसऱ्या बाजूने काहीच उत्तर न मिळाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव होते मग भराभर जिना उतरून खाली गेली. तो हळूच बाहेर पडला आणि जिन्याच्या कठड्याला टेकून हॉलमध्ये बघू लागला.
तिने मोठ्यांदा मला हाक मारली. दरवाजा उघडा ठेवल्याने तिथून ती नोकरांच्या खोलीत फोन करत असल्याचे त्याला समजले. त्याने पावलांचा आवाज न करता भरकन जिना उतरून खाली आला. तिने रिसीव्हर खाली ठेवल्याचा आवाज त्याला आला. तो झटकन एका शोभेच्या मूर्ती आड लपला. ती परत हॉलमध्ये आली. आता ती खूप अस्वस्थ दिसत होती. तिने अंधाऱ्या हॉलमध्ये बघितले. ती खूपच घाबरल्यासारखी दिसत होती. तो तिच्याकडे बघत होता. तिची भीती वाढतच होती.
‘इथे कोणी आहे का?’ तिने उंच कंपित आवाजात विचारले.
उत्तरादाखल निरव शांततेला भेदत भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती… तीने आवाजाचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला.
‘सगळे नोकर एकदमच सोडून जाऊ शकत नाहीत…’ ती स्वतःशीच पुटपुटली, तिने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण त्याने दरवाजा लॉक केला होता. तो गुपचूप मोठया मूर्ती आडून पुढे आला. ती दरवाजा उघडायचा कसोशीने प्रयत्न करत होती.
तो हॉलच्या मध्यभागी उभे राहून म्हणाला, ‘मी दरवाजा लॉक केला आहे.’ ती वळली. तिच्या तोंडून अस्फुट किंचाळी बाहेर पडली.त्याला समजायला मार्ग नव्हता किंचाळी त्याची की तिची. ती त्याच्याकडे बघत त्या प्रचंड दरवाजाला टेकून उभी राहिली.
तिचे निळे डोळे भीतीने विस्फारले होते.
त्याने विचारले,‘तू घाबरल्यासारखी दिसत आहेस. ‘
‘तू माझ्याकडे अशा नजरेने का बघत आहेस?’ ती घोगऱ्या स्वरात म्हणाली. तो हसला ‘ते सगळे नोकर गेले. मी त्यांचे पैसे देऊन टाकले. आता आपल्या दोघांशिवाय इथे कोणीही नाही.’
ती मुख्य दरवाजापासून सरकली व त्याच्याभोवती फिरू लागली. तो तिचा डोळ्यांनी पाठलाग करत होता. ‘घाबरली आहेस का तू?’
मला तुझ्याशी बोलायचे आहे.’
‘मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही. आपण दोघांनी एकत्र इथे असता कामा नये. मी आज रात्री निघत आहे ठरल्याप्रमाणे.’
‘मला नाही वाटत तू आज रात्री इथून जाऊ शकशील.’ ‘मी तुझे अभिनंदन करायला विसरलो. या प्रचंड घराची मालकीण बनल्यावर तुला कसे वाटत आहे?’
‘त्याने माझ्यासाठी मृत्युपत्रात संपत्ती माझ्या नावावर केली यात यात माझी काय चूक?’ ती एका दमात बोलली. ‘मला या खूनात फसवायची आयडिया तुझी होती हे तुला चांगलेच माहित आहे.’
‘नाही, ही माझी आयडिया नव्हती! तुला आता माझ्याशी लग्न करावेसे वाटत नाही.
तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी वर सामान पॅक करण्यासाठी जात आहे.’
तो तिच्याकडे बघून हसला. ‘हा खून आपण दोघांनी केला आहे हे नोकराला समजले आहे. तो आज इथे आला होता. आपण दोघांनी हा खून कसा केला असावा याची पूर्ण कल्पना त्याला आहे.
ती भितीने पांढरीफटक पडली. ‘तू खोटं बोलत आहेस!’
ती झटकन मागे सरकली. ‘तू त्याला काय सांगितलेस?’ तिने भेदरलेल्या आवाजात विचारले.
‘मी त्याला आपण खून केला आहे हे सिद्ध करण्यास सांगितले आहे. मला नाही वाटत तो हे सिद्ध करू शकेल. पण जर त्याला यश आले, तर माझ्या बरोबर तू सुद्धा फासावर लटकशील.’
‘तू मला उगाचच घाबरवतो आहेस. तू खोटे बोलत आहेस.’
‘तो काहीही सिद्ध करू शकणार नाही!’
‘तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस, हो ना?
‘तू जा इथून.’ ती मागे सरकत म्हणाली.
‘तो म्हणाला, मी मनात काय विचार करतो आहे याचा तुला अंदाज आहे ? मी तुला ठार मारणार आहे. तुला ठार मारून मी सहीसलामत सुटेन, की नाही याचा मी विचार करत आहे.
‘तू वेड्यासारखे बोलत आहेस!
‘तुला मारणे बरोबर होणार नाही. पण मी तुला सहजासहजी सोडणारही नाही. तुझ्यावर मी वेड्या सारखे प्रेम केले. मला तुझ्याशी लग्न करायचे होते. तू मात्र माझ्याशी खेळत होतीस.
ती अचानक जिन्यावरून खाली धावली. जिन्याच्या शेवटच्या पायरीवर ती अडखळून खाली पडली. तो तिला पकडणार, इतक्यात तिने धाव घेतली.
‘माझ्या पासून दूर राहा!’ ती जोरात बोलली.
‘तुला वेड लागले आहे!’
तिने एका झटक्याने पिस्तूल काढले.
तिने त्याच्या दिशेने पिस्तूल रोखून धरली.
तो मागे सरकला. तिच्या हातातले पिस्तूल आणि तिच्या चेहऱ्यावरचे भयंकर भाव बघून घाबरला होता. ‘होय मी तुला फसवले आहे आणि मूर्ख देखील बनवले आहे. मला हे आधीच माहिती होते, की सगळे पैसे त्याने माझ्या नावावर केले आहेत.त्याचा पैसा मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष कशाला वाट बघायची म्हणून मी तुझ्याकडून त्याचा खून करून घ्यायचा प्लॅन आखला.’ ती पुढे झुकली, ‘तुझ्याशी लग्न करू? मी तुझा तिरस्कार करते.
त्याने खिशातल्या किल्लीने मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले आणि दरवाजा उघडा ठेवून तो बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने तिच्याकडे वळून बघितले.
‘आज रात्री तू या घरात एकटी नाहीस. त्याचे भूत तुझ्या सोबतीला असेल.’
ती हसली आणि त्याच्या जवळ येऊन त्याचा हात हातात घेतला.
‘आपण इथून बाहेर पडू आणि मग बोलू.दोघे बाहेर पडले.
त्याने कार पार्किंगमध्ये लावली आणि लिफ्टमधून सगळ्यात वरच्या मजल्यावर गेला. भराभर पावलं टाकत तिच्या खोलीच्या दिशेने गेला. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा असे ठरवूनच तो आला होता. एरवी बंद असणारा तिच्या बेडरुम चा दरवाजा आज उघडाच होता . ती त्याची वाट बघत ,त्याच्या आवडीचा परफ्यूम लावून खिडकीत पाठमोरी ऊभी होती.ओठांचा चम्बु करून तिने डोळ्यांनीच इशारा करून त्याला खोलीत यायला सांगितले. तो मात्र इतक्या लवकर कपडे कसे बदलले या विचारतच होता .तिने शुभ्र रंगाचा सिल्कचा पातळ ड्रेस घातला होता.क्षणभर त्याचे डोके सुन्न झाले. पण त्या ड्रेसमध्ये ती इतकी क्यूट दिसत होती, की तो पुन्हा तिच्या मादक सौन्दर्याच्या प्रेमात पडला ,त्याचे भान हरपले.
त्याने तिला जवळ खेचले.
‘मला वाटलं, की त्या विषयावर बोलायला आवडेल. मला स्वतःला काही फरक पडत नाही. तुला त्याच्याविषयी काही सांगायचे असेल तर माझी ऐकण्याची तयारी आहे असे म्हणत तिला बाहुपाशात घेतले.खिडकी उघडी होती ,खिडकीतून आभाळात असलेले तारे चमकत होते.
आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक का आपल्या बाहूपाशातील चांदणीचे अधिक त्याला ठरवता येईना. आपल्याच भाग्याचा हेवा त्याला वाटायला लागला. तेवढ्यात… काळ्या मेघांनी चांदण्यांना झाकून टाकले. आणि बघतो तर काय त्याच्या मिठीतही कोणीच नव्हते.
तो भानावर आला. सत्य आणि आभास ह्यातली रेषा पुसट झाली होती. त्याचे पुन्हा भान हरपले….