दुरावा

— वैशाली चौधरी —

आज रेवती भलतीच खूश होती. तिच्या आणि रामच्या लग्नाला आज एक तप पूर्ण झाले होते. 

“सुट्टी घेत नाहीस तर किमान आज तरी ऑफिसमधून लवकर घरी ये. रात्री जेवायला बाहेर जाऊ, मुलांना पण आनंद होईल,” असे तिने रामला बजावून सांगितले होते. 

संध्याकाळची वेळ झाली. इतक्यात राम येईल असे म्हणून तिने दोन्ही मुलांना तयार केले.

 लाल रंगाची साडी, डोळ्यात काजळाची लकेर, ओठांवर हलकीशी लिपस्टिक आणि क्लिपमध्ये सैलसर बांधलेले केस, अशी रेवतीसुद्धा तयार झाली. आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहून ती खूप खूश झाली, “रेवती मॅडम, अजूनही तुम्ही एकदम  छान दिसता. कुणालाही वाटणार नाही कि तुम्ही दोन मुलांची आई आहात ते…इश्श.. किती ते स्वतःचे कौतुक.हे सगळे रामने म्हणायला हवे….”  आठ वाजून गेले तरी राम अजून घरी आला नाही. फोन लावला तर स्विच ऑफ. वेळ जसजशी पुढे सरकू लागली तसा रेवतीचा पारा चढू लागला. रात्रीचे दहा वाजून गेले. मुले थकून गेली.

“आई, कधी येणार ग बाबा..किती वेळ..आम्हाला भूक लागली ना..”

“बाबांना काहीतरी महत्वाचे काम आले बहुतेक. बाळांनो आपण पुन्हा कधीतरी जाऊ बाहेर जेवायला..आता मी घरीच काहीतरी बनवते ,” असे म्हणून रेवतीने साडीचा पदर कमरेत खोचला, केसांचा अंबाडा बांधला. आणि पटकन मुलांसाठी खिचडी बनवली. गरम गरम मऊसर खिचडी खाऊन मुलेही तृप्त झाली.

“बाळांनो, बाबांना यायला आणखी उशीर होईल, चला बर तुम्ही पटकन जाऊन झोपा.” मुलांना झोपवून रेवती बाहेरच्या सोफ्यात रामची वाट बघत बसली. साधारण साडे अकराच्या सुमारास राम घरी आला. दारावरची बेल वाजताच रेवतीने उठून दरवाजा उघडला. रामाकडे न बघताच ती पटकन वळली आणि आतल्या खोलीत गेली.

“सॉरी रेवती, अगं मी लवकर निघालोच होतो, पण नेमके त्याच वेळी  बॉस ने मला मीटिंगसाठी बोलावले,”

रेवतीने ऐकले तरी रामला काहीच प्रतिसाद दिला नाही.

“सॉरी ना यार, एवढी काय चिडतेस? पुन्हा कधीतरी जाऊ ना,” रेवतीच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत राम तिला म्हणाला.

“हे तुझे नेहमीचेच झाले आहे राम,” रेवतीने त्याचे दोन्ही हात आपल्या खांद्यावरून बाजूला केले.

“अरे यार, इतके काय त्यात?” राम.

“नाही राम, आता मला नाही सहन होत. गेले कित्येक महिने झाले तू रोज उशिरा घरी येतोस. ऑफिसमध्ये काय तू एकटाच काम करतोस का? रविवारच्या दिवशी पण काहीतरी काम काढून तू बाहेर जातोस. मुलांना पण कधीतरी बाहेर पार्कमध्ये घेऊन जाऊ म्हटले तर टाळाटाळ करतोस. किती उत्साहाने दोघे तुझी वाट बघत होते. आधी असा नव्हतास तू राम. आमच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी किती धडपडायचास पण आता…आमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोस…. असा का वागतोस? निदान आपल्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी तरी तू लवकर यायचे होतेस. मला तर वाटू लागले आहे कि तुझे माझ्यावर प्रेम राहिलेच नाही,”

रेवतीच्या डोळ्यात पाणी आले.

“अरे यार, तुम्ही बायका इतक्या भावुक का होता. कुठला विषय कुठे घेऊन जाता,” राम वैतागून बोलला.

“तुम्ही बायका?? अशा किती बायका आहेत तुझ्या आयुष्यात राम??”

“अरे, म्हणजे तसे नाही. मी असेच बोललो, तू उगाच मला शब्दात पकडू नको. आधीच त्या ३ तासाच्या मीटिंगने माझ्या डोक्याचा भुगा झाला आहे,” असे म्हणून राम, फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला.

“खिचडी ठेवली आहे ती गरम करून खाऊन घे, आजच्या दिवशी मला काही खास बेत नाही करता आला, बाहेर जायचे होते ना..” असे म्हणून रेवती बेडवर पहुडली.

“मी जेऊन आलो आहे, मीटिंग बराच वेळ ताणली गेली, त्यामुळे बॉस ने डिनर ऑर्डर केले होते,” राम.

त्यावर रेवती काहीच बोलली नाही. राम तिच्या बाजूला येऊन झोपला सुद्धा. ती मात्र बराच वेळ जागी होती.

“असा का वागत असावा बर राम? काम असते, टेन्शन असते ते सगळे मी समजू शकते. पण इतके??” विचार करून करून ती हि थकून गेली आणि कधी तिचा डोळा लागला ते तिलाही नाही समजले.

सकाळी उठली तर राम आधीच तयार झाला होता.

“मी ऑफिस मधेच नाश्ता करेन. मीटिंग आहे,” असे म्हणून राम निघून गेला.

आता काय बोलायचे हे तिला सुचतच नव्हते. रामचे लवकर जाणे, उशिरा येणे चालूच होते. आधी सकाळचा नाश्ता  आणि रात्रीचे जेवण तरी ते एकत्र करत. पण आता तेही बंद झाले होते. प्रेमाच्या गप्पा तर दूरच, दोघांमधला संवादही आता बंद होत चालला होता. दिवसेंदिवस रामचे फोनवर बोलणेही वाढू लागले. रेवतीसमोर फोन वाजलाच तर तो दुसऱ्या रूममध्ये किंवा बाहेर जाऊन बोलायचं. 

“कुणाचा फोन येतो रे सारखा तुला? आणि माझ्यासमोर नसते बोलायचे का??”

“तुला काय करायचे आहे?? संशय घेतेस का माझ्यावर?” असे म्हणून राम तिच्यावर अक्षरशः खेकसला.

ते ऐकून रेवतीला धक्काच बसला.

“हाच का तो राम जो आपल्यावर जीवापाड प्रेम करत होता.?” तिने रामच्या अशा वागण्याचे कारण शोधायचेच असे ठरवले. “मुले तसेही सकाळी लवकर शाळेत जातात. उद्या राम ऑफिसला निघेल तेव्हा मी त्याचा पाठलाग करेन. मला बघायचेच आहे ह्याचे नक्की काय चालू आहे ते,” मनात एक प्लॅन करून, निश्चय करून ती झोपी गेली.

नेहमीप्रमाणे सकाळी उठून तिने मुलांना तयार करून शाळेत पाठवले. रामसुद्धा ऑफिससाठी जाण्यास घराबाहेर पडला. तीही तशी तयारच होती. राम बाहेर पडताच, ती त्याच्या मागोमाग निघाली.

आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा…तिने ठरवले..मनात एकवार सगळ्याची उजळणी केली. भराभरा चालत जाऊन तिने पुढच्या नाक्यावरून टॅक्सी पकडली. आणि टॅक्सिवाल्याला राम च्या गाडीचा पाठलाग करायला सांगितले. पुढच्या दहा मिनिटातच राम जिथे थांबला होता तिथे ती पोहोचली. राम गाडीतून उतरला आणि एका घराच्या दिशेने चालू लागला. रेवतीसुद्धा टॅक्सितून उतरून हळूहळू रामच्या मागे जाऊ लागली.

शेवटी रेवती त्या घराजवळ पोहोचली. घर कसले.. खूपच सुंदर आणि टुमदार असा बंगला होता तो…राम दरवाजा उघडून आत गेला. रेवती थोडा वेळ बाहेर थांबून आसपासचे निरीक्षण करत होती. “हि कोणती जागा? हे कुणाचे घर?? राम कुणाला भेटायला आला असावा? खरेच त्याचे दुसऱ्या कुणावर तरी??? छे छे ..” मनात नाना विचार तरळत होती. 

“आता विचार पुरे, मला आत गेलेच पाहिजे.,असे म्हणून ती दरवाजासमोर आली. दार उघडेच होते. तिने ते किलकिले केले. आत डोकावताच तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही…….”

समोरच्या भिंतीवर तिचा आणि रामचा मोठा फोटो फ्रेम करून लावला होता. तिने मागे वळून दरवाजाकडे पहिले, “रेवती – राम ” असे नाव दरवाजावर लिहिले होते. तिने पुन्हा फोटोकडे पहिले, तर समोर राम उभा होता,

“सॉरी, १५ दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून तुला इकडे घेऊन येणार होतो. पण त्यादिवशी घराच्या चाव्या मिळाल्या नाहीत. मी खूप प्रयत्न केला, तरी उशीर झालाच, सॉरी… तुला दुखावल्याबद्दल.. “

रेवती आता नि:शब्द झाली होती, डोळ्यात घळाघळा पाणी वाहत होते. धावत जाऊन तिने रामला घट्ट मिठी मारली. इतके दिवस त्या दोघांमध्ये असलेला दुरावा आता दूर झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *