— सौ. ऋचिता बोधनकर दवंडे —
सनईचे मंद सूर, मंचावर आणि संपूर्ण सभागृहात केलेली फुलांची सुंदर सजावट, त्याच फुलांचा दरवळणारा मंद सुगंध अशा भारावलेल्या वातावरणात उंच माझा झोका पुरस्कार वितरण सोहळा सुरु होता. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे, जिद्दीने भरारी घेणाऱ्या आणि त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक महिलांना आज “उंच माझा झोका” पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार होते. मंचासमोरील प्रथम रांगेत पुरस्कार विजेत्या महिला त्यांच्या कुटुंबासहित बसल्या होत्या. एकामागोमाग एक पुरस्कार विजेत्या महिलांचा सत्कार होत होता आणि त्या त्यांचे मनोगत व्यक्त करत होत्या. निवेदिकेने ‘श्रीमती वासंती नेने’ हे नाव घेताच टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांच्या कडकडाटात वासंती मंचावर गेली. प्रमुख पाहुण्यांच्या हातून वासंतीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी वासंतीने माईक हातात घेतला आणि आतापर्यंतचा तिचा जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला.
नागपूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात वासंतीचा जन्म झाला. आई वडील दोघेही शेती करत. शेती खूप नसली तरी दोन वेळेचे खायला मिळेल इतके उत्पन्न नक्कीच मिळत होते. वासंती आई वडिलांची एकुलती एक मुलगी. सगळे सुरळीत सुरु असताना नियतीच्या मनात मात्र वेगळेच काहीतरी होते. वासंती पाच वर्षांची असताना शेतीसाठी बी बियाणे आणायला शहरात गेलेल्या तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. वडिलांच्या अकाली मृत्यूच्या धक्क्याने तिच्या आईने हाय खाल्ली आणि अवघ्या सहा महिन्यात वासंतीची आई देखील हे जग सोडून गेली. नकळत्या वयातील वासंती अनाथ झाली. तिचे जवळचे नातेवाईक म्हणजे फक्त तिचे काकाच होते. ते बाजूच्याच गावातील शाळेत शिक्षक होते. त्यांनी वासंतीच्या वडिलांची घर, शेती विकून आलेले पैसे स्वतःकडेच ठेवले आणि नाईलाजाने वासंतीला घरी घेऊन आले. तिथे वासंतीला कपडालत्ता, खायला प्यायला तर मिळत होते पण एका लहान मुलीला मिळायला हवे ते प्रेम मात्र कधीच मिळाले नाही. नाही म्हणायला काकांनी वासंतीचे नाव आपल्याच शाळेत घातले होते. वासंती हळूहळू मोठी होत होती पण काका काकूंच्या प्रेमापासून मात्र ती नेहमीच वंचित राहिली. राहायला घर आणि घरात माणसे असूनही तिच्या मनाला आपण अनाथ असल्याची बोच सतत होती. काकांनी कसेबसे बारावीपर्यंत वासंतीला शिकवले आणि अठरा वर्षांची होत नाही तर तिचे लग्न नागपूर शहरात नुकताच बांधकाम व्यवसाय सुरु केलेल्या सुरेश नेने ह्यांच्याशी लावून दिले. पाठवणी केल्यानंतर मात्र काकांनी पुन्हा कधीही वासंतीकडे वळून बघितले नाही.
लग्न होऊन वासंती नागपूरात आली. सासर खूप श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी होते. सासू, सासरे, नवरा, नणंद अशा कुटुंबात वासंती हळूहळू रुळली. सासरे निवृत्त शिक्षक होते. कुटुंबातील सगळी मंडळी समजूतदार होती. सगळे वासंतीला सांभाळून घेत होते. सासऱ्यांमध्ये तर तिला आपल्या वडिलांचा भास होत असे. लग्नानंतर वर्षभरात तिच्या मुलाचा समीरचा जन्म झाला. समीरचे करण्यातच तिचा सगळा वेळ जात असे. सुरेशचा पण बांधकाम व्यवसायात जम बसायला लागला होता. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे असे वाटत असतानाच नियतीने पुन्हा एकदा डाव साधला आणि एका अल्पशा आजाराने सुरेशचा बळी घेतला. वासंती पुन्हा हादरली. सगळे जीवनच जणू अंधकारमय झाले. वयाच्या एकविसाव्या वर्षी अवघ्या दोन अडीच वर्षांचे संसार सुख लाभलेली वासंती निराशेच्या खोल दरीत ढकलली गेली होती. तिला तर छोट्या समीरचे करण्याचे देखील भान उरले नाही. पुत्रशोकातून स्वतःला सावरत तिचे सासू सासरे नातवाचे सगळेकाही करत होते. पण वासंतीची अवस्था त्यांना पाहवत नव्हती. स्वतःचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी तिला निराशेच्या गर्ततेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांच्या प्रयत्नांना हळूहळू यश आले आणि वासंती सावरली. पण समीरचे आणि घराचे पुढे कसे होणार ह्याची चिंता तिला भेडसावत होती. कारण एकट्या सासऱ्यांच्या निवृत्तिवेतनामध्ये घर चालणे शक्य नव्हते. शिवाय सुरेशने सुरु केलेल्या व्यवसायाचे काय ह्याचाही विचार करावा लागणार होता. शिक्षक असणाऱ्या सासऱ्यांना बांधकाम क्षेत्राची काहीही माहिती नव्हती. वासंतीला मात्र आपल्या नवऱ्याने मेहनतीने सुरु केलेला व्यवसाय बंद पडू द्यायचा नव्हता. तिने खूप विचाराअंती नवऱ्याच्या व्यवसायात उतरायचे ठरवले आणि आपला निर्णय सासू सासऱ्यांसमोर मांडला. त्यांनी मोठ्या आनंदाने तिला पाठिंबा दिला. ते दोघे असल्याने तिला समीरची चिंता नव्हती. पण केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या वासंतीला सुरवात कुठून करावी हे कळत नव्हते. तिच्या सासऱ्यांनी तिला बांधकाम व्यवसायातील सुरेशच्या जवळच्या मित्राला ओंकार जाधवला भेटण्याचे सुचविले. त्यांनी वासंतीला हा व्यवसाय करायचा असेल तर ह्यातील शिक्षण घेण्याविषयी सल्ला दिला. नवऱ्याची जमा रक्कम आणि सासऱ्यांची मदत ह्यातून वासंतीने बांधकाम व्यवसाय करण्यासाठी लागणारे शिक्षण घ्यायला सुरवात केली. बरोबरीने ती व्यवसायातही लक्ष देत होती. ओंकार जाधव तोपर्यंत सुरेशचा व्यवसाय सांभाळत होते. तशी विनंती वासंतीनेच त्यांना केली होती. सोबतच ते वासंतीला अभ्यासातील आणि बांधकाम व्यवसायातील बारकावे शिकवत होते. दोन तीन वर्षात वासंतीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता ती व्यवसायात उतरण्यासाठी तयार झाली. आई वडिलांसमान असणाऱ्या सासू सासऱ्यांचे आशीर्वाद घेऊन वासंतीने सुरेशच्या बांधकाम व्यवसायात पाऊल टाकले.
शिक्षण असले तरी ह्या व्यवसायाचा अनुभव गाठीशी नव्हता त्यामुळे तिला सुरवातीला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. हाताखालील कामगारांकडून योग्य रीतीने काम करवून घेणे, इतर व्यवसायिकांबरोबर मिटींग्स करणे ह्या आणि अशा कुठल्याच गोष्टींची तिला सवय नव्हती. पण नवऱ्याचे काम यशस्वी करून दाखवण्याचा धृढ निश्चय, ओंकारचे मोलाचे मार्गदर्शन आणि तिची प्रचंड मेहनत ह्या जोरावर तिने सर्व अडचणींवर मात केली. पहिले तिला एक दोन एक दोन प्रकल्पांचीच कामे मिळत होती. बांधकाम क्षेत्रात जिथे मुख्यत्वे पुरुषांचीच मक्तेदारी असते अशा क्षेत्रात आपल्या खांद्याला खांदा देऊन एक स्त्री काम करते आहे ह्याचा इतर पुरुष व्यावसायिकांना चांगलाच धक्का बसला. जणू काही हा त्यांच्या पुरुषार्थालाच धक्का होता. ह्याचा अनुभव तिला तिच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांकडूनही आला. पण त्यांना सांभाळून घेत आणि इतर व्यावसायिकांना आपल्या कामातून चोख उत्तर देत तिने आपली घोडदौड सुरूच ठेवली. सुरेशने दिलेले “श्री कंस्ट्रकशन्स” हे नाव आता बांधकाम क्षेत्रात अदबीने घेतले जात होते. तिने तिच्या कार्यालयात अगदी घरगुती वातावरण ठेवले होते. शिवाय कामगारांना ती मानाची वागणूक देत होती. त्यामुळे ते देखील तिच्यासाठी जीव ओतून काम करत होती.तिचे कार्यालय अगदी प्रशस्थ होते. श्री कंस्ट्रकशन्सकडे काम दिले म्हणजे काम निटनिटके आणि वेळेत पूर्ण होणार असा विश्वास तिने ग्राहकांच्या मनात निर्माण केला होता.
ह्या सगळ्यामध्ये तिचे घराकडेही पूर्ण लक्ष होते. कुटुंबालाही ती वेळ देत होती. नणंदेचे शिक्षण करून तिचेही वासंतीने योग्य ठिकाणी लग्न लावून दिले होते. छोट्या घराच्या जागी आता टुमदार दुमजली घर उभे राहिले होते. एके दिवशी एका प्रकप्लासाठी जागा पाहायला जाताना रस्त्यात तिला एका रिकाम्या जागेवर “तारांगण अनाथालय” नावाची फक्त पाटी लावलेली दिसली. ती पाटी पाहून तिने मनात काहीतरी ठरवले आणि ती जागा ज्या अनाथालयाची होती त्यांना वासंती जाऊन भेटली. पुरेसे आर्थिकसाह्य नसल्याने त्या जागेवर बांधकाम करता आले नाही हे त्यांच्याकडून समजले. काका काकू असूनही अनाथ म्हणून वाढलेल्या वासंतीने ह्या अनाथालयातील मुलांच्या डोक्यावर पक्के छप्पर मिळावे ह्यासाठी स्वतः त्या जागेवर तारांगण अनाथालयाची इमारत बांधून दिली. तिच्यासारख्याच परिस्थितीने ग्रासलेल्या महिलांना तिने योग्य ते शिक्षण देऊन आपल्याच कार्यालयात नौकऱ्या दिल्या. कित्येक महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले. अनेक मोडकळीस आलेल्या किंवा कमी जागेत चालणाऱ्या वृध्दाश्रमांना अल्पदरात इमारती उभारून दिल्या. कोणत्याही गरजूच्या डोक्यावर पक्के छप्पर असावे असे तिला नेहमी वाटत असे. समाजातील विविध स्तरातील लोकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनाही तिने वेळोवेळी मदत केली होती. अवघ्या सात आठ वर्षात वासंतीने मेहनत आणि सचोटीच्या जोरावर बांधकाम आणि सामाजिक क्षेत्रातही खूप काम केले होते. ह्याच कामाची दखल घेत तिला “उंच माझा झोका” पुरस्कार जाहीर झाला होता.
निवेदिकेने मनोगत व्यक्त करण्याची विनंती करताच वासंती भानावर आली. आपले मनोगत व्यक्त करताना तिने आजवरच्या तिच्या यशाचे श्रेय ईश्वर,आई वडिलांप्रमाणे भक्कम पाठिंबा देणारे सासू सासरे, मोठ्या भावाप्रमाणे साथ देणारे ओंकार जाधव, तिचे सर्व कामगार आणि सहकार्यांना दिले. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्त्रीने जर ठरवले तर ती प्रतिकूल परिस्थितीतही उभी राहून एक आदर्श निर्माण करू शकते आणि उंच भरारी घेऊ शकते ह्याचाच प्रत्यय वासंतीकडे पाहून तिथे उपस्थित सगळ्यांना येत होता. त्याचप्रमाणे नवऱ्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान वासंतीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते.