स्वप्नाली

— प्रतिभा बिलगी —

आभाळात शुक्राची चांदणी तेजाने चमकत होती. तिचे तेज अधिक का आपल्या बाहूपाशातील चांदणीचे अधिक त्याला ठरवता येईना. आपल्याच भाग्याचा हेवा त्याला वाटायला लागला. तेवढ्यात… काळ्या मेघांनी चांदण्यांना झाकून टाकले. आणि बघतो तर काय त्याच्या मिठीतही कोणीच नव्हते. 

तो भानावर आला. सत्य आणि आभास ह्यातली रेषा पुसट झाली होती. त्याचे पुन्हा भान हरपले …. आणि तो पुन्हा सुंदर स्वप्नात रममाण होत गाढ झोपी गेला.

सकाळी उठल्यावर सागरला सतत ते स्वप्न डोळ्यासमोर येत होतं. त्याच्या स्वप्नातील ती परी किती सुंदर होती ! सुंदर या शब्दालाही लाजवेल अशी ती परी स्मितहास्य केल्यावर गालावर खळी पडायची. एखाद्या हिंदी चित्रपटातील दृश्य वाटावं असंच काहीसं त्याचं स्वप्नं वाटतं होतं. पण लगेच तो भानावर आला. त्याला या स्वप्नातून निज जगात प्रवेश करणे भाग होते कारण ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचायचे होते. सागरने पटपट आवरले व तो रेल्वे स्थानकच्या दिशेने झपझप पावले टाकत आपली नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी निघाला.

सागर गेल्या ५-६ वर्षांपासून शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत राहत होता. त्याचे आई-वडील गावी कोकणात राहायचे. हाडाचे शेतकरी होते. गावी त्याचं छोटसं टुमदार घर होतं. त्याचे पालक काही जास्त शिकलेले नव्हते परंतु काळानुसार बदलणे हे जणू त्यांच्या रक्तातच होते. गावात त्यांना मान होता. सागरला एक बहीण होती – भावना. दोघे बहीण – भाऊ एकमेकांना घरून असायचे म्हणजे धरून आहेत. त्या दोघांचे बालपण खूप सुखात गेले. सागरच्या आई-वडिलांनी त्या दोघांना कधी काही कमतरता भासू दिली नाही. दोघांनी खूप शिकावं , मोठं व्हावं असंच त्यांना वाटायचं.  म्हणून भावनाला, आपल्या मुलीलाही त्यांनी उच्च शिक्षण दिलं आणि एका अत्यंत हुशार, कर्तबगार आणि संवेदनशील मुलाशी लग्न लावून दिलं. आज भावना तिच्या सासरी खूप सुखात आहे याचं समाधान आई- वडिलांनाच नव्हे तर सगरलाही आहे. सागरनेही आपलं शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या प्रतिष्ठित कंपनीत काम मिळवलं आणि गेल्या वर्षभरात खूप परिश्रम करून वरिष्ठांची मर्जी संपादित केली. त्याच्या आई-वडिलांना नेहमी अभिमान वाटावा असंच त्याचं बोलणं, वागणं, एकूणच व्यवहार असायचा त्यामुळे तक्रारीसाठी कुठेच काही स्थान नव्हतं.

अश्याप्रकारे सगळं व्यवस्थित चालले असताना गेल्या काही दिवसांपासून सागरला हे स्वप्नं पडतं होतं. स्वप्नात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिच्या गालावरची खळी मात्र त्याला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडत होती. 

तिचे ते मादक डोळे, काळेभोर लांबसडक केस, केसांत गुंफलेला तो मोगर्‍याचा गजरा, नेसलेली पिवळ्या रंगाची साडी सगळं-सगळं त्याच्या डोळ्यांसमोर जसंच्या तसं दिसत होतं. असं वाटायचं की जणू चाफेकळी त्याच्यासमोर उभी आहे. कितीही केलं तरी त्याच्या डोक्यातून आणि मनातून तिचा विचार जातच नव्हता. एवढ्यातच ज्या ट्रेनमधून तो रोज प्रवास करायचा ती ट्रेन त्याच्यासमोर येऊन थांबली. लोकांच्या गर्दीतून वाट काढत तो ट्रेनमध्ये चढला. स्वतःसाठी एका कोपऱ्यात जागा शोधली व तिथे उभा राहून पुन्हा तोच विचार करू लागला. त्याला आता असं वाटत होतं की त्याच्या स्वप्नातील ती परी प्रत्यक्षात त्याच्या समोर येऊन उभी राहावी. त्याच स्वप्न सत्यात उतरावं. परंतु त्याला हेही माहीत होतं की स्वप्न खरी होत नसतात, स्वप्न ही फक्त स्वप्नंच असतात. याच विचारात तो स्टेशन वर उतरुन पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या आपल्या ऑफिसच्या बिल्डिंगकडे चालू लागला. ऑफिसला पोहोचून त्याने दिवसाच्या कामाची सुरुवात केली. कामाच्या गडबडीत आता थोडाफार का होईना सागर त्या स्वप्नाच्या जाळ्यातून थोडाफार बाहेर पडला होता. त्याला त्याच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव होती त्यामुळे आपल्या कामात तो कुठेही काहीही कमतरता येईल असं कधीच वागला नव्हता किंवा आताही वागत नव्हता. काम आटपून संध्याकाळी पुन्हा तो रेल्वे स्टेशनकडे चालला आणि आपल्या ठराविक ट्रेनची वाट पाहत होता. तेवढ्यातच त्याला पिवळ्या रंगाची साडी नेसलेली एक मुलगी दिसली. ती सुद्धा ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर उभी होती. खांद्यावर बॅग लटकवलेली, हातात फाईल पकडलेली, चेहऱ्यावर खूप शांतता असलेली एक मुलगी तिथे उभी होती. तो तिच्याकडे एकटक पाहत होता आणि निरखून पाहिल्यावर त्याला हे आढळलं की तिच्या गालावर खळ्या पडत होत्या. अगदी नाजूक, सुंदर त्याच्या स्वप्नातील परी जणू त्याच्या समोर उभी असलेली त्याला दिसत होती. त्याला एका क्षणासाठी हा आपल्याला भास होत असावा , असही वाटलं. त्याला यावर विश्वासच बसत नव्हता. परंतु आनंदही तितकाच होत होता. आता त्याला अनपेक्षितपणे भेटलेल्या या स्वप्नातील परीला गमावू द्यायचं नव्हतं. त्याने धैर्य एकवटून तिच्या जवळ जाऊन संभाषणाला सुरुवात केली. तिचे नाव ऐकून तर सागर अचंबित झाला – स्वप्नाली. स्वप्नात येऊन त्याला वेड लावणारी, सुंदर भविष्याची स्वप्ने दाखवणारी आणि प्रेमाचे जग दाखवणारी स्वप्नाली ! संभाषणावरून कळले की स्वप्नालीचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असून ती कामाच्या शोधात आहे. सागरने तिला दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसला यायला सांगितले आणि आश्वासन दिले की तिला त्याच्या ऑफिसमध्ये काम मिळवून देण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. हे ऐकून स्वप्नाली गोड हसली आणि तिच्या दोन्ही गालांवर पडलेल्या खळ्या पाहून सागर मनोमन खूप खुश झाला. स्वप्नाली त्याचा निरोप घेऊन आपल्या घराकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. ती गेल्यावरही सागर त्या ट्रेनकडे कितीतरी वेळ पाहत होता. घरी पोहोचून जेवण वगैरे आवरून जेव्हा तो अंथरुणावर पडला तेव्हा त्याला कधी एकदा सकाळ होते, कधी तो ऑफिसला जाऊन पोहोचतो आणि कधी पुन्हा स्वप्नालीशी भेट होते असं झालं होतं. याच विचारात त्याला कधी गाढ झोप लागली त्याचे त्यालाच कळले नाही.

आज सागर लवकरच उठला होता. त्याने पटपट तयारी केली आणि ऑफिसकडे जायला निघाला. ऑफिसला पोहोचल्यावर सतत त्याचे लक्ष घड्याळाकडे जात होते. अर्थातच तो स्वप्नालीची वाट पाहत होता. एवढ्यात त्यांचा ऑफिसबॉय रमेश त्याच्या टेबलाजवळ आला आणि त्याला सांगितलं की कोणी स्वप्नाली नावाची मुलगी त्याला भेटावयास आलेली आहे. सागरचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने पटकन उठून पाहिलं तर स्वप्नाली रिसेप्शन जवळ उभी राहून आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेत होती. त्याने रमेशला तिला आत बोलावून आणावयास पाठविले. स्वप्नाली आत आल्यावर सागरने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तिची भेट घडवून आणली. त्यांनी तिची फाईल तपासली, छोटासा इंटरव्यू घेतला. तिची शैक्षणिक पात्रता व कम्प्युटरचे ज्ञान लक्षात घेता त्यांनी तिला आपल्या ऑफिसमध्ये काम देऊ केले. त्याक्षणी स्वप्नाली खूप खुश झाली. साहेबांच्या केबिन मधून बाहेर आल्यावर स्वप्नालीने सागरचे खूप आभार मानले. सागरने तिला ऑफिसमधील तिचे काम समजावून दिले आणि दोघांनी आपल्या कामाला सुरुवात केली.

आज स्वप्नालीला ऑफिस मध्ये जॉईन होऊन एक महिना पूर्ण झाला होता.  ती खूप मेहनती होती. वरिष्ठांचा मान राखणे, ऑफिस मधील काम चोख करणे यामुळे तिच्याबाबतीत कोणतीच तक्रार आजपर्यंत ऐकु आली नव्हती. या दरम्यान रोज सागर आणि स्वप्नालीची भेट होत होती. ते कधी-कधी एकत्र जेवायचे, कॉफी प्यायचे, कामाबद्दल चर्चा करायचे. यामुळे त्या दोघांतील अंतर थोडे कमी झाले होते. दोघेही एकमेकांना बर्‍यापैकी ओळखू लागले होते. तिला या गोष्टीच खूप समाधान वाटत होतं की सागरमुळे तिला एका चांगल्या ऑफिसमध्ये काम आणि सागरच्या रूपात एक चांगला मित्रही मिळाला होता.

स्वप्नालीने त्या दिवशी संध्याकाळी सागरला बाहेर भेटू असे सांगितले. सागरला आश्चर्य वाटले पण आनंदही तितकाच झाला, कारण इतक्या दिवसानंतर ते दोघे एकत्र असणार होते. सागरने मनाशी पक्क केलं की आज त्याच्या मनातील स्वप्नाली बद्दलच्या त्याच्या मनातील भावना तो तिला सांगेल. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दोघे एकत्र बाहेर निघाले. स्वप्नालीला समुद्र किनारा फार आवडायचा. दोघे प्रशांत मनाने सागर किनाऱ्यावर बसले होते. स्वप्नाली सागर किनाऱ्यांवर आदळण्याऱ्या लाटांकडे पाहत होती. हिम्मत करून सागरने अलगद तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला की मी असाच आयुष्यभर तुझ्या सोबत या सागर किनाऱ्यावर तुझी साथ द्यायला तयार आहे. हे ऐकताच स्वप्नालीच्या ओठांवर स्मित हास्य उमटलं आणि तिच्या दोन्ही गालांवर खळ्या पडल्या. स्वप्नालीने आजपर्यंत कधी सागरला हे जाणून दिलं नव्हतं की तिलाही तो खूप आवडतो. तिने तिच्या पुढील आयुष्याची स्वप्ने त्याच्या सोबत रंगवण्यास कधीच सुरुवात केली होती. जेव्हा तिने सागरला हे सांगितलं की तिलाही तो खूप आवडतो आणि त्याच्या सारखा जोडीदार मिळणे ही तिच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. हे समजल्यावर मात्र सागरला खूप आनंद झाला आणि तिने स्वप्नालीला आपल्या मिठीत घेतलं. त्या क्षणी सागरला असं वाटलं की त्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याने स्वप्नालीला आपल्या स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा स्वप्नालीला खूप आश्चर्य वाटलं. पण त्याचे स्वप्न ऐकून ती खूप खुश झाली कारण तिच्या राजकुमाराच्या स्वप्नातही तीच राज्य करत होती. आज सागर आणि स्वप्नाली आयुष्यभरासाठी एकत्र आले होते . स्वप्न सत्यात उतरले होते. या क्षणी सागर-स्वप्नाली स्वतःला खूप भाग्यवान समजत होते आणि म्हणून दोघे मनोमन देवाचे आभार मानत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *