— सौ. उज्वला किसन तायडे —
आज सगळीकडे आनंदी आनंद दिसतोय.कालपासूनच किंबहुना खूप दिवसांपासून. सगळे मी येणार म्हणून आपापले नियोजन करत आहेत. माझी अनेक दिवसांची इच्छा होती कोणीतरी माझ्यावर लिखाण करावं म्हणून.
असो, आज मीच माझ्याविषयी सांगते ,माझे आत्मवृत्त सांगते.माझ्या येण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केले जातात.सण, समारंभ, उत्सव सर्वांचे मुहूर्त मला बघूनच ठरवले जातात. लहान मुलांना तर मी खूपच हवीहवीशी असते, त्यांनाच काय तर सर्वांनाच माझे असणे आवडत असते .तुम्ही सर्वच माझी चातकाप्रमाणे वाट बघत असता तर मी,तुमच्या सर्वांचीच,आबालवृद्धांना आवडणारी लाडकी सुट्टी.माझाही तसा काहीसा इतिहास आहे.
दैनंदिन उद्योग, व्यवसाय, कामधंदा व कर्तव्यकर्म यांतून विरंगुळा मिळण्यासाठी सुटीचा उपयोग ही वैश्विक संकल्पना व प्रघात प्राचीन काळापासून आजमितीस व्यवहारात रूढ आहे.
रविवार हा आठवड्यातील एक वार आहे. सोमवारपासून मोजला तर हा आठवड्यातील शेवटचा, म्हणजे सातवा दिवस येतो.याच दिवशी मी येते.
माझ्या रविवारी येण्यावर एक गाणे सुद्धा होते.” दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा.”
ज्या ज्या देशावर कधी काळी ब्रिटिश सत्ता होती त्या त्या देशात रविवार हा सुटीचा दिवस असतो. शिक्षणसंस्था, कार्यालये आणि बँका या दिवशी बंद असतात.
एके काळी भारतात कामगारांना रविवारची सुटी नसे.
पण नंतर रविवारी, आणि इटरही वेळी सुट्टी मिळाली असा काहीसा इतिहास आहे माझा.
मी येणार म्हटली की सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद अगदीच ओसंडून वाहत असतो.
तशी मी कधी छोटी म्हणजे किरकोळ, कधी मोठी, किंवा कधी खूप खूप मोठी असते.आता जगभर थैमान घालणाऱ्या छोटयाशा करोना विषाणूने तर कमालच केली माझी लांबी,रूंदी खूप खूप मोठी केली.
माझं संपूर्ण रूपच बदलून टाकलं होत .माझ्या येण्याचे रेकॉर्ड ब्रेक केले.काहींनी तर माझ्या अस्तित्वाचा पूर्णपणे उपभोग घेतला.
घराघरांत खाण्याच्या पदार्थांची खादाडी सुरु झाली.
प्रत्येक घराघरांत केक, आणि इतरही पदार्थांना स्थान मिळाले, ठेवणीतले पदार्थ बाहेर पडले.
बऱ्याच जणांनी पदार्थांचे यु ट्यूब चॅनेल सुरु करून आपले कौशल्य दाखवले. माझ्या प्रदीर्घ अस्तित्वाने घरातील सदस्यांना एकमेकांसोबत कधी नव्हे तो अमुल्य वेळ देता आला.
कौतुक वाटते मला तुमच्या सर्वांचे करोना काळात मी असताना बऱ्याच जणांनी ऑनलाइन शिक्षण केले, घेतले, दिले.
बरेच जण तंत्रस्नेही झाले.कामावर जाणारेच नाही तर घरगुती स्त्रिया यांनीही तांत्रिक, डिजिटल युगात प्रवेश घेतला.
प्रत्येकाने आपापले छंद, आवड झोपासले.
नष्ट होत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा नव्याने सुरू झाली,माझ्या जास्त असण्यामुळे .
कित्येक जण लेखन करू लागले, कवी, गायक, रांगोळी, नृत्य,पैंटिंग, आणि इतरही आवड बाहेर काढून माझ्या अस्तित्वाचा फायदा घेतला.
मी मात्र तुमच्यातील छंद, कलागुण बाहेर येताना बघून आतून सुखावून जायचे.
सणवार सोडून इतर वेळेत येणारी मी आणि तुमची होणारी लगलग माझ्या येणाच सार्थक झाल्यासारखे वाटायचे.
पूर्वी मी यायची म्हंटलं की घराघरात अगोदर च्या दिवशी पासूनच खादाडीची तयारी असायची.
इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा सारखे ,इतर पदार्थ माझ्या आनंदात करायचे असले तर तयारी व्हायची.
आता थोडं ते वेगवेगळ्या घरपोच असणाऱ्या सेवांमुळे घरातल्या गृहिणींना थोडा आराम मिळाला. कारण आता तुमच्या घरातील सदस्यांना ते बाहेरचे खाण्याची सवय लागली आहे.
दिवाळीला तर माझ्या येण्याची घराघरांत वाट बघत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे कामे करून घराची साफसफाई, रोषणाई,पदार्थ, मेजवानी विविध योजनांची रेलचेल असते.
घराघरात पाहुण्यांची गर्दी असते, माझ्या येण्याने तुमचे घर गप्पा गोष्टींनी दणाणून जाते. हास्याचे कल्लोळ, ऐकून मी तृप्त होते.माहेरवाशीण माहेरी येते,चार दिवस राहून माहेरच्यांसोबत,आप्तेष्टांसोबत हितगुज करून घराला वेगळेच घरपण येते.ह्याच कालावधीत सर्वांचे ऋणानुबंध घट्ट होतात.
मला अजून एक सांगायचे प्रवास,पर्यटन म्हंटले की मी केव्हा येणार,किती दिवस थांबणार हे बघून तसे
नियोजन करता तुम्ही लोक.
पर्यटन ,प्रवास म्हंटले की सर्वांनाच आनंद होतो .
कधी कधी तर प्रवासाला जायचे म्हटले म्हणजे
बॅग नव्हे बॅगा , भरता भरता सर्वांचीच तारांबळ उडते.लांबचा प्रवास म्हटला की काही दिवस त्या बॅग भरण्यात जातात. ह्या बॅग भरण्याची पण गम्मत आहे कधी कधी त्या भरता भरता प्रवास संपून जातो. म्हणजे गाडी चुकली की असे होते.
सहलीला जायचे म्हणजे सर्वांचे चेहरे प्रफुल्लित होतात, सर्वच आनंदी होतात. सहलीवरून परत आल्यावर नव्या उत्साहाने, नव्या जोमाने ,नव्या ऊर्जेने अभ्यासाला,कामाला लागतात. पर्यटन म्हणजे अगदीच थोरामोठ्यांपासून तर लहानांपर्यत आवडीचा विषय असतो.
पूर्वी पर्यटन म्हंटल की एकच पर्यटन स्थळ असायचं…. मामाचे गाव…………..
झुक झुक ,झुक झुक आगीनगडी !धुरांच्या रेषा हवेत काढी!
पडती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया.!….
पूर्वी परीक्षा सुरू असताना ,परीक्षा जवळ आली असताना अभ्यासापेक्षाही सुट्ट्यांमध्ये काय, काय धमाल करायची याचाच विचार डोक्यात चालू असतात. कारण त्यावेळी फक्त मामाचा गाव हेच एकमेव पर्यटन स्थळ असायचे.आणि माझी म्हणजे सुटीची वाट पाहत बसायचे तुम्ही सर्व.
आता मात्र चित्र बदललंय, मामाच्या गावाच्या जागी आता मुलं एखादा समुद्र किनारा, थंड हवेचे ठिकाण, पावसाळी धबधबा, किंवा घनदाट जंगल सफारी, परदेशी वारी याच पर्यटन स्थळांची निवड केली जाते. सुट्टीमध्ये भेट देण्याची ठिकाणं बदलली.
आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव दूर करायचा असेल तर निसर्ग पर्यटन हवेच, निसर्गाच्या सानिध्यात जायला हवेच.
निसर्गसौंदर्याने, निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात केलेल्या पर्यटन नाने, बराच ताण कमी होतो.
तुम्ही लोकं पर्यटनाला गेले म्हणजे मी पण तुमचे उत्साहित चेहरे बघून आनंदित होते.
ऑफिसमध्ये कामानिमित्त ,किरकोळ, आजारी रजा सोडून इतरवेळी तुम्ही मिळवलेली सुट्टी ,त्याला मिळालेली मंजुरात तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य आणते.
लहानमुलं तर शाळेत एखादी सुट्टीची सूचना मिळाली तरी खूप खूप आनंदून जातात, वाचण्यासारखा असतो त्यांच्या चेहऱ्यावरचा.
घराघरांत विचारणा केली जाते आज सुट्टी आहे का?केव्हा आहे?किती दिवस आहे?इ.
काहींना तर सुट्टी हा शब्द जरी उच्चारला तरी आतून गुदगुल्या होतात, अर्थात मला हे सगळं कळतं.
असो माझ्या येण्याने मी सुखावून जाते, जसे तुम्हांला माझ्या जाण्याची हुरहूर वाटते तशीच मलाही वाटते.
माझ्या अस्तित्वामुळे तुमच्यातील नविन उत्साह, नविन काम करण्याची ऊर्जा बघून खूप छान वाटते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुटी मध्ये म्हणजे मी येण्याची जेव्हा तुम्ही निसर्ग पर्यटनासाठी वाट बघत असता आणि निसर्ग पर्यटनाचा आनंद घेऊन परत येता.
आपल्या अस्तित्वाने सर्वांचे कामे होऊन, जीवनाचा आनंद घेता .मी छोटी, मोठी, लांब, दीर्घ, प्रदीर्घ असो आपण माझा पुरेपूर आनंद घेता हे महत्वाचे…….

सर्वांचे आवडते सुट्टी चे दिवस..सुट्टी चे फायदे… छंद..यांच छान वर्णन केल…