— शिल्पा धर्माधिकारी —
दोन तीन वर्षानंतर ह्या उन्हाळ्यात मी माझ्या सगळ्यात मोठ्या नणंदेच्या मुलाकडे गेले होते. त्याच्या ५-६ वर्षाच्या मुलाची दिनचर्या बघून मी आवाक झाले. त्याचा दिवस सकाळी ७ वाजल्यापासून सुरू व्हायचा. आपल्या छोट्याशा हाताने स्विमिंगसाठीची बॅग गळ्यात अडकवत तो स्विमिंग क्लासला जायचा. मग नाश्ता करून ड्रॉइंग क्लासची बॅग पाठीवर चढवत चित्रकलेच्या क्लासला जायचा. नंतर संध्याकाळी ग्राऊंडवर कसलासा वर्ग भरायचा तिथे जायचा. तो वर्ग म्हणे सुट्टीत मुले दिवसभर घरी कंटाळतात म्हणून अॅक्टिव्हीटीजचा वर्ग. त्या छोट्या जीवाचं दिवसभराचं वेळापत्रक पाहून मी अचंबित झाले. एक दिवस तो रात्री माझ्याजवळ गोष्ट ऐकायला आला तेव्हा पाय दुखतात म्हणाला. मग मी गोष्ट सांगता सांगता त्याचे पाय दाबून देत होते. थोड्यावेळातच गोष्ट ऐकता ऐकता पठ्ठया गाढ झोपला. त्याच्या त्या निरागस, कोवळ्या चेहर्याकडे पाहून मला त्याची कीव आली. मला प्रश्न पडला की पालक त्या इवल्याशा जीवाला ह्या बालवयात मनमुराद, मुक्त बागडण्यासाठी आणि खेळण्यासाठी मोकळे सोडायच्या ऐवजी कुठल्याशा वेळापत्रकाच्या दावणीला बांधुन काय मिळवतात? न राहून शेवटी मी भाच्याला आणि भाचे सुनेला म्हटलं “उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी या एवढ्याश्या जीवाला छान फुलपाखरासारखे बागडू द्या, मनासारखे जगू द्या. कशाला हवेत एव्हढे सुट्टीतील क्लासेस? मोठेपणी ना उन्हाळा ना पावसाळा आणि ना कसल्या सुट्ट्या. पुढे आयुष्यभर घड्याळाच्या काट्यावर आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली जगायचे आहेच की. मग त्याच्यावर त्याच्या वयापेक्षा जास्त ओझी लादायची कसली घाई आहे तुम्हाला?” तेव्हा त्यावर त्यांचे उत्तर ऐकून मला आश्चर्यच वाटले. ते म्हणाले की, “आजकालच्या स्पर्धेच्या युगात मुलांना सगळे यायलाच हवे. आतापासूनच त्याची सुरवात व्हायला हवी. वेळ मिळेल तसे आणि तेव्हा त्याने शिकायला हवे. वेळ दवडला तर तो जगाच्या मागे पडेल.”
मुलाला त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेपेक्षा जास्त काहीतरी करायला लावणे, गरज नसताना जबरदस्तीने दमछाक होईपर्यंत जगाबरोबर पळायला लावणे ह्या आईवडिलांच्या अट्टाहासाने काय साध्य होणार आहे हे मला कळेच ना.
खरंतर, उन्हाळ्याच्या सुट्टीतील छंदवर्ग ही संकल्पना आमच्या वेळेसही होती. पण कदाचित सर्वांना ती मानसिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने पेलणारी नव्हती.
मला आठवतं, लहान असताना एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आईकडे हट्ट धरला होता की मला पोहायला शिकायचे म्हणून. त्याला कारण पण तसेच होते. पूर्वी माझे दोन्ही भाऊ बाबांच्या मित्राकडून पोहणे शिकले. पण मी खूप लहान असल्यामुळे माझी ती पोहणे शिकायची संधी हुकली. त्यानंतर दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते दोघं पोहायला जायचे. मग जेवण्याच्या टेबलवर त्यांच्या पोहण्याविषयीच्या चर्चा रंगायच्या. कुणी किती फुटावरून उडी मारली, सूर सरळ मारला की कोलांटउड्या मारत, अंडरवॉटर पोहताना कशी मजा आली वगैरे वगैरे. ह्या गप्पा ऐकून मला पण वाटू लागले की आपण पोहणे शिकले पाहिजे. आईच्या मागे खूप लकडा लावल्यावर शेवटी तिने मला पोहायच्या क्लासला घातले खरे, पण माझा हा हट्ट मला काही झेपला नाही. म्हणजे पाण्याच्या भीतीने मी अर्ध्यापेक्षा जास्त दिवस क्लासला बुट्टी मारायचे. त्यामुळे माझे पोहण्याचे स्वप्न स्वप्नच राहीले. मला पोहता काही आलं नाही.
ही माझी, नाही नाही आमच्या घरातल्या सगळ्यांची, उन्हाळ्यातील छंदवर्गाशी झालेले पहिली ओळख! त्यानंतर मग उन्हाळ्याच्या सुट्टीत भरवण्यात येणार्या अनेक छंदवर्गांची माहिती मिळाली आणि ह्या विषयीच्या आमच्या ज्ञानात भर पडली. ह्यात हस्तकला, चित्रकला, नाट्यशाळा ह्या आणि अशा विविध विषयांचे छंदवर्ग भरवले जायचे म्हणे.
एक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी सगळी भावंडं गावाला गेली होती. मग माझ्यातील हस्तकलेची गोडी पाहून, त्याच जमविलेल्या माहितीच्या जोरावर मला आईने आमच्या परिचितांकडे हस्तकला शिकायला पाठवले. अर्थात ह्यात माझ्या आईला दोन उद्देश साधायचे होते. कला शिकणे हा तर होताच पण त्याबरोबर घरात नुसते झोपा काढण्यापेक्षा चांगले काहीतरी शिकण्यासाठी वेळ सत्कारणी लावणे हा आणि गरज पडली तर ती कला आयुष्यात पुढे अर्थार्जनासाठीचे माध्यमही बनू शकेल असा होता.
पण काहीही म्हणा एक मात्र निश्चित की ह्या छंदवर्गाने माझ्यातील हस्तकलेच्या विषयीची गोडी अजूनच वाढली. नंतर जमेल तसे मी माझा सुट्टीतला दुपारचा वेळ काहीतरी हँडीक्राफ्ट करण्यासाठी घालवत असे.
खरंतर एरवी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळी भावंडं, आजूबाजूची मित्रमंडळी मिळून खूप धमाल करायचो. दुपारी उन्हामध्ये बाहेर न पडता कोणाकडे तरी एकत्र जमून बैठे खेळ खेळायचो. ह्यामध्ये व्यवहार ज्ञान देणारा व्यापार, एकाग्रता वाढवणारा कॅरम व सागरगोटे तर बौद्धिक क्षमता वाढविणारा चेस असे खेळ खेळायचो. त्याच बरोबर अंगणाच्या सावली असलेल्या भागात दोरीवरच्या उड्या, टिपरीपाणी ह्यांसारखे खेळ खेळायचो. संध्याकाळी घराजवळच्या मैदानावर सांघिक भावना निर्माण करणारे आणि शारीरिक क्षमता वाढवणारे लंगडी, कबड्डी, खोखोसारखे मैदानी खेळ खेळायचो. त्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याची, सगळ्यांना सामावून घेण्याची विचारसरणी तर बनलीच, त्याबरोबर आमच्यात खिलाडीवृत्ती तयार झाली आणि हारजीत पचवण्याचे मनोबल तयार व्हायला मदत झाली. हा, सुट्टीत एक होतं की कोणाकडेही पाहुणी मुलं आली तरी आम्हाला कुणाची ओळख लागायची नाही. त्यांना आम्ही आमच्यात सहज सामावून घेत होतो. ह्या सगळ्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारच्या छंदवर्गाची कधी गरज भासली नाही.
पण माझ्यासाठीच्या छंदवर्गाचा प्रवास हा स्विमिंग आणि हस्तकला क्लास यावर आणि इथंवरच थांबला.
आताशा, जेव्हा सुट्टीतील छंदवर्गाविषयीच्या वर्तमानपत्रातील म्हणा अपार्टमेंटच्या नोटिस बोर्डवर लागणार्या जाहिराती म्हणा किंवा पोस्टाच्या पेटीमध्ये पडलेली पत्रक वाचली तेव्हा लक्षात आले की आताच्या काळात छंदवर्गांच्या विषयांची यादी खूपच मोठी झाली आहे. वेगवेगळ्या विषयांचे असणारे हे छंदवर्ग वयाच्या ३ वर्षापासून ते १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी. त्यात लेखन कसे करायचे, गोष्टी कशा सांगायच्या, डान्स, क्रिकेट, एखाद्या परदेशी भाषेची तोंड ओळख करणारे, रॉक क्लायबिंग, रोबोटिक्स, सायन्स, बेकिंग, कुकिंग आणि काय काय. अर्थात प्रत्येक वयोगटाप्रमाणे विषय वेगवेगळे, ज्याने मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते. अर्थात त्यासाठी वेगवेगळ्या विषयांचे क्लास लावणे गरजेचे. मग दिवसभराचे वेळापत्रकचमुळी ह्या छंदवर्गाभोवती फिरणारं, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतच. पण खरंच ह्या सगळ्यांची गरज आहे का? एखाद्या क्लासपुरते ठीक आहे पण मुलं आपल बालपण विसरून यंत्रवत सुट्टी घालवतात. ह्यातून खरंच ते काय मिळवतात आणि काय शिकतात?
खरंतर आम्ही, जसे पाण्यात पडल्यावर पोहता येते, त्याच पद्धतीने आमच्या वाढत्या वयाबरोबर आपल्या कलागुणांनुसार आणि क्षमतेनुसार सगळे शिकत गेलो. कधी आईवडिलांनी, आमचे भविष्यात कसे होईल याची चिंता केली नाही ना कधी त्याचा बाऊ केला ना कधी आपल्या मुलांकडून अवाजवी अपेक्षा केल्या. कदाचित तेच कारण असेल आमच्या वेळी या छंदवर्गांचे महत्व कमी असण्याचे.
मला असे वाटते पालकांनी कुठल्याही गोष्टीची आपण अतिरेकी रेषा ओलांडत तर नाही ना ह्याची चाचपणी करायला हवी. आपल्या अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं पिचत तर नाही ना हे बघायला हवं. ह्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गोष्टींचा समतोल फार महत्वाचा आहे. आपल्या मुलाला सगळंच यावं याचा अट्टाहास न करता त्याच्या असलेल्या चांगल्या गुणांना कसे खुलवता येईल ह्याचा प्रयत्न करायला हवा. तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्टय़ा सुदृढ कसा बनेल ह्याला महत्व द्यायला हवे.
हे खरे आहे की छंदवर्ग ही काळाची गरज आहे. आईवडील दोघेही नोकरी करणार्या घरांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं एकटेच घरी राहतात. त्यांना बर्याच अंशी छंदवर्ग हा उत्तम पर्याय असेलही कदाचित. पण त्याचा उपयोग मुलाचे बालपण जपत त्याचे व्यक्तिमत्त्व सहजतेने घडविण्यासाठी, खुलवण्यासाठी व्हायला हवा.
कुठलाही छंदवर्ग निवडताना त्याच्या कलागुणांचा, त्याच्या आवडीनिवडीचा, त्याच्या क्षमतेचा विचार व्हायला हवा ना की पालकांच्या इच्छेनुसार आणि मुलांवर ओझे लादून.
अर्थात हे माझे वैयक्तिक विचार आहेत. मला जे वाटलं ते मी इथे मांडले एव्हढेच.
