–डॉ. सौ. अनुराधा भागवत–
सप्रेम नमस्कार.
जून महिन्याचा अंक वाचला. अपेक्षेप्रमाणेच अंक अतिशय वाचनीय होता. उन्हाळ्यात डोळ्यांना सुखावेल अशा आल्हाददायक निसर्ग चित्राने मुखपृष्ठ सजले होते. शेवटच्या पानावरही असेच चित्र पाहून वाटलं, एकाच सुंदर चित्राच्या प्रसन्न रंगांमध्ये पूर्ण अंक सजवून बांधला आहे. पत्रलेखनाच्या आपल्या आवाहनाला व्यापक व उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हवा, पाणी, जमीन,समुद्र, आकाश… निसर्गाच्या सर्व पंचतत्वांशी लेखक मित्रांनी पत्राद्वारे नाते जोडले आहे. आपल्या मनातील भावना, विचार व निसर्ग सौंदर्य याचं सुंदर वर्णनात्मक मिश्रण अंकात वाचायला मिळाले.’हवे ‘ला लिहिलेले पत्र वाचतांना लहानपणची ‘वाटते सानुली— ‘कविता आठवली. डोंगरातील गुहा, गुंफा, कडेकपारींना पत्र लिहायची कल्पना छान आहे.
‘ पावसाची ती सर—-‘ व ‘ओसरीवरून दिसणारा पाऊस—‘ दोन्ही कविता मनाला भिडल्या. खरं आहे पाऊस पहावा तो आपल्या घराच्या खिडकीतून, ओसरी वरूनच. घराचे व मनाचे सर्व दरवाजे उघडून त्याला मनसोक्त अनुभवावा.
गणेशोत्सव विशेषांकाच्या स्पर्धा जाहीर करून तर तुम्ही सर्वांची एकच धांदल उडवून दिली आहे.
स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा!
इंदौर.
