–स्नेहा भुरके रांगणेकर आणि ओंकार रांगणेकर
‘Theatre Workshop’ जितके ऐकायला cool वाटते तितकेच नाट्यकार्यशाळा म्हटले की थोडे विद्यार्थीदशेत गेल्याचा भास होतो, अशीच काहीशी अवस्था माझीही झाली होती. Corporate training ची सवय आहे पण हे कार्यशाळा वगैरे जरा नवीनच अनुभव होता माझ्यासाठी. त्यातून नवऱ्याचा यापूर्वीच्या अश्या प्रकारच्या कार्यशाळेचा अनुभव काही फारसा चांगला नव्हता त्यामुळे मनात थोडी धाकधुक होतीच.
कसा असेल अनुभव, आपण चांगले विद्यार्थी ठरू की मठ्ठ असा विचार करत कार्यशाळेचा पहिला दिवस सुरु झाला. बाकी विद्यार्थी मित्र-मैत्रिणीचे माहीत नाही पण सोमण गुरुजी मात्र एकदम रुबाबदार आणि शिस्तप्रिय भासले. स्वतःची ओळख नेहमीच्या पठडीतल्या मार्गाने न करता जेंव्हा सरांनी तुमच्याविषयी जे तुम्हाला सांगावेसे वाटतेय ते थोडक्यात लिहून मग ते वाचून दाखवा असे सांगितल्यावरच जाणवले, हे तीन दिवस काहीतरी छान आणि वेगळे अनुभवायला मिळणार आहे. त्यानंतर सुरुवात झाली ती वाचिक अभिनयाने आणि त्यासाठी घेतल्या होत्या तीन सुंदर कविता. तिन्ही कवितांचा बाज वेगळा, चाल वेगळी. एकत्रितपणे जोशाने आणि उच्चारांच्या लयीतून जो काही सांघिक परिणाम साधला जात होता त्याचा अनुभवच वेगळा होता, शाळेतल्या समूहगाण्यांची आठवण झाली यानिमित्ताने. समृद्ध मराठी भाषेचा साक्षात्कार पुन्हा नव्याने झाला.
गंमती-जमती ही बऱ्याच झाल्या. हुशार, अभ्यासू खट्याळ असे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी होतेच आणि चुका करणारेही. न आणि ण च्या उच्चारांत नेहमी घोळ करणारी मी सोमण गुरुजींच्या चाणाक्ष नजरेतून थोडीच सुटणार होते. खूप वर्षांनी कोणीतरी कान पिळून घोकून-घोटवून माझे न आणि ण चे उच्चार सुधारले होते. हे लिहिताना ही मी मनात सावधगिरीनेच उच्चार करते आहे
दोन्हींचा,म्हणतात ना शिकवणारा शिक्षक जितक्या तळमळीने शिकवतो विद्यार्थीही त्याच तळमळीने त्याचे आकलन करतो. थोडक्यात सांगायचे तर माझा चांगलाच क्लास घेतला होता सरांनी, आणि कुठल्याही नवऱ्याला बायकोची गंमत बघण्यात जसा आनंद होतो अगदी तसाच परमानंद माझ्या नवऱ्याला झाला होता;म्हणतॊ कसा बरे झाले सरांनीच कान पिळले ते, नाहीतर आमची काय हिम्मत तुला चूक-बरोबर सांगण्याची. नेहमी शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखली जाणारी मी, आता लोकं मला मठ्ठ समजतील का असा थोडा विचार करत या कान पिळवणुकीनंतर थोडी खजील झाले खरी, पण मग आला आमच्या आवडीचा विषय ‘नाटक’. दिलेल्या एका शब्दावरती १० मिनिटांचे छोटे स्किट करायचे होतं. आधी कथानक लिहायचे मग स्क्रीनप्ले, त्यानंतर characterisation आणि मग चक्क १० मिनिटांचे नाटक मंचावरती सादर करायचे होते. Thrilling ना! एरव्ही आमची एकांकिकेची प्रक्रिया महिनोंमहिने चालते. पण आम्हाला हे करायचे होते फक्त एका दिवसात! मग काय चार लोकांची १ टीम, प्रत्येकाला सुचलेल्या नवीन कल्पना, त्यांची सांगड घालून एक कथानक लिहिले आणि बघता बघता त्याचे छोट्या स्किटमध्ये रूपांतर ही झाले. प्रत्येक टीम मध्ये काही अनुभवी, काही नवशिके आणि वेग-वेगळ्या वयोगटातले लोक. पण प्रत्येक टीमने ते लक्षात घेऊनच सगळयांना सामावून घेता येईल असे कथानक लिहिले. कार्यशाळेची सांगता झाली ती प्रत्येक टीमच्या मंचावरच्या प्रयोगाने.
अभिनय कसा करावा, दिग्दर्शनाचे formulae वगैरे असे काही टिपिकल न शिकवता आम्हाला नाटकाच्या पूर्ण प्रोसेसचा जो प्रवास सरांनी घडवला तो खूप engaging होता. या नाटक घडण्याच्या प्रवासात कुठेही त्यांनी आम्हाला dictate केले नाही पण मार्गदर्शन मात्र नक्कीच केले. आपण एका दिवसात काहीतरी छान लिहू ,घडवू आणि सादर करू शकलो याचे समाधान खूप वेगळे होते. आमच्या सारख्या शिकवू कलाकारांसाठी हे वर्कशॉप म्हणजे एक पर्वणीच होती. अशाच नाट्यशाळा होत राहोत आणि असेच योगेश सोमण सरांसारख्या कलाउपासकांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत राहोत हीच सदिच्छा.