सनविवि ललित,साहित्योन्मेष “ लॉकडाऊन,मी आणि माझी पापड रेसिपी ”

“ लॉकडाऊन,मी आणि माझी पापड रेसिपी ”

---माणिक नेरकर---


(बिघडले,ते घडले कसे? पाककृती शिकतांना घडलेला विनोदी प्रसंग)
"हसणं" ही माणसाला मिळालेली ईश्वरी देणगी,"हसवणं " हा त्याच्यात असलेला अनमोल गुण आणि "विनोदनिर्मिती" ,त्यातही निखळ विनोदनिर्मिती हा आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा  भाग.  घरातील कौटुंबिक वातावरण हसते- खेळते असेल तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही विनोदनिर्मिती होते. लग्नकार्यासारख्या इतर अनेक प्रसंगात नातेवाईक एकत्र जमल्यावर "खेचा खेची, खिल्ली उडवणे, ह्यासारख्या माध्यमातून मनोरंजन शोधले जाते---- पण ह्या सगळ्या प्रकारात कुणालाही न दुखावता, हलक्या फुलक्या वातावरणाची निर्मिती करणारा विनोद खरा आनंद देऊन जातो .
मित्र मैत्रिणींसोबत घडणारे विनोदी "किस्से" तर "ऊर्जा" देऊन जातात मनाला. असे प्रसंग घडत असताना आणि ते घडल्यानंतरही आठवून आठवून हसताना जो निखळ आनंद मिळतो, त्याची तुलनाच होऊ शकत नाही.
"किस्से "  वरून एक छोटा किस्सा आठवला, "किस" चा. अहं, तुम्ही समजता तसं काही नाही बरं---- माझा अपघात झाला होता 3 वर्षांपूर्वी, तेव्हा माझ्या काही मैत्रिणी मला भेटायला घरी आल्या होत्या. त्यादिवशी माझा होता उपवास. त्यांचा आग्रह की आम्ही तुझ्यासाठी काहीतरी बनवतो किचनमध्ये जाऊन, ऐकतच नव्हत्या. म्हटलं जा, बटाट्याचा किस बनवा . त्या गेल्या किचनमध्ये आणि दुसऱ्याच मिनिटाला  तोंड उतरवून माझ्याकडे---- म्हटलं,काय झालं तरी काय? तर म्हटल्या "तुझा नवरा होता आत. आम्ही म्हटलं त्याला की आम्ही किस करतो,तर त्यांनी करूच दिला नाही"----आणि हे त्या इतक्या निरागसपणे सांगत होत्या की मला हसू आवरताच आले नाही. नंतर लक्षात आल्यानंतर मात्र सगळ्या अगदी खळखळून हसलो. असो.
 तर आता  ही "घडल्या बिघडल्याची घटना आहे टाळेबंदीच्या काळातली---ह्या काळात तमाम बायकांवरील कामाचा ताण प्रचंड वाढलेला असूनही त्यातल्या बऱ्याच बायकांचा "सुगरणपणाचा" उत्साह किंचितही कमी झालेला नव्हता.

 'तुम्हा बायकांचं काही कळतच नाही. तुमच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही' असं जे नेहमी पुरुष मंडळी किंवा समस्त नवरे मंडळी म्हणत असते त्यात खरं तर बरच तथ्य आहे. आता हेच पहा ना---- , दर  दोन तासांनी निघणाऱ्या भांड्यांची रास, चहा, नाश्ता, जेवण, परत  चहा, नाश्ता, जेवण ,कपडे धुणे, घर आवरणे--- ह्या सततच्या आणि कराव्याच लागणाऱ्या जास्तीच्या कामांमुळे एकीकडे वैतागलेल्या, थकलेल्या बायका दुसरीकडे मात्र अति उत्साहाने वड्या, पापड, कुरडया, खारोड्या---असले किचकट पदार्थ बनवतात आणि फुशारकीने त्याचे फोटोही पाठवतात. ह्या सुगरण बायकांचा कुटील डाव असतो, तो आमच्या सारख्या "जेमतेम काठावर पास झालेल्या" बायकांना डॉमिनेट करण्याचा आणि आम्हीही फसतो की हो. आम्हीही शिरा ताणून आणि पदर खोचून लागतो कामाला. जशी की मी---
 झाले असे की अर्चना, रश्मी, दिप्ती, सुषमा ह्या सारख्या बऱ्याच सुगरण मैत्रिणींनी  टाकलेले वेगवेगळ्या रेसिपी चे फोटो पाहून अस्मादिकांनाही इच्छा झाली . ते काय दांडगे की सांडगे म्हणतात ते करून पाहिलं. ते अगदीच सोप्प होतं तरी बऱ्यापैकी जमलं. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करून पाहिले ते फसले.  इतकं करूनही मन भरलं नाही म्हणा  की  स्वतः वरील अति आत्मविश्वासा मुळे म्हणा ज्वारीचे पापड करायचा बेत केला. मार्गदर्शन अर्थातच  दिप्ती आणि  अर्चनाचं. वाटलं सोप्प तर आहे अगदी.  पीठ पाण्यात भिजवायचे, थोडं फार मीठ, तिखट काय ते टाकायचे आणि "सांगितलेल्या अंदाजे पाण्यात" (उकळलेल्या) घोटत रहायचे, संयम  ठेवून अर्थात. मग ते "काहीतरी" दिसलं की समजायचे झाले म्हणून, अन पळीने ओतायचे प्लास्टिक कागदावर किंवा  कॉटन कपड्यावर. हाय काय अन नाय काय . केली मग तयारी, तेही नवरा ड्युटीवर गेल्यानंतर.तसेही नवऱ्यासमोर मी जास्त सुगरण पणा करतच  नाही. तो म्हणतो, 'कशाला दमतेस इतकी?(खरे तर त्याला म्हणायचे असते, जमत नाही तिथे डोकं का खराब करतेस?)  फार वेळ एका ठिकाणी उभी राहिलीस की "तुझे पाव भारी होऊन जातात ना?" हा अजून एक टोला---माझ्या अत्त्युत्तम हिंदीसाठी--- ह्यांच्या  हिंदी भाषिक मित्रांच्या बायकांसोबत बोलतांना माझी हिंदी अशीच ऊतू जात असते कारण . असो. बरं, "नवीन पाककृती" केल्यावर  खाल्ली जाईलच ह्याची खात्री "शून्य" असते. तर मी मिळालेल्या ज्ञाना नुसार सगळी प्रोसेस पार पाडली, तेही संयम बाळगत, आणि शांत डोक्याने."शांतता कोणत्याही चुका करत नाही" ही फ्रेंच म्हण आठवली. इतकंच काय,"शांतता हा कधीही न फसवणारा विश्वासू मित्र आहे" हे  aristotal" ह्याचं विधानही आठवलं. मी 2 प्लास्टिक पेपर, एक मोठा कॉटन कपडा अगोदरच तयार ठेवले होते. पीठ  "ओतणेबल "  झाले असे वाटल्यावर मी पळीने ओतायला सुरुवात केली. पण  बहुदा ओतत असतानाच त्यांची  घट्ट मैत्री झाली आणि कुठलाही सारासार विचार न करता सगळे एकमेकांना बिलगले, कबके बिछडे हुवे हम  --सारखे . अगदीच आकारहीन दिशाहीन पसरू लागले, आणि  मग माझा चेहराही रंगहीन होऊ लागला. कशीतरी कसरत करून चार चकरा गच्चीवर मारत "ते अजब समीकरण" वाळत घालून आले. खूप थकायला झाले होते. त्यानंतर  चहा, नाश्ता, स्वयंपाक---होतीच  नेहमीची कामे--- माझा   वेदनेने पिळवटलेला  चेहरा पाहून "दोघेही" मदतीला धावून आले अर्थात.(लेक आणि नवरा). जेवणानंतर मैत्रिणींच्या गृप (सगळ्याच) मध्ये डोकावणे आणि मधून मधून रिप्लाय करणे हे तर "मस्ट" असतेच. कुणी कोडी टाकली तर तीही सोडवावी लागतातच. आपले ज्ञान (की अज्ञान?)  दाखवायची संधी कोण कशाला सोडेल? तर गृप वर उडत उडत हिंडून झाले, थोडा आराम करून झाला आणि 4 वाजता मोठ्या उत्साहाने गच्चीवर गेले "ते समीकरण " खाली आणायला. बघताच क्षणी इतकी प्रेमात पडले त्याच्या की लपत छपत   खाली आणून झटकन झाकून ठेवले,जेणे करून माझ्या "प्रियकराचे " दर्शन नवऱ्याला व्हायला नको. पण व्हायचे तेच झाले. दोघांचीही "काकदृष्टी" त्याच्यावर पडलीच. प्रथम आश्चर्याने मग अगदी कीव केल्यागत दोघांनी माझ्याकडे पाहिले आणि जे हसत सुटले,जणु  काही  मी घरातल्याघरात सरपटणाऱ्या प्राण्यांसारखी सरपटते आहे किंवा जंगलात डायनासोर संगे गळ्यात गळा घालून हिंडते आहे,आरामात--- क्षणही न दवडता  मी केलेली कारागिरी ताटात उतरवायला घेतली;  पण छया: कसलं काय? ते सगळे जीव इतके एकमेकांच्या प्रेमात होते की वेगळं  व्हायलाच तयार होईनात.  मला आपलं उगाचच "ए, मैने कसम ली$$$ नहीं होंगे जुदा हम$$$" म्हणत असलेले मुमताज अन देवानंद दिसायला लागले--. मी आपल्या स्वभावाला अनुसरून जोराने आणि काहीशा रागाने त्यांना जवळ घेण्याचा, सॉरी, ओढायचा प्रयत्न करताच  ते कॉटन चे कापड  टराटरा फाटलेच. प्लास्टिक मधून तरी थोडं फार हाती लागलं, म्हणजे चुराच.बाकी सगळं तर----अक्कलखाती जमा---- मग काय ,   
कानाला खडा लावला, जिवाला यापुढे जास्त त्रास करून  घ्यायचा नाय.  झेपेल तेच आणि जमेल तेवढंच करायचं. निदान दुष्ट मैत्रिणींनी दुसरी रेसिपी पाठवेपर्यंत तरी.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *