सनविवि अनुभव,साहित्योन्मेष माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

 –डॉ. सौ.अनुराधा भागवत–

स्मृति ही फार मोठी शक्ति आहे पण विस्मृति हे फार मोठे वरदान आहे.विसरणं स्वभाविक आहे ते आपोआपच होतं, तरीसुद्धा कांही प्रसंग आपल्या कायमच लक्षांत राहतात.

 लग्नानंतर सुरवातीला आम्ही नोकरी निमित्ताने आफ्रिकेत रहात होतो.आफ्रिकेतील जंगलसंपत्ती,गेमपार्क जगप्रसिद्ध आहेत. किंबहुना आफ्रिका यासाठीच प्रसिद्ध आहे. आम्ही व आमचे दोन मित्र मिळून ‘ जंगल-सफारी करायचे ठरवले. आम्ही समवयस्कच,मुलंही बरोबरीची,सर्वात मोठा सात वर्षांचा तर सर्वात लहान अडीच वर्षांची दार-ए-सलाम पासून आमचा प्रवास सुरु झाला. जंगलातील अंतर्भागात असलेल्या हॉटेल्समध्ये आमची रहायची सोय केलेली होती. एक मोठी जीपसारखी गाडी, तिला ‘ कोम्बी ‘म्हणत,आम्ही ठरवली होती. छत उघडू शकत असे. याचा ड्रायव्हर आमचा गाइडपण होता. त्याच्या सूचनेनुसार आम पहाटे सूर्योदयापूर्वी दोन तास हॉटेलमधून निघायचो दहापर्यंत परतायचो,दुपारी तीननंतर परत निघायचो.

असंच एका संध्याकाळी घनदाट जंगलात घुसत जाणाऱ्या स्वच्छ सुंदर रस्त्यावरून आमची कोम्बी धांवत होती आणि समोरच हत्तींचा मोठा कळप रस्ता ओलांडत होता. आम्हाला तो दुरूनच दिसला.गाडीचा वेग व आवाज कमी करून ड्रायव्हरने शक्य तितक्या जवळ नेऊन गाडी उभी केली. इतके हत्ती जवळून पाहण्यातही थरार होता, त्यांचे शिस्तीत चालणे थक्क करणारे होते.

“हत्ती जंगलात कळपानेच हिंडतात,” गाइड सांगू लागला.” कळप कितीही मोठा असतो.२०० ते ६००-८००पर्यतही असते. चालतांना ते आयताकृती रचना करतात. सर्वात मोठे.. ज्येष्ठ किंवा ताकदवर दोन हत्ती सर्वात पुढच्या रांगेत, यातील एक त्यांचा म्होरक्या. तसेच दोन सर्वात मागच्या रांगेत उरलेले कडेच्या दोन रांगांमध्ये. मोठ्या हत्तिणी सर्व रांगा पूर्ण करतात सर्वात मधे असतात नुकत्याच प्रसवलेल्या हत्तिणी ज्यांची पिल्लं पोटाखालीच असतात. त्यांच्याबाहेरच्या बाजूला गर्भार हत्तिणी, त्यातच मिसळून चालतात अशा हत्तिणी ज्यांची पिल्लं आईला लगटून, चिकटूनच चालत असतात.”मनात आलं म्हणजे समोर दिसतात ते हत्तीच,पिल्लू दिसणं शक्यच नाही.”

 कळप रस्ता ओलांडून झाडीत दिसेनासा झाला. सीटवर चढून डोकं बाहेर काढणाऱ्या मुलांना आम्ही मागे खेचले, फोटो काढणारे जागेवर बसले, ड्रायव्हरने इंजिन सुरु केले आणि…..

समोरून दोन मोठे हत्ती गाडीच्या दिशेने चालत आले, दोन हात अंतरावर गाडीकडे रोखून बघत उभे राहिले. आमची तर पाचावर धारण बसली. बाप रेss परत आले, आमचं काय चुकलं?ड्रायव्हर इंजिनचा आवाज वाढवू लागला. समोर बघायचं धाडसच होईना म्हणून मी मान मागे वळवली बाप रेs असेच दोन हत्ती पाठीमागे उभे. कडेच्या झाडीतून पाना-पाचोळ्याचा आवाज आला.. गाडीच्या तीन बाजूला हत्ती उभे होते. मी डोळे गच्च मिटून घेतले, मुलींना जवळ ओढलं व रामरक्षा म्हणायला सुरवात केली. सर्वच घाबरले बावरले होते.

“इकडे रस्त्याच्या बाजूला पहा,गाडीच्या सांवलीत हत्तीचे पिल्लू उभं आहे.” आमच्या ड्रायव्हरने सांगितले. आम्ही आळीपाळीने खिडकीतून डोकावलो.खरंच गाडीच्या अगदी जवळ एक छोटेसे पिल्लू उभं होत. त्याला दांतपण नव्हते, गाडीच्या खूपच जवळ पण बघतांना अजिबात भीति वाटत नव्हती. नुसतंच उभं होतं, सोंड, शेपूट, हलवत होत. लहान बाळाच्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटावं तसं आम्हाला त्याचं कौतुक वाटत होतं.

“समोर पहा” गाइडची सूचना, समोरच्या दोन हत्तींच्या मागून एक हत्ती रस्त्यावर आला होता व गाडीकडे येत होता.

“घाबरु नका. ती या पिल्लाची आई असेल ” गाइड. आम्ही श्वास रोखून धरले. हत्तीण जवळ आली.आपल्या सोंडेने तिने पिल्लाची सोंड पकडली व आपल्याकडे खेचू लागली. पिल्लू दुडक्या चालीने चालू लागले. आईने मुलाचा हात पकडून खेचत न्यावे तसं ती त्याला नेऊ लागली. समोरच्या दोन हत्तींच्या पाठीमागून ती त्याला घेऊन गेली.सर्व हत्ती एक एक पाऊल मागे घेत निघून गेले. गाडी भोवतालचा वेढा उठला. जीवावरचं संकट टळलं आम्ही जरा सैलावलो.पिशवीतून पाण्याच्या बाटल्या निघाल्या. थोड्या गप्पा सुरू झाल्या तेवढ्यात ड्रायव्हरने बोलायला सुरुवात केली, ” समोरून हत्ती येतांना पाहिले तेव्हा मी घाबरलोच,गाडी इतक्या जवळ आणण्यात चूक केली असंच वाटलं पाठीमागे गाडी घ्यावी म्हणून मी बाजूच्या आरशांत पाहिले, पाठीमागचे हत्ती दिसले,ते पिल्लूही दिसलं व सर्व प्रकार माझ्या लक्षांत आला.हत्ती तिन्ही बाजूने होते पण एक सांगू,त्यांचा नेता समोरच असेल,पाठीमागून हल्ला करणार नाही, इंजिनचा आवाज वाढवून मी त्याला धाक दाखवत होतो. हत्तींची पिल्लं थोडी सुटी चालू लागली तरी आईच्या सांवली सांवलीतच राहतात. सांवली थांबली की थांबतात,सावली पुढे गेली की पुढे जातात. पिल्लू गाडीच्या सावलीला फसलं.सावली थांबली होती म्हणून तेहि उभं राहिलं. आपल्या गाडीच्या तावडीतून पिल्लाला सुरक्षित परत न्यायचं म्हणून आई एकटी आली नाही कळपातील ‘दादा’ही सोबत आले होते. “

हा प्रसंग आठवला की आजही मी तो पुन्हा पुन्हा जगते,ते भय,आश्चर्य सर्व अनुभवते. गाडी समोरचे दोन हत्ती जसेच्या तसे दिसतात, नजरेतील धाक जाणवतो, व त्याबरोबरच आठवतं ते छोटंसं गोंडस पिल्लू, त्याचं निरागसपणे गाडीजवळ निवांत उभं राहणं. आणि न विसरता येणारा एक विचार…. एवढ्या मोठ्या कळपांत पिल्लू मागे राहिले हे आईने नेत्याला कसं  कधी कळवलं?इतक्या तडकाफडकी त्यांनी बेत बनवला, योजना आखली व काम फत्ते! बाकी सर्व हत्ती आहेत तिथेच थांबले होते. धन्य आहे अशा दक्ष तत्पर नेतृत्वाची, शिस्तीची, व योजनाबद्ध कामाची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *