—अजिता पणशीकर—
“आई, तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन आलाय गं! लौकर ये”, इति माझी मुलगी.
“अगं, कुठला हे तरी सांगशील का?”, मी आतूनच कुतूहलाने विचारलं.
” तुझ्या त्या लाडक्या मंजुनाथचा फोन आहे. ये पट्कन!”, ती हसत म्हणाली.
“आलेच मी. त्याला होल्ड करायला सांग!” मी लगबगीने धावले. त्याच्या फोनची मी खूप आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या आठवड्याभरात अनेकदा त्याची आठवण होऊन त्याला फोन केला, पण पट्ठ्यानं उचललाच नाही.
“कहा थे तुम मंजुनाथ? कितनी राह देख रही थी तुम्हारे फोन की!” मी अगदी काकुळतीला येऊन विचारलं.
“मैं गाव गया था, मॅडम. मेरी नानी मर गयी, इसलिये अचानक जाना पडा”, तो निर्विकारपणे म्हणाला.
ह्यांच्या किती नान्या असतात आणि त्या बिचाऱ्यांना हे लोक कितीवेळा मारतात त्याची गणतीच नसते. “‘तेरी नानी मरी तो मै क्या करू” ह्या गाण्याचा उगम असल्याच कुठल्यातरी प्रसंगाने प्रेरित असणार अशी माझी खात्री पटली.
असो! हा माझा ‘बॉयफ्रेंड’ मंजुनाथ सध्या आमच्या घरचं प्लम्बिंगचं काम निपटत होता. आधीचं घर खाली करावं लागणार होतं, त्यामुळे थोडी कामं बाकी असली तरी शिफ्ट व्हावं लागलं. आम्ही उत्साहाने नवीन घरात रहायला आलो. ह्याने तिथे लावलेले महागडे ‘ब्रँडेड’ रेन- शॉवर्स त्यांचे मन मानेल तेव्हा आमच्यावर जलवृष्टी करत होते. एकदा तर नवरा ऑफिसला तयार होऊन निघतांना तसं घडल्याने मंजुनाथवर थेट वॉरंटच निघालं होतं.
“तुम लवकर आके पहिले वो शॉवर नीट करो. अर्जंट है बहोत”, रागात भाषांची भेसळ झाली खरी, पण तो दुसऱ्याच दिवशी येऊन काम फत्ते करून गेला. असा हा खूप कुशल आणि नम्रही आहे म्हणून माझा लाडका!
सध्या रोजची एक नवीन कथा असते. त्यादिवशी दुपारभर ‘ठक…ठक…ठक…ठक’ ह्या आवाजाने डोकं नुसतं भणभणून गेलं. पण सांगते कुणाला? माझीच हौस होती नं! “नवीन घर घेतलंच आहे तर त्यात काही बदल, काही नवीन गोष्टी करून घेऊया”, असा मीच हट्ट केला होता नं! आता तोंड उघडायची म्हणून सोय नव्हती. पायावर धोंडा, नव्हे, ह्या बाबतीत पायावर हतोडा पाडून घेतला होता मी! बरं हॉलचं, बेडरूमचं फर्निचर एकवेळ ठीक आहे, पण बाथरूममधली छोटी कपाटं सुद्धा सुताराकडून करायचं काय अडलं होतं माझं? त्यात हा अली. मुख्य काम झालं होतं आणि ऍडव्हान्सही मिळाला होता. धड वेळेवर येईल तर तो अली कुठला! दुपारी दोनला उगवला! परत पाठवलं तरी पंचाईत, काम कर म्हंटलं तरी पंचाईत – तो आवाज सहन करावाच लागला!
हा अलीही माझाच ‘मित्र’ बनवून टाकला आहे मुलांनी! शेजाऱ्यांच्या घरी सुंदर काम केलं होतं, त्यामुळे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं, पण माझं मात्र रक्त आटवतोय. वयानी एवढासा दिसतो, पण त्याच्या गप्पा ऐकण्यासारख्या असतात. सगळ्या जगाची माहिती असते त्याला. ज्या सफाईने तो सर्व राजकारण्यांची चांगली तासून काढतो तितक्याच सफाईने लाकडाला तासलं असतं तर दोनदा तूसं शिरली नसती माझ्या हातात! अलीशी हुज्जत घालणे म्हणजे आपण टेबल-टेनिस खेळल्यासारखं वाटायचं; प्रश्नाला लगेच शिताफीने प्रत्युत्तर! अर्थात, त्यामुळे त्याच्याशी बोलायला मला मजाही येत असे.
सगळ्यात नमुना होता तो म्हणजे इलेक्ट्रिशियन रमेश. ह्याचं काम घरात सर्वत्र होतं. तरी हा विजेसारखा मध्येच चमकून जायचा नाहीतर दारू पिऊन कुठेतरी कोसळायचा. मग ह्याची बॅटरी चार्ज होईपर्यंत कामं खोळंबायची. “नाय हो मॅडम, तुमची शप्पथ घेतो….पुन्हा कधी दारूला हात पण नाय लावणार”, हे नेहेमीचंच. मग माझंही नेहेमीचंच, “अरे, कशाला बाबा माझ्या जीवावर उठला आहेस? तुझ्याच्यानं काही ती सुटत नाही. माझं काम नीट कर म्हणजे झालं, नाहीतर शॉक-बिक लागायचा कुठे नंतर!” तर अशा ह्या वीजतंत्र्याबरोबर कधी प्रेमाने बोलून, कधी रागावून मला दोस्ती करावी लागली.
घराला हळूहळू आम्हाला पाहिजे तसं रूप यायला लागलं होतं. वाद-विवाद, चर्चा, होत-होत का होईना पण प्लम्बिंग, इलेक्ट्रिसिटी, आणि कार्पेंटरीवाल्यांची कामं आटोपत आली होती. लागणाऱ्या इतर वस्तूंची खरेदी एकीकडे चालूच होती. किंमत जितकी जास्त तितकी नवऱ्याला बरोबर नेण्याची शक्यता जास्त. मुलं शोभेच्या वस्तू खरेदीला उत्साही असत. तसेच प्रत्येकाच्या खोलीचे रंग ठरवायलाही. पिंटोने आम्हाला दोन-तीन कंपन्यांचे शेड-कार्ड आणि डिझाईन्स दिले. तो न कंटाळता पुन्हा पुन्हा रंग-संगती दाखवत होता. रंगांचे पट्टे ओढून ते कसे दिसतील ह्याचा अंदाज देत होता. किमतीच्या बाबतीत मात्र तो म्हणेल ती काळ्या दगडावरची रेघ! जरा घासाघीस करायचा प्रयत्न केला तर ह्या आमच्या ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है?’ हे विचारावं लागणार नाही! पण तो घराचं पेंटिंग, वेगवेगळी टेक्सचर्स वगैरे सर्व मनापासून, अप्रतिम करत होता. हा आला की मुलगा लगेच “आई, तुझा अजून एक दोस्त आलाय बघ”, असं चिडवत म्हणायचा.
घर सजवण्यात मी रमले होते. नवऱ्याने तर चक्क कबूलच करून टाकलं की ह्या सगळ्या मंडळींशी जुळवून घेतलं म्हणून आपल्या घरचं काम छान पार पडलं. मी त्यांच्याशी गप्पा मारल्याने, त्यांची आपुलकीने चौकशी केल्याने, त्यांना चहा-पोहे खायला घातल्याने (जर कमी पडले तर एक वेळ त्याला मिळणार नाहीत, पण माझ्या ह्या सर्व मित्रांना नक्की देईन असाही आरोप माझ्यावर करण्यात आला होता!), त्यांच्याबरोबर गुण्यागोविंदाने नांदल्याने, हे सर्व सुरळीत पार पडलं असं मला सर्टिफिकेटही मिळालं! मला झालेला मानसिक त्रास मी सांगणारच होते, पण मग तो मोह टाळला वाटलं. म्हंटलं, एवढं कौतुक होतंय तर त्रास जरा विसरूया नं!
आता हे सर्व होऊन दोन वर्ष झाली. अधून-मधून कोणी विचारलं तर ह्या माझ्या मित्रांची, त्या त्या कामासाठी मी शिफारसही केली. मग त्यांना व्हाट्सप करून कळवत असे. पण जसजसे दिवस गेले तसतसे घराचे, केलेल्या कामाचे, नवीन प्रॉब्लेम्स पुढे येऊ लागले. कुठे खिळेच निघाले, तर कुठे नळ गळाले, कुठे पोपडे उडाले तर कुठे दिवे बिघडले. ‘लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून’ ह्या म्हणीचा पूर्ण अर्थ स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही, हेच खरं! माझ्या फोन मधून ह्या, आणि अशाच इतर सगळ्या, ‘बॉयफ्रेंड्स’ चे नंबर मी काढून टाकले नाहीत हे किती बरं झालं. आता पुन्हा जेव्हा कामं उपटताहेत तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतंय! जसा सूर्यप्रकाश आपल्याला आयुष्यभर लागतच राहतो ना, तसेच हे मित्रही आपले Best Friends Forever (BFF) असावेच लागतात. ह्या माझ्या साऱ्या ‘मित्रांना’ मला एवढंच सांगावंसं वाटतं –
घरच्या कामासाठी म्हणून
आयुष्यात माझ्या येऊन गेलात,
थोडे काम भरपूर दाम
नाते असे जोडून गेलात.
मित्रांनो तुम्ही जातांना
सर्व अर्ध्यावर टाकून गेलात,
अनंत तुमच्या कर्मांची
फळे मला देऊन गेलात.
काय बिघडवलं तुमचं मी
शिक्षा अशी देऊन गेलात,
खायला छान दिलं तरी
पाणी मला पाजून गेलात.
सतत तुमची आठवण यावी
अशी सोय करून गेलात,
पडणे, गळणे, लागणे सारे
माझ्या पदरी ठेऊन गेलात.
तुमच्याशिवाय जीवन माझे
फोल आहे सांगून गेलात,
मित्र माझे सोबती तुम्ही
कायमचेच होऊन गेलात.
ॐ मित्रेभ्यः नमः !!
