–रसिका राजीव हिंगे–
आपल्या आयुष्यात कितीतरी असंख्य क्षण असतात. प्रत्येक क्षण लक्षात ठेवणे शक्य नसले तरी एखादा क्षण अविस्मरणीय ठरतो. हातात पकडून ठेवलेला असतो तो क्षण. कधीही निसटू शकत नाही असा अविस्मरणीय.
देव आहे की नाही, असेल तर कसा असेल? विश्वास ठेवावा की नाही? कोणत्या देवाची आराधना करावी? प्रत्येकाच्या मनात अशा कितीतरी प्रश्नांची आवर्तन सतत सुरू असतात. माझ्याही मनात असेच नेहमी प्रश्न सतत गिरक्या घेतात भोवती. पण आयुष्यात काही घटना अशा घडतात की आजन्म विसरू म्हटले तरी शक्य होत नाही. खूप काही शिकवून जातात किंवा अनुभूती तरी देतात.
निर्गुण निराकार कोणत्या सगुण साकार रुपात सावरेल हे कळत नाही हेच खरे. निदान मला तरी असंच वाटतं. कारण काही गोष्टी या मानवाच्या पल्याड असतात, तिथे साधनेशिवाय माणसाला पोहचणे शक्य नाही. मला पण असेच वाटले एका प्रसंगामुळे. तो प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही, इतका की आधी दुःखद वाटणारा पण त्यानंतर मात्र सुखावणारा असा क्षण.
घर संसार म्हटले की सणवार, सोहळे, नातीगोती, याची जंत्री चालूच रहाते. सर्व सामान्य माणूस यात रमत जातो. मी ही छोट्या छोट्या प्रसंगात सुख शोधत गेले. चारचौघांसारखे आयुष्य म्हणजे संसार मुलंबाळं, त्यांचे शिक्षण, लग्न, लग्नानंतर येणारे सणवार केले की झाली इतिकर्तव्यता. माझ्या मुलीचे लग्न झाले आणि त्यानंतर येणारा पहिला सण मंगळागौरी. यासाठी तिला माहेरी बोलावले. तिच्या सासरचे सगळे आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमासाठी सजावट करणे जणू आजकाल अपरिहार्य झाले आहे की काय न कळे. मूळ उद्देश साध्य करत असतानाच वेगवेगळी सजावट करणे हे विशेष आकर्षण ठरतं. पूजेची तयारी, आलेल्या पाहुण्याचे खाणे पिणे, त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे ह्यामध्येच माझा वेळ जात होता. सगळे आलेले पाहुणे 20 ते 25 जण घरात होतो.
इकडे आलेलो आहेच तर शेगांवला जाऊन महाराजांचे दर्शन घ्यायचे ठरलेलेच होतं. सकाळी उठल्याबरोबर आज शेगावला जायचे असे ठरले. “आज नको आपण नंतर जाऊ, घाईघाई करण्यापेक्षा कार्यक्रम झाल्यानंतर जाऊ असे माझे म्हणणे होते. शिवाय नणंदेच्या विहिणबाईंकडे जेवायला जायचे होते. सकाळपासून लवकर आटपा प्रत्येकजण एकमेकाना म्हणत होते पण गप्पांचा ओघ काही थांबत नव्हता. स्वयंपाकाच्या काकू म्हणाल्याच,” असे सगळे इथे तिथे बसून गप्पा करत बसला तर काही खरं नाही तुमचं शेगांव! आज एकादशी आहे, गर्दी असेल खूप.”
“अरे मस्त दिवस आहे आजचा, आता तू काहीच नाही वगैरे नको म्हणू , एकादशी आहे, छान योग आलाय दर्शनाचा. असे कर तू सव्वा किलोचा प्रसाद घेऊन चल महाराजांच्या नैवेद्यासाठी. मी तयार करते.” वन्सनी फर्मान काढले. लगेच सव्वा किलोचा सांग्रसगीत वन्सना हवा तसाच नेहमीप्रमाणे उत्तम प्रसाद तयार झाला. विहिणबाईंकडे जेवायला गेलो सगळेच. घरी येईपर्यंत तीन वाजले होते. प्रसादाचा डबा घेऊन कुलपं घातली आणि आमचा लवाजमा जी. एम. म्हणजे गजानन महाराजांचे दरबारी जाण्यास निघाला. सव्वा चारला दरबारी डेरेदाखल झाले. तिथे सगळ्यानी पेढे घेतले म्हणून मी ही घ्यायला गेले तर ,” तू नको घेऊ पेढे, तू प्रसाद आणला आहेस ना. मलाही पटले आणि मंदिरात दर्शनासाठी निघालो. आधी नैवेद्य देऊन येऊ महाराजांना. सगळेच वर जिथे नैवेद्य स्वीकारल्या जातो तिथे प्रसाद घेऊन गेल्यावर तेथील पुजाऱ्यांनी प्रसादाचा शिरा पाहिल्याबरोबर लगेच म्हणाले, ” माऊली, हा प्रसाद स्वीकारणार नाहीत महाराज आज. एकादशी आहे. आज कसा चालेल हा प्रसाद! हे ऐकल्याबरोबर माझे सगळे अवसान गळाले. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. का असे झाले? लक्षात कसे नाही आले माझ्या? सकाळपासून दोन तीनदा एकादशी आहे याचे उच्चारण झाले. तरी का असे! हेही माहीत आहे की एकादशीला मंदिराच्या आवारात सुद्धा उपवासाच्या पदार्थाशिवाय इतर पदार्थ चालत नाहीत. नको ते विचार मनात गोंधळ घालायला लागले. ही कोणत्या संकटाची नांदी तर नसेल ना! काय सुचवायचे आहे यातून? जड अंतःकरणाने तिथून निघाली. पापणकाठी अश्रूंच्या लाटा येऊन थडकत होत्या.
घरी पोहचल्यावर दार उघडले अन बैठकीत समोरच घरात लावलेली शोकेस खाली पडलेली दिसली. आधी वाटले चोरी झाली की काय घरात? पण हळूहळू लक्षात यायला लागले वर असलेली पुस्तकांची शोकेस खाली पडली. यामध्ये जवळपास 200 ते 250 पेक्षा जास्त पुस्तकं होती. शिवाय एका बाजूला काही शोभेच्या वस्तू होत्या. शोकेसच्या खालीच दिवाण आणि सोफा ठेवलेला. घरात पाहुणे इतके होते की त्यावर कायम कुणी न कुणी बसलेलं असायचेच. जर का आम्ही घरी असतो तर काय झालं असतं या कल्पनेने माझे हातपाय थरथरायला लागले. सगळंच कल्पनेच्या पल्याड होतं. किती मोठं गंडांतर माझ्यावरचे टळले होते. काही विपरीत घडले असते तर आयुष्यभर मनाला टोचणी लागून राहिली असती. माझा मुलगा हळूच मला म्हणाला, “आई तुला तर असंच वाटत असेल आता, महाराजांनी वाचवलं आपल्याला.” तो असं बोलल्याबरोबर लख्खकन वीज चमकावी तसे झाले, होय महाराज होते म्हणूनच आपण वाचलो. हा इतका मोठा धक्का होता. पण मुलाने असे म्हटल्यामुळे मी जणू भानावर आले. याच साठी केला होता अट्टहास तेथे दर्शनासाठी येण्याचा.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज…. च्या गजरातच त्यांचे मानस पूजन मांडले, कृतार्थतेचे अश्रू त्यांच्या चरणांचे प्रक्षालन करत होते, विश्वासाचे गंधलेपन आणि भावफुलांची माला त्यांना अर्पण करून आर्ततेने आरती ओवाळली. त्यांच्या कृपामृताच्या वर्षावात मी तृप्त झाले होते…..
एक परी रूप अनेक
तूच तू रे भवतारक
सांभाळी गुरुराया रे
देवा भक्तप्रतिपालक
