सनविवि ललित,साहित्योन्मेष भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने  वाढते किंवा कमी होते?

भाषेचे सौंदर्य बोलीभाषेच्या वापराने  वाढते किंवा कमी होते?

—– रसिका राजीव हिंगे —–

 

व्यंजन आणि स्वरांचे

मिलन झाले  भूवरी

शब्द अवतरले अन

प्रगटली भाषा सुंदरी

 

     जेव्हा या सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळी संपूर्ण प्राणिजात जन्माला घालतांना निर्मात्याने मनुष्य प्राण्यास बुद्धी आणि  मन नावाची एक चीज दान केली आहे, या मनातील भावभावनांचे सादरीकरण करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी भाषा प्रदान केली. 

     अक्षर केव्हा आणि कसे प्रगट झाले हे नक्की जरी सांगता येत नसले तरी अति प्राचीन  काळापासून  अक्षर अस्तित्वात आहेत,  हे निर्विवाद सत्य आहे.

     प्राचीन काळी मानव हा एकटाच जंगलामध्ये रहात होता. हळूहळू पुढे गट, समूह,  तयार करून रहायला लागला. आपसात देवाण घेवाण होऊ लागली, सहवासात राहिल्यामुळे त्याच्या भावना विकसित झाल्या. त्याच्या मनातील भावभावनांचे तरंग अक्षरांमध्ये उमटू लागले, हे  व्यक्त करण्यासाठी ईश्वराने प्रदान केलेल्या बोलण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. मुखावाटे आवाज येऊ लागला म्हणजेच अक्षरांचा बोध झाला, शब्द, वाक्य विकसित होऊ लागले. अक्षर, शब्द हे बुद्धीच्या कसोटीवर घासून, स्वतःच्या बुद्धीचे सामर्थ्यानुसार भाषेमुळे प्रेम, राग, द्वेष, मत्सर या सारख्या भावना व्यक्त होत गेल्या आणि भाषा समृद्ध होत गेली. 

     वास्तविक पाहता प्रत्येक बारा कोसांवर भाषा बदलते. भाषेचं स्वरूप बदलत जातं. तरीही तिचं सौंदर्य मात्र बदलत नाही. शब्द कसेही असले तरी त्या त्या भागातील ते प्रमाण असतात.  प्रांताची ओळख होते बोली भाषेमुळे. सांस्कृतिक वारसा, परंपरा, जगण्याची पद्धत, शब्द उच्चारण, यावरून त्या त्या ठिकाणी भाषा बोलली जाते. प्रत्येक बोलीभाषेत गोडवा कायम आहेच. 

     साधारण सगळ्याच बोलीभाषेची जननी संस्कृत भाषा आहे. असे असले तरी कालांतराने त्यात बदल होत गेले. उच्चारण पद्धती बदलली. जसे शब्द बोलता येत होते तसेच शब्द बोलल्या जाऊ लागले. आणि तीच त्या त्या प्रांताची बोलीभाषा झाली. परंपरेने चालत आलेल्या शब्दांचा, अक्षरांचा उपयोग पिढ्यांपिढ्या जसाच्या तसा होत गेला, वारसा तसाच पुढे जातो. बोललेले ऐकणाऱ्याला कळले की झालं, भाव व्यक्त होणे गरजेचे, भाषा शुद्ध की अशुद्ध याला महत्त्व नाही. बोलीभाषा टिकून राहिली तर संस्कृती टिकेल.

     ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेतील गीता सामान्य लोकांपर्यंत पोहचावी म्हणून मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली. ती लिहिता लिहिता समोर बसलेल्या सामान्य जनसमुदायला समजावत लिहीत गेले.  समोर बसलेला सामान्य इतका सामान्य होता की त्यांना ज्ञानोबा, ज्ञानेश्वर या शब्दांचे उच्चारण पण येत नव्हते, ग्यानबा म्हाराज असे उच्चारत त्यांनी महाराजांबद्दलचा आदरभाव, भक्ती व्यक्त केली, ग्यानबा तुकाराम च्या गजरातच  सगळ्यांच्या मनातला भक्तिभाव जागृत झाला. विशेष म्हणजे पुढे ग्यानबाच प्रचलित झाले. इथे शुद्धतेचे परिमाण मोजण्यापेक्षा शुद्ध भक्तिभाव, आदर आणि तसेच आचरणही महत्वाचे ठरले. भाषा शुद्धतेचा अडसर नाही आला इथे. म्हणजे काय तर बोलीभाषा कोणतीही असो भाव महत्वाचा. “माय, मले भाकर दे!” किंवा “आई, मला जेवायला वाढ!”  ह्या दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे. इथे भाषा कोणती हे महत्वाचे नाहीच फक्त अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे त्या भाषेचे सौंदर्य कमी होत नाही तर वाढतेच आहे.  कारण प्रत्येकालाच प्रमाण भाषा किंवा शुद्ध भाषा बोलता यावी हे गरजेचे नाही. बोलीभाषा ही त्या त्या प्रांताचे सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व जपते.

     सर्वसाधारण बोलीभाषा आणि प्रमाण भाषा  दोन्ही जरी वापरात असल्या तरी ही प्रमाण भाषा महत्वाचीच आहे. शुध्दव्याकरण, शुद्ध उच्चारण व्यक्तिमत्व विकासाचे निकष ठरू शकेलं. यासाठी भाषा  बोलता येते म्हणजे त्या भाषेचे व्याकरण ही कळतेच असे नाही. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे गरजेचे आहे. ” व्यक्रियनो शब्द अनेन इति व्याकरणम्!” म्हणजे ज्याच्यामुळे अशुद्ध शब्द,अपशब्द वेगळे काढले जातात किंवा शुद्ध शब्दांचे ज्ञान होते ते व्याकरण. भाषेच्या  प्रत्येक कंगोऱ्याचे विवेचन केले जाते.  अशी तावून सुलाखून निघालेली भाषा म्हणजे प्रमाण भाषा, शुद्ध भाषा. शहरी भाषा ही प्रमाण भाषा.  बोलीभाषेत बोलणं असलं तरी लेखन हे प्रमाण भाषेतच लिहिल्या जातं. प्रतिभाशाली साहित्य लिहायाचे म्हणजे शास्त्रशुद्ध प्रमाण भाषेतच लिहिले तर वाचकांच्या पचनी पडतं म्हणजे वाचकांना आवडतं. किंबहुना साहित्य हे प्रमाण, शास्त्रशुद्ध भाषेतच असावे म्हणजे येणाऱ्या पिढीवर चांगल्या भाषेचे संस्कार होतील आणि भाषेचे सौंदर्य कसे आहे, तिला कोणकोणत्या अलंकारांनी सजवता येईल याचे ज्ञान कदाचित मिळेल. दीर्घ, र्हस्व जर चुकले तर अर्थ बदलतो. न आणि ण चे उच्चारण योग्य पद्धतीने व्हायलाच हवे. तरच भाषेचे सौंदर्य अबाधित राहील. वारंवार चांगलेच वाचायला मिळाले, ऐकायला मिळाले तर तरुणाईला पण भाषेचे सौंदर्य कळेल आणि भाषा अधिक सौंदर्यवती होईल, समृद्ध होईल.

     शास्त्रशुद्ध भाषा निर्मितीसाठी, भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी व्याकरणकार म्हणजे वाक्यकार वररूची, भाष्यकार पतंजली आणि सुत्रकार पाणिनी यांनी जे परिश्रम घेतले आहे ते वंदनीय आहेत. शास्त्रशुद्ध भाषेचे उच्चारण म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासातील एक मैलाचा दगड म्हणता येईल. सुशिक्षित असलेला जर बोलीभाषेत बोलत असेल तर  एक प्रकारे अशिक्षित पणाचे द्योतक आहे असे वाटते. ज्याला आपण इंग्रजीत standard maintain करणे म्हणतो ते शुद्ध भाषेमुळे होतं. 

     शेवटी काय तर ज्याला जे भावेल, रुचेल तेच  तो बोलेल.  बोलीभाषेमुळे भाषेचे सौंदर्य कमी होईल की वाढेल हे प्रत्येकाला आलेल्या अनुभवांती ठरेलच. नाही का!…….

 

©®रसिका राजीव हिंगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *