आनंदसोहोळा

अजिता पणशीकर–

       

काही गोष्टी मनात घर करून रहातात. त्यातला कुठलातरी पैलू आपल्या हृदयाला भिडून गेलेला असतो. विशेषतः आजच्या व्यावहारिक जगात दुर्मिळ होत चाललेला सालसपणा, प्रामाणिकपणा, मनाचा चांगुलपणा; ह्यांची झलक दिसली तर मनाला स्पर्शून गेल्याशिवाय रहात नाही. काळाच्या आणि कामाच्या ओघात आपण असे प्रसंग विसरून जातो. मग अचानक त्या आठवणी पुढे येतात आणि झर्रकन एखादा सिनेमा पहावा तश्या डोळ्यांसमोर दिसू लागतात. त्या दिवशी अगदी तसंच झालं!  

दुपारची वेळ. मी जरा घाईतच होते. पट्कन सामान घेऊन मला बोरिवली गाठायची होती. बाजारातून जाताना मागून एका लहान मुलीची हाक आली. दादरच्या एवढ्या गर्दीत मला कोण बोलवतंय म्हणून वळले. बघते तर आद्या! सात वर्षांची, रंगीबेरंगी फुलांचा फ्रॉक घातलेली ती, गोड हसत मला हात करत होती. “बाबा बरोबर मी चित्रकलेची पुस्तकं घ्यायला आलेय!” बागडतच तिने सांगितले. नकळत माझे डोळे पाणावले. माझ्याकडे पहात प्रशांतने हलकेच मान हलवली. ” कशा आहात तुम्ही? स्नेहा आणि मी तुमची अनेकदा आठवण काढतो… अहो, पण तुम्ही खूप गडबडीत दिसताय. भेटू नक्की पुन्हा!”, म्हणत ते दोघे लगेच दुकानात शिरले.  

बसमध्ये येऊन बसले आणि माझं मन मला दोन वर्ष मागे घेऊन गेलं. माझ्याकडे अगदी जगावेगळे प्रश्न घेऊन आलेला प्रशांत आठवला. मध्यम बांध्याचा, धारदार नाकाचा, आणि मंद स्मित हास्य असेलेला बत्तीस वर्षांचा तरुण. एक कौन्सेलर म्हणून त्याला कोणीतरी माझं नाव सुचवलं होतं. पहिल्या घटस्फोटानंतर, तीन वर्ष घेतली होती त्याने पुन्हा लग्नाचा विचार करायला. कुठेतरी धाकधुक होती मनात.

इंटरनेटवर भेटलेली, तरतरीत व गोल चेहेऱ्याची स्नेहा आणि तिचं खेळकर व्यक्तिमत्व त्याला फार भावलं. तिलाही तो मनापासून आवडला. पण लग्न करायच्या आधी तिच्या छोट्या आद्याला आपलंसं करायचा त्याचा खास आग्रह होता. लग्न हे दोन जीवांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन आहे असं आपण मानतो. पण पुनर्विवाह म्हंटला की सर्व प्रकरण अजूनच गुंतागुंतीचं होतं. आधीच्या लग्नाचे आणि नात्यांचे पडसाद आयुष्यभर जखमा बनून तर रहाणार नाहीत नं, ही भीती असते. सावत्र आई असली तर तिने सांभाळून घ्यायचंच असतं, पण सावत्र वडीलांना मात्र मुलांनी सामावून घ्यायचं असतं ह्या विचारसरणीचा आपला समाज.  त्यातून, पाच वर्षांची मुलगी लग्नानंतर नव्या वडिलां बरोबर रुळेल, असं गृहीतच धरलं जातं. त्या एवढ्याशा जीवाचा विचार कोण करतं? ह्या धर्तीवर, त्याचा हा संवेदनशील प्रयत्न मला खूप कौतुकास्पद वाटला.

सुरवातीला प्रशांत स्नेहाकडे गेला की आद्या, “का येतो हा माणूस आपल्याकडे सारखा? मला नाही आवडत”, म्हणत आईच्या मागे लपून बसायची. तो भांबावून गेला होता. आमच्या सेशन मध्ये सुचवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टीही लिहून घ्यायचा. आद्याला डोसा खूप आवडतो म्हंटल्यावर प्रशांतने घरी प्रॅक्टिस करुन मग तिला तो अनेकदा करून दिला. तिला गार्डनमध्ये कसा घेऊन गेला, स्नेहा शॉपिंग करत असतांना आद्याबरोबर रस्त्यावरच्या गाड्या कशा मोजल्या, तिचं टेबल आवरायला कशी मदत केली, हे सारं सांगताना त्याचे चमकणारे डोळे खूप काही सांगून जात!

एका सेशनसाठी स्नेहा प्रशांतबरोबर आली. आद्याची अजूनही प्रशांतशी हवी तशी दोस्ती झाली नव्हती. मुलीच्या मनाविरुद्ध तीही पुढे जाऊ शकत नव्हती. काळजीत दिसत होते दोघे. “आम्ही नवरा-बायको होऊ शकू नं? हे प्रश्नचिन्ह चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मध्येच स्नेहाने त्याच्या अस्वस्थपणे हलणाऱ्या पायावर चेष्टेने फटका मारत म्हंटलं, “अरे, थांबव….होईल सगळं ठीक”. मला हसू आलं. “नक्की होणार तुमचं लग्न. अरे, अगदी नवरा-बायकोसारखं ओळखता की एकमेकांना!” त्यांचे ते खुललेले चेहेरे अजुनही माझ्या डोळ्यापुढे आहेत! 

स्नेहाला विचारून आद्याच्या आवडत्या कार्टून डोरेमॉनवर त्याने चक्क रिसर्च केलं, तिच्या जोडीने बसून ते शोज पाहू लागला. आद्या सोफ्याच्या दुसऱ्या टोकाला बसत असे. कार्टून बघत गप्पा जशा रंगायला लागल्या तसं त्यांच्यातील अंतर कमी होऊ लागलं. त्यांना एकत्र वेळ देण्यासाठी स्नेहा दुसऱ्या खोलीत पेंटिंग करत बसायची. तिला जात्याच कलेचं अंग होतं; तेच तिच्या मुलीत उतरलं होतं. आद्याच्या खोलीत ‘माझी फॅमिली’ नावाचं स्वतः काढलेलं एक छानसं चित्र ठेवलं होतं, आणि त्यावर बाण काढून आद्या आणि आई लिहिलं होतं.     

दचकून कंडक्टरच्या “तिकीट, तिकीट” ने भानावर आले, त्याला पैसे दिले. बाजूला गर्दी वाढली होती, पण खिडकीची जागा मिळाल्याने मी डोळे मिटून घेतले आणि माझा सिनेमा पुन्हा सुरु झाला…. 

स्नेहा सुद्धा प्रशांत प्रमाणेच एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती. आधी अमेरिकेत असतांना तिचा नवरा ऍक्सीडेन्टमध्ये गेला तेव्हा आद्या जेमतेम वर्षीची होती. मोठा धक्काच होता तो! भारतात परत आल्यावर सासऱ्यांनी तिला एक चांगलं घर घेऊन दिलं होतं. सासूबाईही नसल्याने, आणि आता मुलगाही गेल्याने हळवे झाले होते. आद्या त्यांची जीव की प्राण होती. “अगं, आद्या लहान आहे तेव्हाच पुन्हा लग्नाचा विचार कर”, सासरे सांगत होते. ते कुठेतरी स्नेहाच्या मनाला पटलंही होतं. त्या दोघांमध्ये वडील-मुलीचं नातं जास्त आणि सासरा-सुनेचे कमी होतं. त्यामुळे ह्या नवीन लग्नाने आपली नात आपल्याला दुरावणार नाही ह्याची त्यांना खात्री होती, पण हा नवीन जावई आपल्याला मान देईल का हा कुठेतरी प्रश्न  होताच. 

स्नेहाच्या आईला मात्र जरी एकीकडे आनंद असला तरी तितकीच काळजीही होती.  स्नेहाकडून प्रशांतने खूप अपेक्षा केल्या आणि आद्या दुर्लक्षित झाली तर? आद्याला जर वडिलांचं प्रेम देणारा बाबा मिळाला नाही तर? त्या दोघी दुःखी झाल्या तर? प्रशांतच्या आई वेगळ्याच विवंचनेत होत्या. पहिल्या लग्नाच्या कडू अनुभवानंतर आता पुढे जाणाऱ्या मुलाची काळजी वाटत होती. तो किती भावनाप्रधान आहे; स्नेहा त्याला समजून घेईल का? तिला एक लहान मुलगी आहे; प्रशांतला जमेल का ‘बाबा’ व्हायला? ह्या प्रश्नांचा भुंगा आधीच डोक्यात होता. त्यातून त्या एकदा स्नेहाच्या घरी गेल्या तेव्हा प्रशांतला सहज स्वयंपाकघरात जाऊन कप-बश्या धुतांना पाहिलं. ही मुलगी माझ्या प्रशांतच्या साधेपणाचा फायदा तर घेत नाही नं…मनात हळूच पाल चुकचुकली…

माणसाच्या अंतर्मनाचा हा न संपणारा संवाद आहे. सुखात असो व दुःखात, शंका-कुशंका आपली पाठ सोडत नाहीत. अशावेळी आशावाद आणि प्रयत्नवाद ह्यांना आपलंसं केलं तर वरवर आव्हानात्मक वाटणारी गोष्ट देखील शक्य होऊ शकते हे प्रशांतने दाखवून दिले. ह्या सर्वांशीच मोकळेपणानी बोलायचा प्रशांतला सल्ला दिला; त्याने तो आचरणातही आणला. बघता-बघता त्याने सर्वांची मनं जिंकली. ह्याची सर्वात मोठी पावती आद्याने दिली. तिच्या खोलीतल्या ‘माझी फॅमिली’ चित्रात दुसऱ्या बाजूला एक पुरुष काढून आता तिथे तिने  ‘बाबा’ लिहिलं होतं!! 

आज अचानक प्रशांत बाजारात भेटला आणि माझ्या मनाला भिडलेली त्याची संवेदनशीलता पुन्हा जाणवली. त्यांच्या लग्नाचा आनंदसोहोळा आठवला. आपण अधून-मधून पुनर्विवाह झाल्याचं ऐकतो. “वा, छान झालं” म्हणतो आणि आपल्या आयुष्यात दंग होतो. फक्त जवळून पाहणाऱ्यालाच ह्या रेशीम धाग्यांतील ताण आणि नाजूकपणा जाणवतो. त्या चार महिन्यात मी सर्वांनाच वेगवेगळ्या वेळी कॉउंसेलिंगसाठी भेटले होते. आज त्यांचे सर्व कुटुंबीय खुश दिसत होते. आपण एखादा वाद्यवृंद पहावा, ऐकावा तसं ते विलोभनीय दृश्य होतं. ह्यातील प्रत्येक वाद्य, प्रत्येक वादक सुसंगत होता. त्या सुमधुर संगीताने माझं मन भरून आलं….

तृप्त भावनेने डोळे उघडले. ह्या आठवणींच्या प्रवासात मी माझ्या मुक्कामी कधी पोहोचले ते कळलंच नव्हतं! 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *