पानाचा ओवा

 

                            

                                         — सौ.विद्या चिडले      

 

पोपटी रंगाच्या, मखमली व किनारीला झिगझॅग असलेल्या पानाचे हे रोप सुबक-सुंदर दिसते. दहा बारा इंच वाढणारे हे झाड आज बहुतेक बागप्रेमी, आपल्या घराच्या बागेत छोट्या कुंडीत लावातात. नेत्रसुख देणारे हे रोप आपल्या सुगंधानी सर्वांना वेड लावते. ह्या रोपाची पाने मात्र औषधी गुणयुक्त आहेत. सुगंध ओव्यासारखाच आहे, तरी ओव्याचे झाड व पानाचा ओवा ह्यात फरक आहे. पानाच्या ओव्याला फुलं व फळं येत नाहीत. तसेच ओव्याचे झाड, ज्याला ओव्याच्या बिया लागतात, ते कोथिंबीरीसारखे दिसते. तर पानाच्या ओव्याच्या झाडाची पाने जाडी व आकाराने मोठी असतात. 

आपण रोज स्वयंपाकात जो ओवा वापरतो तसेच जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी व पचनासाठी वापरतो त्या ओव्याचे गुणधर्म व पानाच्या ओव्याचे गुणधर्म  बहुतांशी सारखेच आहेत. ह्या झाडाची पाने औषधी गुणयुक्त आहेत. त्यातील काही गुण खालीलप्रमाणे..

१] ओव्याचे पान वातविकार कमी करते.

२] अपचन झाले असल्यास एखादे पान चावून चावून खातात. 

३] पोटदुखी व पोटशूळ ह्यावर ओव्याचे पान किंवा त्या पानांचा पाच-सहा थेंब रस काढून त्याचे सेवन केल्यास आराम मिळतो. 

४] जुना खोकला अथवा दमा असेल तर ओव्याच्या पानाच्या रसाने फायदा होतो.

५] फेफरे येत असतील तर त्यावरही ह्या पानाचा पाच-सहा थेंब रस देतात.

६] ओव्याच्या पानाचे सेवन जंत समस्येवर खूप गुणकारी आहे. 

७] डोकेदुखीवर पाने चावून चावून खाल्ल्यास उपयोगी ठरतात. 

८] किटकदंश झाला असेल तर, त्वचेवर ज्या ठिकाणी दंश झालाय त्या भागावर ओव्याच्या पानांचा रस चोळतात.

९] लहान मुलांना पानांचा पाच-सहा थेंब रस साखरेसोबत देतात. 

१०]ओव्याचे पान चावून चावून खाल्ल्यास हिरड्या निरोगी रहाण्यास मदत होते. 

११]ओव्याच्या पानाच्या सेवनाने हायड्रेशन चांगले रहाते. 

१२] ह्या पानाचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. 

१३] ओव्याच्या पानाच्या रसाचे सेवन मधाबरोबर करतात ते संधिवातावर फायदेशीर ठरते.

१४] ताप आला असल्यास ओव्याच्या पानाचे सेवन करतात.

१५] ओव्याच्या पानांत बरीच पोषक तत्वे आहेत. ह्या पानांत अ, क आणि ड ही जीवनसत्वे व सोडियम,लोह,कॅल्शियम व पोटॅशियम ही पोषके प्रचूर मात्रेत उपलब्ध असतात. 

१६] अँटि ऑक्सिडंट,बॅक्टेरियाविरोधी, बुरशीविरोधी, अँटि एजिंग अशी तत्व बर्‍याच प्रमाणात आहेत.  

१७] अंगावर कुठे सूज आली असेल तर पाने वाटून त्या भागावर लेप लावतात. 

१८] पित्त वाढले असेल, पोटात जळजळ होत असेल तर पाने पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास आराम मिळतो. 

१९] ही पाने उष्ण व तीक्ष्ण असतात. होमिओपॅथीची अनेक औषधे तयार करताना ओव्याच्या पानांचा अर्क वापरतात. 

२०] पानांच्या सेवनाने पचन सुधारते, भूक वाढते.

वर नमूद केलेले अनेक औषधीगुण असलेली ही वनस्पती तोंडाची निगा राखते व चवही वाढवते. भरपूर स्वाद आणि सुगंध असलेल्या ह्या पानांचे स्वयंपाक घरातही महत्त्व आहे. आपल्या बागेतल्या ह्या झाडाच्या ताज्या करकरीत पानांची भजी लज्जतदार लागतात. तसेच भाजी व चटणी करतात. ओव्याची पाने नेत्रसुख तर देतातच शिवाय त्याने घ्राणेंद्रियही सुखावतात.

सौंदर्यपूर्ण अशा ह्या सुगंधी व चविष्ट पानाचे रोप आपल्या बागेत लावणे फारच सोपे आहे. कुंडीत भुसभुशीत व खतयुक्त माती घालून हे रोप लावले की सहज रुजते. ह्या रोपाचे कलम लावतात. कुंडीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे अती पाण्याने रोप कुजणार नाही. रोज थोडे थोडे पाणी घालून माती ओलसर ठेवल्यास वाढते. तसे हे  रोप  खूप मोठे होत नाही. हे झाड जमिनीवर लवकर पसरते. त्यामुळे कुंडीत लावणे जास्त योग्य ठरते.ओव्याच्या पानांचा डेरा कुंडीत छान वाढतो व बागेचे सौंदर्य वाढवतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *