श्रध्दांजली -विक्रम किर्लोस्कर एक दूरदर्शी यशस्वी उद्योजक
नेहमीच भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विचार मांडणारा;कुठल्याही अडीअडचणीत लोकांना आणि संस्थाना मदत करणारा,तंत्रज्ञानात पारंगत असणारा, हसतमुख चेहरा म्हणजेच विक्रम किर्लोस्कर, 29 नोव्हेंबरला अनंतात विलीन झाला.भारतीय वाहन उद्योगाला फार मोठा फटका बसला.
किर्लोस्कर समूहाने 1998-99 साली सर्व उत्पादनांची गुणवत्ता जागतिक स्तरावर नेण्यासाठी,समूहातील सर्व कंपन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कमिटी नेमली होती. त्यावर आम्ही दोघांनी एकत्र काम केले होते. तसेच किर्लोस्कर ब्रदर्स (मूळ कंपनी) व किर्लोस्कर न्यूमॅटिक्स या दोन्ही कंपन्यांच्या बोर्डावर आम्ही दोघांनी डायरेक्टर म्हणून काही वर्षे काम केले;म्हणून विक्रमला जवळून बघण्याची व जाणून घेण्याची मला संधी मिळाली. ही एक अतिशय विनम्र,मनमिळाऊ, नेहमी मदत करण्याची वृत्ती असलेली हसर्या चेहर्याची व्यक्ती होती. काळाने अशा व्यक्तीला वयाच्या 64व्या वर्षी आमच्यातून का ओढून नेले? हे एक मोठे प्रश्नचिन्ह आहे.
MITचा पदवीधर असल्यामुळे त्याचे तांत्रिक ज्ञान अव्वल दर्जाचे होते. कुठल्याही तांत्रिक विषयावर त्याचे माहितीपूर्ण विचार असत. टोयोटाच्या गुणवत्ता वाढवण्याचा निरनिराळ्या पद्धतीचा त्याचा सखोल अभ्यास होता. त्याचा किर्लोस्कर समूहाला फायदा झाला.
किर्लोस्कर कमिन्समध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून काम केल्यानंतर त्याची नेमणूक म्हैसूर किर्लोस्कर हरिहर चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली. त्यानंतर काही वर्षांनी जगात अग्रेसर असणार्या टोयोटा कंपनीला वाहन क्षेत्रात का आणू नये? यावर त्याचा विचार चालू झाला. टोयोटाला भारतात कारखाना सुरू
करणे,सर्व दृष्ट्या अतिशय कठीण वाटत होते. सरकारच्या निरनिराळ्या धोरणांमुळे ते भारतात यायला तयार नव्हते. विक्रमने सातत्याने जवळजवळ 2 वर्षे टोयोटाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. नंतर टोयोटा किर्लोस्कर कंपनीची बेंगळुरूला स्थापना झाली व विक्रम त्या कंपनीचा व्हाईस चेअरमन झाला. सध्या टोयोटाच्या सहा कंपन्या निरनिराळ्या उत्पादनासाठी कार्यरत आहेत. विक्रमने ऑटो कंपन्यांचे असोसिएशन SIAM चे अध्यक्षपद 2013-15 साली भूषविले. तसेच तो कॉन्फेडरेशन ऑफ इंजिनीयरिंग इंडस्ट्रीज (CII) चा 2019-20 साली अध्यक्ष होता.या दोन्ही पदी असताना वाहन व हवामान क्षेत्राचे दूरगामी धोरण ठरवताना भारत सरकारला विक्रमने आपले विचार मांडून मदत केली.
या वर्षी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र मंडळ व विश्वस्त मंडळाने विक्रमला अभिमान पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला होता.हे दोन्ही संस्थांना गौरवास्पद आहे.
असा हा बहुगुणी उद्योजक आपल्यातून निघून जाणे ही एक भारतीय उद्योग जगताची मुख्यत्वेकरून वाहन जगताची मोठी हानी आहे. ती भरून काढणे अतिशय कठीण आहे. विक्रमाच्या आत्म्यास चिरशांती मिळो ही परमेश्वर परब्रह्म चरणी प्रार्थना!
