-अंजली संगवई
आपण सर्वच आपल्या रोजच्याच धकाधकीच्या जीवनात खूप व्यस्त असतो. काही तरी नवीन वेगळं करावे हे सर्वांनाच वाटत, पण प्रत्येक वेळी जमेलच असे नाही. साहित्योन्मेषने आमच्यासाठी ते जमवून आणले. तसे बघितले तर हे एक आव्हानच होते. कुठलीही गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारणे सोप असत पण ते पूर्णत्वाला नेणे तितकच कठीण. तसे हे आव्हान पेलायला आम्हला साहित्योन्मेषने शिकवले, म्हणजे थोडक्यात काय तर दरवेळी असे विषय दिले की तुम्ही फक्त लिहूच नाही तर काही तरी वेगळे नवीन विचार व्यक्त करु शकता, ही खात्री वाटून जायची.
साहित्योन्मेष स्पर्धा जेव्हा जाहीर झाली तेव्हा मला, आपण साजरा करतो त्या चातुर्मासाची आठवण झाली. धार्मिक दृष्ट्या चातुर्मासाचे खूप महत्त्व आहे. याला व्रतवैकल्याचे आणि सणवारांचे महिने असे म्हंटले जाते. मला आठवत पूर्वी आई, आजी दर वर्षी या चातुर्मासात कुठल्या तरी धार्मिक कार्याचा वसा घेत. त्याला चातुर्मासातील नेमधर्म (वसा) असे म्हणत. अजूनही ही परंपरा सुरूच आहे. काय नेम करायचा हे आधीच ठरवतात. त्यात खंड न पाडता तो पूर्ण करतात. या मागे आस्था तर आहेच, तसेच सातत्य टिकवणे हा उद्देश देखील असतोच. त्याच बरोबर कुठलाही घेतलेला वसा पूर्णत्वाला नेऊच हा विश्वास देखील तेवढाच महत्वाचा.
साहित्योन्मेष हा उपक्रम देखील मी त्या चातुर्मासाच्या नेमधर्मा सारखा स्वीकारला. फरक फक्त एवढाच होता चातुर्मास चार महिन्यांसाठी असतो, साहित्योन्मेष बारा महिन्यांसाठी होता, याला मी वार्षिकनेमधर्म(बारामास) असे संबोधले. हा वसा मी आई आणि आजी ज्या आस्थेने करायच्या त्या आस्थेनेच अंगीकारला. थोडी धाकधूक व भीती होती, पण हा वसा घ्यायचा आणि पूर्ण करायचा असे मनाने पक्के ठरवले. बारा महिने बारा लेख, ही संकल्पना वेगळी वाटली आणि एकदम आवडली म्हणून सहभागी व्हायचे ठरवले. या संकल्पनेला एक वसा म्हणूनच पूर्णत्वाला नेऊ असा विश्वास वाटला. कधी कधीचा अपवाद वगळता हा वसा पूर्ण केला या बाराव्या लेखाने.
साहित्योन्मेष मध्ये दिले जाणारे विषय खूप कल्पक आणि मला नेहमी लिहिते करणारे होते. दर महिन्यातील विषय घोषीत झाला की या विषयावर आपण लिहू शकतो, असा मनाचा कौल आणि विश्वास देखील असायचा. सुरवातीला तर या महीन्यात लिहू शकतो पुढील महिन्याचे पुढे बघू असे म्हणत सुरू केलेले लिखाण, दर वेळी पुढचे पुढे असेच म्हणत आज शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले. दर वेळी मिळणारा विषय लिखाणाला चालना आणि विचारांना गती देत गेला.
दर वेळी विषय मिळाला की त्यातील कुठल्या विषयावर लिहू शकतो, काय लिहू शकतो असे विचारचक्र सुरु होत असे आणि बुध्दीला पण चालना मिळत गेली. विषय सगळे असे असायचे की त्यावर विविध दिशांनी विचारांना आकार/चालना दिली जात असे. आपण असेही विचार आपल्या लेखणीत मांडू शकतो, याही बाजूने पण विचार करु शकतो लिहू शकतो ही प्रक्रीया मनाला कुठेतरी सुखावून जायची. लिहितांना आपण त्या विषयात स्वतः गुंततो असे जाणवायचे. विषय उगीचच क्लिष्ट नसायचे. मिळणारे विषय आपल्या दैनंदिन/सामाजिक जीवनाशी निगडीत असायचे त्यामुळे लिहितांना छान वाटले. बरेच वेळा आपण काही करू शकतो हे अश्या उपक्रमामुळे आपल्याला उमगत ही खरोखर जमेची बाजू आहे.
चातुर्मासात घेतलेला वसा पूर्ण झाला की त्याचे उद्यापन हा एक सोहळा असतो. या बारामास पूर्णत्वाचा उद्यापन सोहळा जरा वेगळ असेल. एकीकडे वसा पूर्ण केल्याचे समाधान तर दुसरीकडे आता मनाला हुरहूर लागली की बारामास संपले!
साहित्योन्मेषने मला काय दिले असे विचारले तर मी म्हणेन पहील्या महिन्यातील लेख आणि आता मधे लिखाणात माझ्या मते (लिखाणातील तशी अजूनही प्राथमिक अवस्थेत) बराच बदल झाला जो मला तरी जाणवला. ही माझ्यासाठी एक महत्वाची मिळकत आहे.
थोडक्यात साहित्योन्मेष ने काय दिले तर,
- माझ्या लिखाण शैलीतील सुधारीत झालेले बदल.
- प्रस्तूत विषयावर इतरांचा दृष्टीकोण, विचार आणि लिखाण हे वाचायला मिळाले, त्यामुळे ज्ञानात पडलेली भर.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला हे जाणवले/उमगले की ही स्पर्धा माझी माझ्याशीच आहे इतरांशी नाही.
- एक असा मंच आम्हाला मिळाला की ज्यात आम्ही वैचारिक मंथन, लिखाण आणि सुदृढ खिलाडी वृत्ती अनुभवली/जोपासली.
- लिखाणात सातत्य कायम राखणे या उपक्रमामुळे शक्य झाले.
- सगळ्यात मोठे म्हणजे घेतलेले आव्हान, काही अपवाद वगळता पूर्ण केले आणि आता पुढेही असे आव्हान आले तर ते नक्की स्वीकारू हा विश्र्वास निर्माण झाला.
साहित्योन्मेष एक असा उपक्रम आहे जो खूप काही शिकवून गेला , याअंतर्गत जी शिकवण मिळली ती सदैव स्मरणात राहील.
मला या बारामास नेमधर्मने साहित्य विषयीची आस्था अधिकच दृढ केली. ही खूप मोठी मिळकत आहे.
आता असे साहित्यातील कुठलेही नेमधर्म स्वीकारणे, त्यात सातत्य राखणे हे सहजपणे करता येईल हा विश्र्वास निर्माण झाला आहे. हा विश्र्वास दिला साहित्योन्मेषने!!
हा साहित्योन्मेषचा बारामास उपक्रम साहित्याची छानशी शिदोरी देऊन गेला!!
🙏🏻🙏🏻
