पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा ।।

ही तर झाली मराठी नववधूची पहिली पसंती!!
दक्षिणेत ही जागा घेतली आहे अन्ना परवाईने!! तमिळ मधे परवाई म्हणजे पक्षी ह्याला अन्ना पक्षी असंही म्हणतात पण उच्चार करताना तो असतो अन्नाबक्षी!!
हा श्वेत पक्षी म्हणजेच स्वर्गीय सुंदरता व पवित्रतेचं प्रतिक असलेला हंसराज!! मोत्यांचा चारा खाणारा अन् नीरक्षीरविवेक असलेला हा जरतारी हंस प्रत्येक मुलीला आपल्या लग्नातल्या साडीवर हवा असतो.
फुलांची डहाळी चोचीत धरलेला हंस, संपन्नतेचं प्रतिक आहे. नीरक्षीरविवेक करणारा म्हणजे खोट्या ऐवजी खऱ्याची कास धरणारा हा पक्षीराज मोराशी साधर्म्य दाखवतो, पण हा मोर नाही. कांजीवरम साडीच्या बुट्टीत, काठात, पदरावर अन् कधी कधी संपूर्ण अंगभर वास्तव्याला असतो.
निषध देशाचा राजपुत्र नल आणि विदर्भ देशाची राजकन्या दमयंती ह्यांच्यात प्रेमभाव जागृत करणारा हा हंस!! दोघांनीही एकमेकांना न पहाताच वरले ते ह्या पक्षामुळे.
नल राजाकडे दमयंतीच्या अलौकिक रूपागुणांची स्तुती करून दमयंतीच तुझ्यासाठी योग्य वधू असल्याचा निर्वाळा त्याला देतो. तर दमयंतीला, रूपवान गुणवान चारित्र्यवान असा नल राजाच तुझ्यासाठी सुयोग्य वर असल्याचं सांगतो. वरूण, इंद्र अशा देवादिकांनाही दमयंतीशी लग्न करण्याचा मोह होतो आणि सगळेच नल राजाचे रूप घेऊन दमयंतीच्या स्वयंवरात दाखल होतात. पण हंसाने वर्णिलेला नल राजा कोणता ते दमयंती ओळखते अन् वरमाला त्याच्या गळ्यात टाकते.
तर असा हा अन्ना परवाई… लग्ना सारख्या शुभ कार्यात हवाच. समईवर म्हणजे ‘विलाक्कु’ वर ही त्याला स्थान आहे . हळदी कुंकवाच्या करंड्यावर म्हणजे ‘कुमकुम तईर’ वरही तो विराजमान आहे. आणि पूजेच्या घंटेवर म्हणजे ‘पूजाईमणी’ वरही तो आहे. देऊळ म्हणजे तमिळमधे कॅाईल. त्यांच्या गोपूरमवर, शिखरावर, विमानावर देखील अन्नाबक्षीची हजेरी आहे.
ॐ परमहंसया विद्महे
महा हंसया धीमहि
तन्नो हंसया प्रचोदयात ||
–नेहा भदे

अरे हे लक्षातच आले नव्हते . आता दक्षिणेत फिरताना मोर कुठे आहे आणि हंस कुठे काढला आहे हे सजगपणे बघितले जाईल. उत्तम माहितीसाठी धन्यवाद