संवाद

नमस्कार,

आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. !!!!

मे २०२५ चा इ स न वि वि चा अंक प्रसिद्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. आता स न वि वि नवीन स्वरूपात सादर होत आहे आणि तो आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे.

मंडळी, गणेशोत्सव मराठी मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो, गणेशोत्सवाची तयारी अगदी दोन तीन महिन्यांपासून सुरु झालेली असते, आणि नेमका हाच धागा पकडून, स न वि वि आपल्याकरता वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन येत आहे, त्याबद्दलची माहिती आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळेल. आपण ह्या स्पर्धांमध्ये नक्की भाग घ्याल आणि आपले बक्षिसपात्र लिखाणाचा छापील अंकात समावेश होईल आणि उर्वरित स्पर्धा साहित्य आमच्या वेबसाइटवर वर उपलब्ध असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी पोस्टरखाली दिलेला फॉर्म भरणे आवश्यक आहे. तो आपण नक्की भरा आणि मोठ्या संख्येने भाग घ्या

१० मे ला मंडळात, गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ह्यांच्या गायकीची झलक दाखवणारा “सहेला रे” हा कार्यक्रम सादर होत आहे. राधिका जोशी आणि अभिषेक काळे हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करणार आहेत. आपण ह्या कार्यक्रमाला नक्की याल ही खात्री आहे. ह्याच्या RSVP ची माहिती ह्या अंकात पुढे आहेच.

गेल्या तीन महिन्यांपासून आपण “क्रमशः” हे सदर सुरु केलेलं आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे,ह्या अंकात पण आपण पुढचे भाग वाचणार आहात. ह्या महिन्यापासून  “वाचू आनंदें” मध्ये आपल्याला दर महिन्याला एक नवीन पुस्तकाची ओळख होणार आहे,  हे नक्की फॉलो करा.

लघुकथांमध्ये ओंकार संगोरामांची भट्टी आता चांगलीच जमली आहे, ह्या अंकातली कथासुद्धा आपल्याला  आवडेल अशीच आहे.

ह्या महिन्यापासून आपण शब्दकोडे, “धांडोळा “ प्रसिद्ध करणार आहोत. श्री सतीश बर्वे ते आपल्यासमोर आणत आहेत. आपण ते नक्की सोडवून बघा, ह्या शब्दकोड्याची उत्तरे आपल्याला पुढच्या महिन्याच्या अंकात मिळतील तेव्हा हा धागा चुकवू नका.

आपण मंडळाचे सभासद आहातच, आपल्या सभासदत्वाची मुदत किती आहे ते बघुन त्याचे नूतनीकरण करून घ्यावे ही विनंती, त्यायोगे मंडळात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला त्यात सहभागी होता येईल. नूतनीकरणासाठी फॉर्म आणि लिंक ह्याच वेबपेजच्या वरच्या पट्टीत आहे.

तसेच आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र मंडळाची अतिशय समृद्ध अशी लायब्ररी आहे, आपण त्याचा नक्की लाभ घ्यावा. बेंगळूरू शहराचा आवाका, वाहतूक समस्या वगैरे चा विचार करून आपण वाचन पेटी उपक्रम सुरू केलेला आहे, त्याची माहिती आपल्याला स न वि वि च्या पेजवर मिळेल.

महाराष्ट्र दिनाच्या पुनश्च शुभेच्छा!

कळावे

लोभ आहेच

प्रसाद दाते

इ स न वि वि  संपादक मंडळ  

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *