–रसिका राजीव हिंगे —
जसे मनात विचार
तशी घडतसे कृती
कधी मोजता येई का
इवल्या मनाची गती
जशा आपण मनाला सूचना देऊ तसंच मन असतं किंवा होतं. सकारात्मक विचार करायला लागले की मन ही सकारात्मक कृती करायला लागतं. पण इतकं सोपं नाही अस्थिर आणि चंचल मनाला सूचना देणं. मन! इवलं म्हणता येईल का त्याला?. कधी इवलं तर कधी आकाशा एव्हढं. क्षणात इथे तर क्षणात कल्पनेच्याही पल्याड. क्षणात मीच मनाशी भांडते तर मला कळण्याच्या आधीच ते दुसऱ्याच कुणाचा तरी विचार करायला लागलेले असते. हे लक्षात येतं आहे तोवर पुन्हा तिसरीकडेच उंडारत असतं. इतकं चंचल असतं मन. याला लगाम घालणे किती कठीण आहे हे कळतं पण वळत नाही . मनाची गती मोजण्यासाठी परिमाण तरी आहे का? असेल तर खरच गती मोजता येईल मनाची?असं का?
मना तू आहेस तरी कोण आणि कसा? तासनतास त्याच्याशी वाद घालत बसले, त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत राहिले आणि माझ्या मनाने मला त्याच्या फक्त किनाऱ्यावर बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे मला कमीतकमी मन आहे एवढंच गवसलं.
एखादं काम असल्याशिवाय आपले पंचेंद्रिय सुद्धा कृती करत नाहीत पण मन मात्र , आपण कोणतंही काम करत नसेल तरी विचारांची आवर्तने मनात चालूच असतात. त्या विचारांशी निगडित आपले कार्य नसले तरी. फार कमी असं होतं की आपण जे कार्य करत असतो त्याविषयीच मन पण विचार करत असतं. ज्या वेळी हे विचारांचे दळणवळण थांबेल विचारांची आवर्तने थांबतील त्यावेळी मन सुद्धा स्थिर होईल.आणि हे शक्य करण्यासाठी सुद्धा मनालाच तशा सूचना द्याव्या लागतील म्हणजे सकारात्मक निकाल हाती येईल.
मन आणि बुद्धी याचा जवळचा संबंध आहे. एखादे भावनात्मक काम करत असाल तर मन ही भावविभोर होतं.मनाची भावनात्मक शक्ती जागृत होते. म्हणजे भावनेशी मनाचा संबंध आहे. बुद्धीच्या कसोटीवर केलेला एखादा संकल्प पूर्ण करायचा ठरवले तर मन ही दृढनिश्चयी होतं, मन कणखर होतं आणि आपला संकल्प पूर्ण होतो.म्हणजेच जसं आपण ठरवू तसंच घडत जातं.
लहानपणी आई म्हणायची “अगं, मनाला आवर घाल, असं उंडारू देऊ नये मनाला. आतापासून मनावर ताबा ठेवायला हवा बयो.” पण त्यावेळी कधी लक्ष दिले नाही या सुचनेकडे. जसं माती ओली आहे तोपर्यत तिला हवा तो आकार देता येतो.तसेच अगदी मनाचे असावे, लहान वयातच त्याचे स्थिर होण्याकडे लक्ष लागले की मग ते वाटेल तसे वाऱ्याच्या दिशेने उंडारत नाही. मनाचे एकदा लाड सुरू झाले की ते पुढे पुढे कोणाचे ऐकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. आणि मग सुरू होते रस्सीखेच. काय चांगलं, काय वाईट हे ही कळत नाही. विशेष करून वाईट मार्गावरच नेऊन ठेवतं माणसाला मन. सगळेच वाममार्गाला लागतात असे नाही पण तुलनेने विचार केला तर असेच दिसेल. ज्यांचे मन बालवयातच स्थिर व्हायला सुरुवात होते ते पुढे संतपदाला पोहोचतात, गुरुपदाला पोहचतात.
येती नकोसे विचार
मनी सारखे सारखे
सकारात्मक कृतीस
होतो आपणच पारखे
मनविचारांचा डोह इतका खोल खोल आहे की कितीही प्रयत्न केला तरीही सकारात्मक विचार करणे शक्य होत नाही. नको नको ते विचार मनात येतात, आपल्यास हवे असतील तसे विचार करणे अक्षरशः कठीण होऊन जातं. आधी मनात वाईटच विचार येतात.ठरवून सुद्धा चांगले विचार आपण करू शकत नाही. मग एखादी नैसर्गिक आपत्ती असो किंवा मानव निर्मित आपत्ती असो,अशा वेळी किंवा स्वतःच्या आयुष्याच्या वाटेवर चालतांना दुःखाच्या प्रसंगातही आणि सुखाच्या वेळीही आपण नकारात्मक विचार जास्त करतो असे मला जाणवतं
सकारात्मकतेच्याच
द्याव्या मनास सूचना
भीती दहशत सारे
खेळ तुझेच रे मना
असं काहीवेळेस वाटतं. मनातले विचार, त्यावरील कृती ही परिस्थिती सापेक्ष असावी.
असं म्हणतात मन मोठं असलं की त्यात सगळं सामावलं जातं. ब्रह्मान्ड आहे मनात. म्हणजे सगळीच सृष्टी भरली आहे आहे मनात. सारसार विचार करण्याची बुद्धी ज्यांना असते त्याचंच मन मोठं असावे. एखादी बहिणाबाई सारखी अशिक्षित बाई जेव्हा मनाचे सखोल विवेचन करते म्हणजे त्यांचं मन किती विशाल असेल. तरीही देवाला विचारलेच तू कसा यवगी आहेस, तुला कुठे दिसलं हे मन. अनुभवातून गवसलेलं तत्वज्ञान त्यांनी लिहिले.
समर्थ रामदास स्वामींनी पण मनाला उद्देशून श्लोक लिहिले आहेत. पहा म्हणजे मानवाला सांगून काही होणार नाही असे समर्थनाच कळले आणि त्यांनी थेट मनालाच गवसणी घातली. मनाचे श्लोक जे आज अजरामर आहेत, काहीतरी गवसेल या श्लोकातून असे प्रत्येक मानवाला म्हणजे ज्यांना समर्थ माहीत आहेत त्यांना कळतं आहे आणि त्याचा अर्थ,भावार्थ समजून घेण्याची इच्छा झाली आहे.मनाचे श्लोक लिहिण्याचा मुख्य उद्देश प्रबोधन तर होताच, मनावर ताबा कसा मिळवायचा, हे सांगण्यासाठी मनाचे श्लोक समर्थांनी लिहिले असावेत.अशी अनुभव सिध्द आणि योगसामर्थ्य परंपरा आपल्याला लाभली आहे तरीही आपण मनाला स्थिर करू शकलो नाही.
समर्थ मनाला गवसणी घालतात तर तुकाराम महाराज “मन करा रे प्रसन्न” म्हणत मनाचे सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करतात. मन प्रसन्न असलं की सगळेच व्यवहार सुरळीत होतात, जगण्याचे निदान सापडले असे वाटू लागते. मनाच्या बळावरच मानवी देहाचा डोलारा तोलून धरला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मनोबल जर नसेल तर कितीही शक्ती असू दे साध्य होणार नाही. मनोधैर्य, मनोबल,मनशक्ती वाढविण्यासाठी आजकाल कितीतरी सेमिनार्स, कार्यशाळ मानोपसाचार तज्ञांच्या मदतीने आयोजित केल्या जातात.
मन शांत, स्थिर करायचे असेल तर सद्गुरू चरणा शिवाय पर्याय नाही. कारण सद्गुरूच काय योग्य अयोग्य याचे ज्ञान भक्तास देतात आणि अगदी सोपा उपाय सांगतात तो म्हणजे आपल्या आराध्याचे नामस्मरण. सोपा वाटणारा हा उपाय कठीण आहे मोठमोठ्या संतांना हे साध्य होत नाही. याचा अर्थ असा नाही की मन स्थिर करण्याचे प्रयत्न च करू नये. मन स्थिर करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण हाच आहे.
संकटांशी भिडण्याचे
आहे सामर्थ्य माझ्यात
ऐसे सांगावे मनास
भीती जाईल क्षणात
असे मनाला सारखे बजावत रहावे,सांगत रहावे, सकारात्मक विचारांची मांदियाळी एकदा मनात स्थिरावली की मन शांत शांत होईल………
