सनविवि अनुभव,साहित्योन्मेष अविस्मरणीय विनोदी प्रसंग

अविस्मरणीय विनोदी प्रसंग

–वैशाली चौधरी–

 साधारण ६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या ऑफिसमध्ये वर्षभरात वेगवेगळे उपक्रम चालू होते. खेळीमेळीच्या वातावरणात लोकांना अजून चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी असाच काहीसा हेतू या उपक्रमाचा होता. ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांना ४ गटांमध्ये विभागून साधारण २५०-३०० लोकांचा एकेक गट बनवला होता. गटाला रंगांची नावे दिली होती. लाल, पिवळा, निळा आणि हिरवा. तसा माझा आवडीचा रंग लाल, योगायोगाने मला तोच गट मिळाला आणि सर्वमताने मला गटप्रमुख (कॅप्टन) बनविण्यात आले. आता त्यांनी मलाच का कॅप्टन केले, असे त्यांनी माझ्यात काय पहिले असावे, तो विषय सध्या बाजूलाच ठेवू. वर्षभरात क्रिकेट, हॅकॆथॉन, वेगवेगळे सेमिनार, नृत्य, टेकनॉलॉजि संदर्भात आणि काही सांस्कृतिक अशा बऱ्याच स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अशीच एक स्पर्धा होती “गायन”. कॅप्टन म्हणून मी माझ्या ग्रुपसाठी स्पर्धक शोधत होते. पण मंचावर जाऊन गाणे म्हणण्यासाठी कुणीच तयार होत नव्हते. प्रत्येक स्पर्धेसाठी, लोकांच्या मागे लागून त्यांना भाग घ्यायला लावणे, अत्यंत जिकिरीचे काम होते, जे करायला कुणी तयार नव्हते. आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि यांनी मला कॅप्टन का केले असावे ते. असो. झाली चूक. पुन्हा तो विषय नको. तर अशाच काही लोकांना भाग घेण्यासाठी मी प्रोत्साहित करायचा प्रयत्न करत असताना, एकाने शेरा मारला, 

“तुमचे काय जातेय आम्हाला सांगायला. मंचावर जाऊन असे सर्वांसमोर उभे राहायलाच किती भीती वाटते, गाणे तर फारच दूरची गोष्ट आहे. तुमच्यासारख्यांना ती भीती काय असते हे कधीच नाही कळणार.”

“अरेच्या, माझ्यासारख्यांना? म्हणजे काय? काहीही काय बोलता? मला किती ओळखता हो तुम्ही? ती भीती मला नाही कळणार तर कुणाला कळणार?” रागावलेली मी.

 “म्हणजे? तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही हो कि तुम्हाला पण भीती वाटत असावी ते,” एक कलीग.

“दिसते तसे नसते, म्हणून तर जग फसते,” माझे मन शाळेत, इयत्ता आठवीत गेले. काय सांगू? आजकाल लिहायला असे विषय मिळतात, कि माझे मन सारखे भूतकाळातच रमते. असो.

शाळेत मी खूप हुशार विद्यार्थिनी होते. म्हणजे आताही आहे, निदान माझे मला तरी तसे वाटते. स्वतःला कधी कमी लेखू नये, या मताची मी आहे. परीक्षेत नेहमी मी पहिल्या ३ क्रमांकात असायचे हो. अर्थात आम्ही तिघी मैत्रिणी, या पहिल्या ३ क्रमांकात नेहमी संगीत खुर्ची खेळायचो. “संगीत” हा माझा आवडीचा विषय. तसे सगळेच विषय आवडायचे हो मला. सांगितले ना, खूप हुशार आणि अभ्यासू होते मी तेव्हा. ऑल राऊंडर म्हणतात ना, तसेच काहीसे. “स्वस्तुती पुरे,” असे तुम्ही म्हणण्या आधी मीच म्हणते. काय आहे, लोकांच्या भावना समजून घेण्यात मी पटाईत आहे. अरेच्या!! पुन्हा स्वस्तुती…” बरं, सांगायचा मुद्दा ऐका.. वार्षिक स्नेहसंमेलनात, कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात, मी आवर्जून भाग घ्यायचे. पण “कोरस” मध्ये. एकटी जाऊन स्टेजवर गाण्याची सोडा, काही बोलायची पण हिम्मत नव्हती. स्टेज कशाला, वर्गात, बाईंनी प्रश्न विचारला तर स्वतःहून कधी हात वर करून पटकन उत्तर सांगावे असे माझ्याकडून फार कमी व्हायचे. “इकडे चौधरी, उत्तर सांगा,” असे म्हटल्याशिवाय, ह्या चौधरी काय उठून घडाघडा बोलायच्या नाहीत. तर अशाच एका भावगीत स्पर्धेत, माझ्या संगीताच्या बाईंनी माझे सोलो गाण्यासाठी नाव दिले. सोलो गाणे, म्हणजे, मी एकटीने म्हणायचे, बरोबर कोरस नाही. TV सिरीयल मध्ये “काय? काय?? काय???” अशी प्रतिक्रिया देतात तशीच माझी अवस्था झाली. 

“माझे नाव तुम्ही का दिले? तेही मला न विचारता? का?? मला नाही म्हणायचे एकटीला गाणे, कृपया ते काढून टाका,” असे स्पष्ट बोलायची हिम्मत पण त्यावेळेस माझ्याकडे नव्हती. 

तरीही, “मॅडम, नको ना, प्लीज,” अशी मी त्यांना विनंती केली. 

“का ग?,” मॅडम.

“मला भीती वाटते,” मी.

“चल!! काहीही काय? आपलीच तर शाळा आहे. कोरस मध्ये म्हणतेस ना, तसेच म्हणायचे.”

आता समूहात म्हणणे आणि एकटे म्हणणे यात किती जमीन आसमान चा फरक आहे हे त्यांना नक्कीच माहित होते. गाताना सूर ताल इकडे तिकडे झाला तर समूहात बाकी लोक असल्यामुळे ते श्रोत्यांना इतके लक्षात येत नाही हो. पण मॅडम ठाम होत्या. त्यांनी माझे नाव काढून टाकण्यास ठाम नकार दिला. ४ दिवसांनीच स्पर्धा होती. रोज एकदातरी “कृपया माझे नाव काढून टाका,” अशी कळकळीची विनंती मी त्यांना करायचे. सुरवातीला त्या “नाही” असे म्हणायच्या. पण नंतर त्यांनी माझ्याकडे लक्ष देणेच सोडून दिले. भीतीने गेले काही दिवस नीट झोपसुद्धा मिळाली नव्हती. स्पर्धेचा दिवस उजाडला. मी नेहमीप्रमाणे मॅडमकडे गेले, “मॅडम, बहुतेक आज माझा घसा ठीक नाहीये,” कधीही खोटे न बोलणारी मी (अर्थात हे सुद्धा मलाच स्वतःबद्दल वाटते.)

“काहीतरी नाटके करू नको. चुपचाप स्टेजवर जा आणि गाणे म्हणून ये,” त्या रागावल्या.

“छे! माझा शेवटचा प्रयत्न सुद्धा व्यर्थ ठरला,” नाराज होऊन मी जागेवर जाऊन बसले.

सूत्रसंचालन हाती घेतलेल्या मॅडम, प्रत्येक स्पर्धकाचे नाव घेऊन, स्टेजवर बोलावत होत्या. एकेक करत माझ्या सुरेख गाणाऱ्या मैत्रिणींचीसुद्धा गाणी म्हणून झाली. तेव्हाच माझे नाव पुकारले, “वैशाली चौधरी”. छातीत धडकी भरली. हातापायाला घाम सुटला. हृदयाचे ठोके इतके जोरात वाजत होते कि हृदय उडी मारून बाहेर येते कि काय असे वाटू लागले. कशीबशी उठून मी स्टेजकडे गेले. चालताना पाय लटपटत होते. माईक समोर उभे राहून मी कापऱ्या आवाजात गाणे म्हणायला सुरुवात केली,

 “मन मनास उमगत नाही….

  आधार कसा शोधावा…

  स्वप्नातील पदर धुक्याचा.. 

 हातास कसा लागावा….

 आधार कसा शोधावा…” 

मॅडमनी मला इतके दुखी आणि शांत गाणे का दिले?? बाकीच्या मैत्रिणींची गाणी कशी ठेका देण्यासारखी, आनंदी होती. मग माझे गाणे दुखी का?? जणू काही त्याच दुःखात मी गात होते..खरेच त्या प्रेक्षकांच्या गर्दीत मी माझा आधार शोधत होते. समोर सगळे बसले होते, पण मला आधार देणारे असे कुणीच दिसत नव्हते. टाळ्यांचा गडगडाट झाला तेव्हा कुठे लक्षात आले, “हुश्श्श, संपले एकदाचे ते गाणे,” मला किती आनंद झाला, काय सांगू. धावत जाऊन मी माझ्या मैत्रिणीला मिठी मारली.

कार्यक्रम झाल्यावर मॅडम माझ्याजवळ आल्या, ” काय??  म्हटलंस कि नाहीस शेवटी?? किती ते घाबरतेस? काहीतरी झाले का तुला? आहेस ना नीट? जरा धाडसी हो ग, काही नाही होत. आपलीच तर माणसे आहेत,” माझ्याकडून गाणे म्हणून घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता.

“खरेच, मी धडधडीत होते. मग का आणि कुणाला बरं इतकी घाबरले होते मी?? लोक मला हसतील, नावे ठेवतील, याला? अहो, हसतील त्यांचे दात दिसतील. ज्यांना बोलायचे आहे ते तुम्ही काहीही केले किंवा नाही केले तरी बोलणारच. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा.”

माझी हि कथा ऐकून ३-४ जण तरी प्रेरित झाले आणि त्यांनी गायन स्पर्धेला नाव दिले आणि त्यावर्षी आमचा लाल गट प्रथम क्रमांकाने जिंकला सुद्धा.

काय मग, तुम्ही झालात कि नाही प्रेरित? उठा तर मग, तुम्हीही स्वतःवर विश्वास ठेवा, आणि तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव द्या.

तळटीप: तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय किंवा विनोदी प्रसंग यावर लेख लिहायचा होता. मागे मी एक विनोदी कथा लिहायचा प्रयत्न केला. पण काय सांगू तुम्हाला?? आमच्या मातोश्रींना तो लेख वाचून चक्क रडू आले. आईचे काळीज हो ते. त्यामुळे मी हा प्रसंग, अविस्मरणीय आहे कि विनोदी आहे हे वाचकावर सोपवून निरोप घेते. धन्यवाद..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *