कविता

–रेवती कुलकर्णी–

अष्टाक्षरी ( माघी गणपती उत्सवासाठी षोडशोपचार )

गणाधीशा, सर्वात्मना,

रमे मन तुझ्या ध्याना

यावे माझिया सदना

स्विकारावे ह्या आसना…

अवनीशा हे विकटा,

व्हावे इथे स्थानापन्न

अर्घ्य पाद्याने पुजिते

करा गंगाजल स्नान…

शशीवर्णा, वरप्रदा,

पितांबर हा रेशमी

उपरणे भरजरी

नेसवेन तुजला मी…

विघ्ननाशा, गौरीसुता

गंध, शेंदूर अर्चिते

दुर्वा नि जपाकुसुमे 

तुज देवा मी अर्पिते…

शिवसुता, गणाधिपा

निरांजन ओवाळते

पेटवून धूपदीपा

कर्पुरार्ती मी करते…

एकदंता, भालचंद्रा

पंचामृत, पंचखाद्य,

अन् प्रिय मोदकांचा 

तुला अर्पेन नैवेद्य….

विघ्नहर्त्या, विनायका 

व्हावे प्रसन्न अनीशा

स्वीकारून पुजा माझी

पावा मजसी गणेशा…

लंबोदरा, गजानना

कृपा असावी अविघ्ना

नमस्कार माझा घ्यावा

देई रे आशीर्वचना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *