गुलाबी थंडी.
हवीहवीशी वाटणारी अशी ही गुलाबी थंडी,
गार,गार हवेत,सर्वांगात भरलीय हुडहुडी !
झोपावे वाटे पांघरून मायेची मऊ गोधडी,
उबदार स्वेटर अन् काश्मीरची शालजोडी!
गरम पेयपान करत पहुडावे शेकोटीपाशी,
गरम खिचडी,कढीचा बेत असावा खाशी,
वांग्याची मसालेदार भाजी,भाकरी तुपाशी,
रंगे फड गप्पांचा जमतां मित्रमंडळी खाशी!
जमवावा बेत झकास मळ्यात हुरड्याचा,
भाजलेल्या कणसांसवे खावा ठेचा मिरचीचा,
दाणे, गुळ, ओला हरबरा,मेवा हा रानाचा,
झऱ्याचे पाणी अन् हवा रस गोड ऊसाचा!!
पांघरतो हा निसर्ग मऊ दुलई गुलाबी थंडीची,
उमलेनात कळ्याही भरतां शिरशिरी थंडीची,
दवबिंदूंच्या स्पर्शाने थरथरती गवताची पाती,
दाट शुभ्र धुक्याने वेढलीय सारी ही धरती!!!
रेवती कुलकर्णी , बंगळुरू .
थंडी,थंडी काकडती थंडी
म्यॅाव म्यॅाव किती ही थंडी..
आसराही नसे मज ठाव
आता शोधू कुठे उब म्यॅाव..
होती पेटवली ताईने चूल,
म्यॅाव,धग अजून त्यात असेल..
वा,चुलीची उब अंगाला लागतेय
म्यॅाव म्यॅाव, आता कसे बरे वाटतेय…
उंदरमामावरही नजर राहिल इथून
म्यॅाव,न्याहरीचीही सोय जाईल होऊन..
म्हणतेय रोज बसावे येथेच येऊन
म्यॅाव म्यॅाव, थंडी मग जाईल पळून..
रेवती कुलकर्णी , बंगळुरू.
