सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय वृतांत – अभिव्यक्ती २३ जानेवारी २०२२

वृतांत – अभिव्यक्ती २३ जानेवारी २०२२

–वैशाली तोरवी–

आपल्याला व्यक्त व्हावं असं कधी वाटतं?

आपल्याला व्यक्त कुठल्या माध्यमातून व्हावं असं वाटतं?

कोणी व्यक्त व्हावं?कसं व्यक्त व्हावं?

कधी आणि का व्यक्त व्हावं ?याविषयी

साहित्यिक वर्तुळात गाजत असलेल्या ‘चार सख्य चोवीस’ या लघुकथासंग्रहाच्या  सहलेखिका , ‘माझी माय सरोसती’  या नाट्याच्या  दिग्दर्शिका, *कृष्णप्रिया*  या नावाने       काव्य व अध्यात्मिक लेखन करणार्‍या *हर्षदा बोरकर* यांनी संवाद साधला.

अभिव्यक्ती हे नावच मला खूप आवडले. मी काही दिवस आजारी होते, त्यामुळे हे सुसंवादाचे आमंत्रण हा 

माझ्यासाठी बुस्टर डोस आहे, असे प्रांजळपणे नमुद करुन संवादाची सुरुवात झाली. 

त्यांच्या स्वानुभावातून उलगडलेली अभिव्यक्तीची संकल्पना उदाहरणा सहित सांगत संवाद पुढे नेताना त्या म्हणतात, अनुभवच माणसाला परिपक्व करतो. प्रत्येकात रंग, रेषा, ताल, सुर,शब्द यापैकी काहीना काही निसर्गत:च असते. सर्वच ललितकला शुद्ध पातळीवरच्या आहेत. त्याला साधना जोडली की त्यांची शुद्धता वाढते. लहान बाळ रडते, ही त्याची अभिव्यक्ती आहे. शाळेपासूनच आपण निबंध, रसग्रहण असे शिकतो, ते म्हणजे मनाला भावलेले वा उमटलेल्या प्रतिमेचे वर्णन असते. 

त्यांच्या लिखाणाची सुरुवात झाली तेव्हा, नुसत्याच शुभेच्छांपेक्षा दोन व्यक्तींमधील नातं समजून घेऊन त्यांवर हर्षदाताई काव्य करु लागल्या, काहीतरी अधिक लिहू शकतो ही जाणीव झाली. तसेच शब्दांसोबत हावभाव, हातवारे व ताल ही आपली अभिव्यक्तीची साधने आहेत, ह्या जाणीवेनंतर त्यांची नाटक, निवेदन, नृत्य, कथा अशा विविध क्षेत्रातील घोडदौड ऐकून स्तिमित झालो.

‘चार सख्य चोवीस’ ह्या नवीन प्रयोगाविषयी त्या भरभरुन बोलल्या. तसेच चित्रावरून कथा यावर आधारित त्यांचे दुसरे पुस्तक येत असून ‘अपुर्णत्व’ ह्या त्यांच्या अतिशय तरल चित्रकथेचे वाचन करुन, चित्रातील बारकाव्यांचा व बोलकेपणाचा कथा लिहिताना कसा वापर करावा याविषयी विशद केले. दुसऱ्याच्या अविष्काराचा आपल्यावर प्रभाव न होऊ देता स्वतःची शैली जपायला हवी. आपण स्वतः आस्वादक असणे जास्त गरजेचे असते, तरच समोरच्याची अभिव्यक्ती भावते. केवळ दुसऱ्याचा हात हातात घेणे या एकाच क्रियेतील अभिव्यक्ती प्रसंगानुरुप कशी वेगळी असू शकते हे सांगितले, पंचेद्रिये उघडी ठेऊन आपण हे सर्व अनुभवायला हवे.

मतीमंद मुलांसाठी काम करतानाचे त्यांचे अनुभव सांगितले. त्यांच्या मते या मुलांना व्यक्त होण्यासाठी नाटक, नाच हे खूप आवश्यक आहे. या मुलांना चित्र काढायला सांगितले तर त्यांच्या मनांत जो भाव असेल तसेच रंग ते निवडतात. 

वंचितांच्या रंगमंचाविषयी बोलताना समाजातील विषमतेवर प्रकाश टाकला. त्यांनी लिहिलेले अ ल क – ‘थंड’ वाचून दाखवले.  अभिव्यक्ती सदस्यांसाठी ‘काठ’ हा विषय देऊन तुम्हाला आवडेल त्या माध्यमात व्यक्त व्हा व मला ते सगळे वाचायला नक्की आवडेल असे सांगून, कोणत्याही विषयावर व्यक्त व्हायचे असते, तेव्हा सुरवातीला आपले मन आपल्याला अनेक अनुभवांपर्यंत पोहोचवते. मनातली ही खळबळ शांत झाली की नक्कीच सुचू शकते. फक्त स्वतःला तेवढा वेळ देण्याची तयारी हवी.

अतिशय सोप्या भाषेत व लहान सहान उदाहरणांतून सहजतेने हर्षदाताई व्यक्त होत होत्या. सर्व जण मंत्रमुग्ध झाले होते. शेवटी त्यांनी सांगितले की समाजाला आपल्या अभिव्यक्तीचा कसा उपयोग करता येईल, ते पहायला हवे. इतरांना संधी द्या. त्यांची प्रेरणा बना. माध्यम बना. परिघाबाहेर बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *