–शिल्पा धर्माधिकारी–
संध्याकाळी सारा आसमंत घरट्याकडे लगबगीने परत जाण्यार्या पक्षांने आणि त्यांच्या किलबिलाटाने भरला होता. ऑफिस मधून परत आल्यावर बाल्कनीत उभे राहून पक्षांच्या परतीचा प्रवास पाहण्याचा मधुराचा जवळपास रोजचाच छंद. तशीच आजही ती ऑफिस मधून परत आल्यावर नेहमीच्या सवयीनुसार चहाचा कप घेऊन बेडरूमच्या बाल्कनीत उभी होती. परंतु आज ती समोरच्या आंब्याच्या झाडावर असलेल्या पक्षांच्या घरट्याला न्याहाळत होती. पिल्ले दिवसभर घराबाहेर असलेल्या आपल्या आईशी किलबिलाट करून संवाद साधत होती आणि आई पंखांने त्यांना प्रेमाने थोपटत होती. हा सारा खेळ मधुरा अनिमिष नेत्रांनी बघत होती.
खरंतर तिने ह्या झाडावर चिमण्यांची कितीतरी घरटी बांधलेली आणि मोडलेली पहिली होती. पण आज घरट्यात चिमणा चिमणीच्या कुटुंबाला पिल्लांनी आकार दिला होता. त्या घराची वीण अजून घट्ट झाली होती. हे पाहून तिच्या जखमेवर धरू पाहिलेली खपली पुन्हा निघाली.
“आपल्याही संसाराच्या अशाच अपेक्षा होत्या की! तो, मी आणि आपलं छोटंस घरट…. उबदार विणीच. ज्यात कधी प्रेमाचा वर्षाव, कधी लटके राग, पण तरीही शांतता आणि समाधान असलेलं. कधी विचाराच केला नव्हता मोठ्या वादळाचा… त्या वादळामध्ये घर वाहून जायचा….”
“सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असं होतं का तरी कधी? …. आणि हो कुठे घडतही असेल ….पण माझ्या आयुष्यात? अपेक्षाच केली नव्हती मी. जीवा पेक्षा जास्त सांभाळत होते मी माझ्या घराला, संसाराला. स्वप्नातल्या त्या घरासाठी आसुसलेली मी , लग्नानंतर किती जपत होते, सजवत होते, आकार देत होते. माझ्या वागण्याने , बोलण्याने माणस जोडून ठेवत होते. संसार फुलवत होते. कधी कष्टाची तमाही केली नाही.”
मधुराच्या विचारांचा ओघ हळूहळू भूतकाळात जायला लागला.
लहान वयातच वडील वारले. आजूबाजूच्या घरात आई, वडील, भावंड असा परिवार दिसत होता, तर तिच्या घरी मात्र कष्ट करणारी एकटीच आई, तिला आणि भावाला सांभाळणारी.
माहित नाही का पण तिच्या आईच्या मदतीला खंबीर असं नात्यातलं कोणीच नव्हतं. त्यामुळे तिला आजूबाजूची आई वडील भावंडानी भरलेली घरं, चौकोनी कुटुंबं ही कायमच आवडायची, स्वप्नातली, हवीहवीशी वाटायची. वडीलांच्या प्रेमाचा हात डोक्यावरून एकदातरी फिरवा, आपल्यासोबत एक खंबीर आधार असावा ही इच्छा. पण ते ह्या जन्मात तरी शक्य नव्हतं. घरात आधार काय होता तो फक्त आईचाच.
मधुरा जशी मोठी होत गेली तसा आईला होणारा त्रास तिला समजू लागला. असा एक खांबी संसार बाईला जितका त्रासदायक तितकाच तिच्या मुलांनाही. बाई घाव, जखमा समजुतीने कदाचित सहन करेलही , पण मुलं एक चाकी संसाराच्या खुणा उरी बाळगत कायमच प्रेमाला आसुसलेली…त्या चौकोनी घराच्या उबेसाठी हपापलेली…
लहान वयात हरवलेले वडीलांचे छत्र, आईच संसाराची स्वप्न अर्धवट राहणं, ह्यातून कुठेना कुठे तरी तिच्यामध्ये प्रेमाचा आसुसलेपणा निर्माण झाला होता. आपल्या पाठीशी कुणीतरी ठामपणे उभा राहणारा एक जोडीदार हवा, जो आयुष्यभर सुखदुःखात आपल्याला साथ देईल अशी तिच्या मनात इच्छा निर्माण झाली होती.
“आपल्याला कधी मिळेल का असं घर? ज्यात मला, माझं असं हक्काचं माणूस असेल, जे सतत माझ्यासोबत माझ्या आधाराला असेल, आणि आमचा तो फुललेला संसार.”… संसाराच्या स्वप्नांच्या दुनियेत मधुरा तासन्तास रमायची. आई वडीलांचे आनंदाने घालवलेले क्षण तिला पुसटसे आठवायचे. तशा आनंदाची गोडी आपल्यालाही लाभावी अशा विचारात ती स्वप्नांच्या झुल्यावर झुलायची.
असंच एक दिवस, देखणं रूप असलेल्या मधुराला तिच्याच ऑफिस मधल्या सहकार्याने मागणी घातली. तिला स्वर्ग दोन बोटं उरला. स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्नं पाहणारी मधुरा आनंदाने बोहल्यावर चढली.स्वप्नांची पूर्तता झाली. दोघांचा सुखी संसार सुरू झाला.
लग्न म्हणजे व्यवहारही असतो हा विचार कधी तिच्या मनाला शिवलाच नाही. ऑफिसमधील सहकार्याचा आता जोडीदार झाला होता. त्यामुळे कळत नकळत, कुठेतरी त्याचात possessiveness आला, अधिकार वाटायला लागला. तिची होणारी नोकरीतील प्रगती त्याच्या नजरेत खुपायला लागली. हा कुठेतरी तिच्या पुढे कमजोर आहे हे जाणवायला लागले आणि मग पुरुषी अहंकार जागा झाला. छोट्या छोट्या खटक्यांचं रूपांतर घटस्फोटात झालं.
आयुष्य पुन्हा एकदा सापशिडीच्या खेळासारखं पूर्वीच्याच घरावर येऊन थांबलं. नियतीनं असे फासे टाकले होते की, पुढे गेलेलं आयुष्य पुन्हा जुन्या वळणावर येऊन थांबलं होत, एक मोठं प्रश्नचिन्ह घेऊन …आता पुढे काय?
पण परवाच्या परागच्या म्हणजे तिच्या भावाच्या बोलण्याने प्रश्न अजून मोठा झाला होता.
“मधुरा, मला वाटत तू आता दुसर लग्न करावं आणि स्वतः चा संसार थाटावा किंवा स्वतंत्र रहावं आणि मला तुझ्या जबाबदारीतून मुक्त कराव. मला माझा संसार आहे, बायको-मुलं आहेत, माझी नोकरी, माझं करियर आहे आणि माझी आयुष्याविषयीची काही स्वप्नं आहेत.”
“हे सगळे सांभाळताना मी तुझी जबाबदारी घेऊ शकेन असं मला वाटत नाही. तेव्हा तू स्वतःची जबाबदारी स्वतः उचलावीस अस मला वाटत. तुझा काय निर्णय आहे तो मला लवकरात लवकर कळवं. “
परागच्या ह्या बोलण्याने ती सुन्न झाली होती.
मधुरा: “एक आघात अजून पचला नव्हता आणि आता हा दुसरा.
माझ्याच लोकांनी मला दाखवलेला परिस्थितीचा आरसा.”
डोळ्यात साचलेल्या पाण्यामुळे मधुराला आता समोरचं पक्षाचं घरटं धूसर दिसत होतं . हुंदका गळ्यात दाटून आला होता. एवढ्यात तिला तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्याचे जाणवले.
तिने मागे वळून पाहले तर दिलासा युक्त नजरेने तिची आई तिच्याकडे पहात होती. मधुराच्या खांद्यावरील प्रेमाची ऊब देणारा, थरथरणारा, रखरखीत तरीही भक्कम असा तिच्या आईचा हात “मी तुझ्या सोबत आहे” याची ग्वाही देत होता.
थरथरत्या आवाजात ती म्हणाली, ” बेटा, मी ही थोड्याबहुत प्रमाणात अशाच परिस्थितीतून गेले आहे. कधी कधी हीच आपली वाटणारी माणसं आपल्याकडे पाठ फिरवतात. आपली आपली म्हणवणारी आपल्या कठीण परिस्थितीत आपला हात सोडून सरळ दूर निघून जातात.
पण बेटा तुझ्यात आणि माझ्यात एक फरक आहे. तेव्हा तुम्ही दोघे चिमुरडे माझ्यासोबत होतात पण तू एकटी आहेस. आयुष्य हे प्रवाही राहील पाहिजे. “जो थांबला तो संपला” हे वाक्य कायम लक्षात ठेव. प्रत्येकाला स्वतःचं युद्ध स्वतःलाच लढव लागतं. तेव्हा निराश होऊ नकोस. “हतबल” तर अजिबात नाही. परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेव. तू तरुण आहेस.अजून तुझ्या पुढे खूप आयुष्य पडल आहे. ते छान घडव आणि आनंदाने जग. आणि हो! एक गोष्ट कायम लक्षात ठेव, “काही झाले तरी स्वतःचा स्वाभिमान जप”.
बेटा तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी तुझ्या सोबत आहे.
चल, मी सांगते परागला, आम्हाला तुझी गरजच नाही. आम्ही दोघी स्वतंत्र आहोत आम्हाला सांभाळायला आणि आमचे आयुष्य घडवायला.”
आईच्या ह्या थकलेल्या देहातल्या स्वाभिमानी रूपाकडे बघून मधुरा थक्क झाली आणि आईसोबत परागला आपला निर्णय सांगायला निघाली.