—सौ.विद्या चिडले.
कढीपत्ता, कढीलिंब, गोडलिंब, curry leaves अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या वनस्पतीशिवाय आपली परसबाग अधुरीच राहील! नाही का? आम्हा भारतीयांचा आहार व कढीपत्ता हे समीकरण अगदी वेगळेच आहे. बहुतेक भाज्या, कोशिंबीरी, चटण्या, कढीपत्ता घालून फोडणी घातल्यावरच पूर्णत्वास येतात.
खरं तर किंचित कडवटसर चव असलेली कढीपत्त्याची पाने तेलाच्या किंवा तुपाच्या फोडणीत गेली न की ऽऽऽ जीभ व घ्राणेंद्रिय आस्वाद घेण्यास अधीर होतात. दक्षिण भारतातील सांबार असो की रस्सम, ओल्या कडधान्याची कोशिंबीर असो वा ओल्या नारळाची चटणी किंवा दोश्यातली बटाट्याची भाजी वा बिसिबेले भात ह्याचं रंग रूप चव एकदम बदलून टाकणारा हा कढीपत्ता आम्हा मराठी लोकांनाही तितकाच प्रिय आहे. कढी, भजे, वडे, डाळभाजी, मसाले भात, गोड-आंबट किंवा फोडणीच्या वरणाचा कुठलाही प्रकार असो, वा उसळी चटण्या किंवा पोहे उपमा वा आपला आवडता पोह्यांचा चिवडा असो, हे पदार्थ मोहरी जिरे हिंग हिरवी मिरची व कढीपत्ता तेलात घालून फोडणी दिल्याशिवाय पूर्णत्वास जात नाहीत. कढीपत्त्याची हिरवी पाने वाळवून किंवा तळून, पुड करुन त्यात थोडे आंबटगोड,व तिळ किंवा जवस वा शेंगदाण्याचे कूट घालून केलेली कोरडी चटणी किंवा कढीपत्ता, हिरवी मिरची कोथिंबीर सुकं खोबरं व शेंगदाण्याचं कूट व लिंबू घालून केलेली ओली चटणी म्हणजे आम्हा खादाड संस्कृती जपणाऱ्या लोकांना पर्वणीच.
एक मात्र आहे की हा कढीपत्ता जितका आपुलकीने व निकडिने फोडणीत वापरला जातो तितक्याच जलद गतीने जेवताना आधी पानाबाहेर टाकला जातो आणि हा अनुभव सर्वांचाच आहे. सुगंध सौंदर्य व चव ह्यात अफलातून बदल घडवून आणणाऱ्या ह्या गोडलिंबाची अशी परवड नक्कीच व्हायला नको.
हा कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे बरं का. खरं तर ह्या गोष्टीची जाणीव मलाही आताच, ह्या विषयावरील माहिती काढताना झाली. आज मी जे मुद्दे मांडणार आहे ते वाचून आपणा सर्वांना नक्कीच वाटेल की ह्यापुढे कढीपत्ता खायचा, पानाबाहेर काढायचा नाही.
कढीलिंबाचे गुणधर्म…..
१] कॅल्शियम, फाॅस्फोरस, लोह, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, असे पोषक तत्व प्रचूर मात्रेत गोडलिंबात आहेत.
२] ह्यातील anti-oxidants शरीरासाठी उपयोगी आहेत.
३] कढीपत्त्यात anti-bacterial, Anti-inflammatory गुणधर्म आहेत.
४] ह्यातील पोषक तत्वे यकृत व पचन संस्थेला निरोगी ठेवते.
५] कढीलिंबामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
६] उलट्या, मळमळ, व सकाळी उठल्यावर वाटणारी अस्वस्थता ह्यापासून सुटका होते.
७] पाच सहा पानांचा रस, साखर व लिंबाचा रस रिकाम्या पोटी घेतल्यास यकृत चांगले राहते. तसेच यकृतात तयार होणारे विष बाहेर काढण्यास मदत होते.
८] कढीलिंबाच्या सेवनाने सिराॅयसीसचा धोका कमी होतो.
९] दही किंवा ताकात घालून सेवन केल्यास पित्त (acidity), बद्धकोष्ठता याचा त्रास कमी होतो.
१०] कढीलिंबाची पाच-सहा पाने धुवून व चावून चावून रिकाम्या पोटी खाल्ली तर पोटदुखी जाते.
११] कढीपत्ता, कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतो. तसेच वाईट कोलेस्टेरॉल शरीराबाहेर फेकतो.
१२] कढीपत्त्याच्या सेवनाने दृष्टीचे तेज वाढते व डोळे निरोगी राहतात.
१३] गोडलिंबाचे नियमित सेवन केल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते. केस पांढरे होणे, कोरडे होणे, केसात कोंडा होणे ह्या विकारांवर उपयुक्त ठरते व केसांचे पोषण होते. त्यातील अ आणि क जीवनसत्वामुळे केस काळे, लांब व दाट होतात.
१४] ह्या पानांचे सेवन केल्याने अशक्तपणा जातो.
१५] सर्दी खोकला झाला असेल, sinusitis चा त्रास असेल, छातीत कफ झाला असेल तर कढीलिंबाची पावडर, मध घालून खाणे उपयुक्त ठरते. हे मिश्रण छातीतील कफ बाहेर काढण्यास मदत करते.
१६] जुलाब होत असतील तर पानांचे सेवन करतात.
१७] आयुर्वेदानुसार, थोडा कढीलिंब ताकात घालून त्याचे सेवन केल्याने वात-पित्त-कफ, ह्या त्रिदोषांचे संतुलन राहते .
१८] रक्ताची कमतरता कमी होऊन अशक्तपणा दूर होतो.
१९] गोडलिंबाची पाने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतात.
२०] आयुर्वेदानुसार कढीपत्ता अन्नपदार्थास मऊ बनवितो.
२१] कढीपत्ता, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकतो.
२२] कढीपत्ता त्वचेची निगा राखण्यास मदत करतो. ह्याने त्वचेचे आजार जातात. बुरशीजन्य संसर्ग बरे होतात. शरीरावरची सूज कमी होते. दही कढीलिंब व गुलाबजलचा पॅक चेहर्यावर लावल्यास चेहरा उजळतो. तसेच कढीलिंबाची पाने वाटून त्यात पाच सहा थेंब नारळाचं तेल घालून ,ती पेस्ट त्वचेवर लावतात. त्याने त्वचा चांगली होते.
२३] कढीलिंब शरीरातील फ्री रॅडिकल्सचे उत्पादन कमी करतो.
२४] गोडलिंबाच्या नियमित सेवनाने कर्करोग टाळू शकतो. असेही वाचनात आले आहे की, कढीलिंब केमो व रेडिएशनच्या दुष्परिणामांना कमी करतो.
पूर्णतः भारतीय असलेले हे झाड तसे दक्षिण आशियात बहुतेक सर्वत्र उपलब्ध आहे. कढीपत्त्याची कलम लावतात किंवा बी पेरतात. ऊन्हात, गरम वातावरणातही हे झाड चांगले वाढते. पाणी साधारण असले तरी चालते. वसंत ऋतूत लागवड करतात. कढीलिंबाची फुले पांढरी व फळे काळसर असून खाण्यास योग्य नसतात. फळे विषारी असतात. सहा ते वीस फूट ऊंच वाढते हे झाड. कढीलिंबाच्या साधारणतः तीन जाती आहेत.
एक – रेग्युलर,
दुसरे – ड्वार्फ,व
तिसरे – गामठी (कदाचित गावठी म्हणत असतील)जे फक्त एक फुट वाढते. गामठी जात कुंडीतही चांगली बुशसारखी वाढते. कढीलिंबाच्या ह्या जातीच्या पानांना सुगंध जास्त असतो. ह्या पानांना pungent spicy aroma असतो.
कढीलिंब लावताना कुंडीत माती, थोडी रेती व वाळलेले शेणखत घालतात. कुंडीतील पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी लागते. त्यात कढीलिंबाची कलम लावल्यावर किंवा बी पेरल्यानंतर थोडे पाणी घालावे लागते. ते रोप रुजायला थोडा अवधी लागतो. रोज थोडं थोडं पाणी घालतात. खूप पाणी घातल्यास किंवा पाणी साचून राहिले तर कलम टिकत नाही किंवा रोप उगवत नाही.
ह्या वनस्पतीवर काही रोग, जसे–mites, scale, plant lice– येतात. कधी पाने पांढरट होतात. त्यामुळे ह्या झाडाकडे लक्ष द्यावे लागते. Insecticides वापरून हे रोग आटोक्यात आणता येतात. तसेच एकदा रोप चांगले वाढायला लागले की पानांचे कटिंग करणे जास्त सोयीस्कर ठरते. म्हणजे नवीन पालवी फुटण्यास वाव मिळतो.
कढीलिंबाची पाने घालून उकळलेले पाणी, मध व लिंबू,हे मिश्रण उपाशी पोटी घेतल्यास त्याचे आरोग्यदायी फायदे होतात असे आयुर्वेदाचार्य श्री. ए. के. मिश्रा म्हणतात. कढीलिंबाचे असे अनेक औषधीगुण असले तरी त्याच्या अति सेवनाचे काही दुष्परिणामही दिसून येतात.
काही लोकांना कढीपत्त्याच्या सेवनाने जळजळ होणे, ब्लड शुगर वाढणे, कधी ॲलर्जी होणे अशा प्रकारचा त्रास होतो. त्यामुळे कुणाला असा त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने कढीलिंबाचे सेवन सांभाळून करावे.