—डॉ.सौ.अनुराधा भागवत—
लेखक स्वतःला व्यक्त करू पाहतो तेव्हा लेखनाला सुरुवात होते.विचार सांगायची इच्छा प्रबळ होते व विचार शब्दरूपाने कागदावर उमटू लागतात. हीच साहित्य निर्मिती,आजकालच्या जागतिकीकरण, उदारीकरण, पाश्चात्यीकरण अशा वातावरणांतही आपले सांस्कृतिक सत्त्व लेखक जपतो.त्याच्या स्वत्वाबरोबर अगदी अंतःकरणाच्या गाभ्यात ते जपले जाते.सांस्कृतिक सत्त्वाची,महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची स्वतःची भाषा, स्वभाषेचा,अभिमान. भाषा हे साहित्यकृतीचं माध्यम आहे, लेखक स्वभाषेतच उत्तमपणे व्यक्त होतो. पण ‘स्व ‘भाषा आली कीं ‘पर’भाषा आलीच. ज्या क्षेत्रांत साहित्यिक रहात असेल त्याची ओळख त्याच्या लेखनात उतरतेच हीच भाषेची’देशी’यता व देशीयता आली कीं ‘पर’देशीयता आलीच.
परभाषा, परदेशीयता हे शब्द आले कीं त्यांतील शब्दांचा विचार आलाच शब्द ही भाषेची खरी संपत्ती आहे. मराठी भाषेची परंपरा अडीच हजार वर्षांची आहे. मराठी भाषा सुरु झाली तेव्हां किती शब्द असतील? नदी उगमापाशी लहानच असते, पुढे नदीचे पात्र विशाल होऊ लागते ते असंख्य लहान-मोठे झरे, प्रवाह येऊन मिसळतात म्हणून. भाषेच्या या प्रदीर्घ प्रवासांत आसपासचे इतर अनेक प्रवाह येऊन मिसळले असतील म्हणूनच आज आपल्याला अशी सम्रुध्द भाषा मिळाली आहे.मूळ संस्कृत भाषेपासून निघालेली मराठी ही प्राकृत भाषा. कांही शब्द संस्कृत मधून आलेच आहेत कांही अपभ्रंशित असतील. दर पाच कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात, या निरनिराळ्या बोलीभाषेतू येणारे शब्द, तसेच आपल्या आसपास प्रचलित असलेल्या परभाषेतील शब्द, यामुळेच तर मराठी भाषेचे शब्दभांडार एवढे श्रीमंत झाले आहे.परभाषेची,परभाषेतील शब्दांची सरमिसळ अटळच आहे, आणि तीअसावीच.
आपल्या देशात भाषा-वार प्रांत रचना आहे. प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी आहे. पण सर्व भाषांचे लोक देशभर सर्वत्र आहेत.मराठी भाषिक लोकही असेच देशभरच नाही तर परदेशातही सर्वत्र पसरले आहेत, कांही पिढ्यांपासून स्थायिक झाले आहेत. जिथे जिथे आपले मराठी बांधव आहेत तिथे तिथे मराठी भाषा पोचत आहे, रूजत आहे.तिथे रसिक वाचक आहेत तसे प्रतिभावान लेखकही आहेत आणि त्यांच्या बोलण्यातच नाही तर लिहिण्यातही परभाषेची सरमिसळ असणारच. अशा शब्दांचा वापर त्यांच्या लिखाणात अगदी सहजपणे होतो. त्यांची भाषा, शैली त्यामुळे सहज सोपी वाटते मुद्दाम त्यासाठी मराठी प्रतिशब्द वापरण्यात कृत्रिमता येते,कधी तो शब्द थोडा बोजड वाटतो. मी स्वतःवरूनच सांगते. अगदी सुरुवातीला मी एक गोष्ट लिहिली.अभिप्राय विचारायला पुण्याला माझ्या वडिलांकडे पाठवली. त्या गोष्टीत ‘ तिने तिच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला ‘असं वाक्य होतं.माझ्या वडिलांनी फ्लॅट शब्द खोडून ‘ सदनिका ‘शब्द घातला होता. या गोष्टीतील पूर्ण पार्श्वभूमी इंदौरची होती. इथे ‘ सदनिका ‘ शब्द, अर्थ मध्यप्रदेशात कुणाला माहितीही नसेल, आवश्यक होता कां?पुण्यातील वाडे,मुंबईतील चाळी जाऊन तिथे ‘सोसायट्या’ आल्या त्यालाही पुष्कळ वर्षे लोटली आता सोसायटी शब्दाला मराठीत सामावून घ्यायचं कां मराठी प्रतिशब्दाचा अट्टाहास करायचा?
सरमिसळ किंवा परभाषेतील शब्दांची भेसळ केल्याने भाषेचे सौंदर्य कमी होते कां ?माझ्या मते फारसं नाही कारण मुळात आपल्या भाषेचे, लेखनाचे सौंदर्य कमी होईल असे लेखक कशाला करेल? भाषेच्या सौंदर्यीकरणात परभाषेतील शब्दांचे नक्की स्थान काय हे सांगणे अवघडच आहे. निश्चित दुय्यमच असेल पण या शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य नष्ट होणार नाही. अलंकारिक भाषारचनेत परभाषी शब्द चपखलपणे बसणारच नाही. परभाषेतील शब्द वापरले जातात ते मुख्यतः अर्थ वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी,.संवादातील सहजता वाढविण्यासाठी, तेव्हा भाषेच्या सौंदर्याला बाध येत नाही. निसर्गवर्णनांतील रंगछटांसाठी पीच,लव्हेंडर,लेमन वगैरे शब्द बरोबर नाही वाटणार पण नायक नायिकांचे कपडे, घरातील पडदे, अभ्रे यांच्या वर्णनात हे शब्द छान शोभतात.
शब्दांची सरमिसळ, परभाषेची भेसळ म्हटलं कीं मूळ भाषा शुद्ध रहात नाही हे खरं आहे .. शुद्ध भाषेचा आग्रह कांहीजण करतात आणि कटाक्षाने परभाषेतील शब्द टाळतात. हा प्रयत्न व आग्रह स्तुत्यच आहे पण तरी वाटतं लेखकाच्या द्रुष्टीने आशय वाचकांपर्यंत पोचणं हे शुध्दतेपेक्षा महत्त्वाचे आहे. अर्थात ही भेसळ प्रमाणाबाहेर नकोच. पण एकदा सरमिसळ मान्य केल्यावर त्याचे प्रमाण ठरविणार कोण?म्हणून शुद्ध भाषेचा आग्रह मान्य. आजकालची ‘हिंग्लिश ‘ भाषा, हे काय आहे?एक अशुद्ध भाषा की दोन भाषांचे मिश्रण? हे मिश्रण इतके जास्त आहे की ऐकतांना किंवा वाचतांना वाटतं की यांना कुठलीच भाषा नीट येत नाही. दोन्ही भाषांबद्दलचं अज्ञान उघड होईल इतकी शब्दांची भेसळ नसावी. एखाद्या भाषेचे आपले ज्ञान अपुरे आहे, किंवा शब्दसंपदा कमी आहे म्हणून दुसऱ्या भाषेतील शब्द घ्यावे लागू नयेत हे खरंच.
आजकाल अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे आपल्या सारख्या बहुभाषिक देशात सांस्कृतिक एकात्मता व देवाणघेवाण होण्यासाठी हे स्वागतार्ह आहेच. पण अनुवाद करणाऱ्यांना किती अवघड जाईल जर मूळ पुस्तक शुद्ध भाषेत नसेल तर. मला एखाद्या मराठी कादंबरीचा बंगालमधे अनुवाद करायचा असेल तर बंगाली चांगलं येणं पुरेसे आहे. पण मूळ कादंबरीत दुसऱ्या भाषांतील शब्द, वाक्प्रचार , म्हणी,यांची भेसळ असेल तर पंचाईत होईल किंवा अर्थाचा अनर्थ होईल.
परभाषेची सरमिसळअसावी का नसावी यावर दोन्ही बाजूंनी विचार करण्यासाठी मुद्दे आहेतच. भाषा आणि नद्या दोन्ही आपल्याला पूजनीय आहेत. भाषेची नदीशी तुलना मी आधीच केली आहे तीच पुढे वाढवून म्हणते असंख्य प्रवाहांना सामावून घेतल्याने गंगा मलिन बनते पण ती अपवित्र कधीच होत नाही. कुठेही ओंजळ भरून घेतली तरी ते गंगाजलच. तेच भाषेचंही,तिच्या शुध्दतेला बाध येत असला तरी शुचिता अबाधितच राहते. आपण नदीपेक्षा दोन नद्यांचा संगम जास्त पवित्र मानतो नाही कां?मग दोन भाषांचा संगम आपल्याला असाच वंदनीय कां नाही?एक उदाहरण देते सगळ्यांना माहिती असलेल्या एका गाण्याचं किंवा कवितेचं. हे गाणं संस्कृतमधे सुरु होते आणि ध्रुवपद संपताच मराठीचा प्रवाह त्यात मिसळतो आणि पुढे ध्रुवपद संस्कृत व कडवी मराठीत असंच ते गाणं पुढे जातं. गाणं आठवून पहा व सांगा हे तुम्हाला आपत्तिजनक वाटतं कां आवडतं? याला सरमिसळ म्हणायचं कां संगम हे तुम्हीच ठरवा.
गाणं, खरंतर स्तोत्र आहे….
जयोsस्तुते,श्रीमहन्मंगले,शिवास्पदे,शुभदे।
