सौ. विद्या चिडले.
सुंदर आकर्षक रंगाच्या फुलांनी बहरणारी ही वेल भारतात सर्वत्र आढळते. निळ्या व पांढऱ्या रंगाच्या मनमोहक फुलांनी नटणारी ही वेल आपल्या बागेत लावावी. अगदी सहज लागते. कुठल्याही प्रकारच्या मातीत उगवते. कुंडीत लावली तर पाण्याचा योग्य निचरा होईल ह्याची काळजी घ्यावी लागते. वेलीवरची फुलं तोडली नाही की तिथे शेंग लागते. ह्या शेंगेत पाच सहा बिया असतात. ही शेंग हिरवी असताना कधीच तोडू नये. वेलीवरच वाळू द्यावी. ती शेंग काही दिवसातच वाळली की पिवळी होते. त्यातील बिया काळ्या असतात. ह्या शेंगा कडक वाळल्या की कधी आपोआप तडकतात व वाळलेल्या बिया खाली पडतात. तिथून रोप उगवते. आपण ह्या वाळलेल्या बिया तोडून जपून ठेवाव्या व पावसाळ्यात पेराव्यात. साधारणतः पावसाळ्यात बी लगेच लागते व छान वाढते. श्रावण-भाद्रपद महिन्यात छान बहर येतो व आपण गौरी गणपतीला गोकर्णाची फुलं वाहू शकतो.
धार्मिकदृष्ट्या ह्या फुलांचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. विष्णूला, शनिदेवाला व गणपतीला तसेच नवरात्रात देवीला गोकर्णाची फुलं वाहतात. भारतातील विविध भागात विविध भाषांत वेगवेगळ्या नावाने ही वेल ओळखली जाते. अपराजिताची नावे अतिशय मनसंतोषी आहेत. पराजय दूर ठेवणारी म्हणून अपराजिता, गायीच्या कानाचा आकार आहे म्हणून गोकर्णी, अश्वाच्या खुरांसारखीपण दिसतात म्हणून अश्वखुरा, विष्णूला अतिशय प्रिय, आवडती फुलं म्हणून विष्णुप्रिया, विष्णुकांता, घरात संपन्नता आणते म्हणून धनलक्ष्मी, सकारात्मक उर्जा देणारी म्हणून खुशहाली, तर कुठे गिरिकर्णी, गिरिकर्णिका, शंखपुष्पी, काजुली, कोयल, कालिजार, आणि इंग्रजीत butterfly, pigeonwings अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या फुलांना Clitoria Ternatea असे शास्त्रीय नाव आहे.
आपल्या बागेत ही वेल नक्कीच लावावी. वास्तुशास्त्रानुसार ही वेल घराच्या उत्तरेस किंवा पूर्वेस किंवा इशान्येस म्हणजे उत्तरपूर्व भागात लावली तर घरात समृद्धी, संपन्नता वाढते तसेच मनःसौख्यही लाभते. आपणा सर्वांनाच परिचित असणारी ही वेल औषधीगुणांनी परिपूर्ण आहे. आरोग्यदायी असल्यामुळेच कदाचित जाणकारांनी, ऋषीतुल्य वैद्यांनी वास्तुशास्त्र व धर्मकार्यात गोकर्णाला विशेष स्थान देऊन तिचे महत्त्व वाढविले आहे. पांढऱ्या रंगाच्या फुलांमधे औषधीगुण जास्त आहेत.
ह्या वेलीची मुळं, फुलं, पानं बिया सर्वच औषधीगुणयुक्त आहेत. ह्यात जस्त, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, vitamin ‘A’ vitamin ‘C’ vitamin ‘E’ तसेच Anti-oxidants, Phytonutrients भरपूर प्रमाणात आहेत.
१] गोकर्णाची चार पाच फुलं पाण्यात उकळून चहा करतात. त्याने तरतरी येते.
२] मायग्रेनची समस्या असेल तर किंवा कुठल्याही प्रकारची डोकेदुखी असली तर अपराजिताची मुळं कानावर बांधतात. त्याने डोकेदुखी जाते.
३] खोकला दमा असेल तर फुलांचा काढा घेतात.
४] बिया भाजून त्याचे सेवन पोटदुखीवर फायदेशीर ठरते.
५] कान दुखत असेल तर ह्या वेलीच्या पानांचा लेप कानाच्या पाळीवर लावतात.
६] त्वचेवर घाव असेल तर पानाचा लेप लावतात त्याने इन्फेक्शन होत नाही. किटकदंशावरही लेप लावतात.
७] ताकात घालून मुळाचे सेवन केल्याने काविळीवर फायदा होतो.
८] मुळांचे भस्म लोण्यासोबत किंवा भाताच्या पाण्यात घेतल्यास किडनी स्टोनवर फायदा होतो.
९] फोड झाले असतील तर मुळांचा लेप लावतात.
१०] आवाज बसला असेल तर पाण्यात गोकर्णाची पाने उकळून त्या पाण्याने गार्गल करतात.
११] अनेक जुन्या व असाध्य आजारांवरही अपराजिता उपयुक्त ठरते.
१२] अँग्झायटी, स्ट्रेस यावर काढा उपयुक्त ठरतो. डिप्रेशन कमी होते.
१३] फुलं घालून उकळलेले पाणी डोळ्यांवर लावतात. त्याने डोळ्यांची आग कमी होते तसेच डोळ्यांची खाज जाते.
१४] दातांच्या दुखण्यावरही फुलांच्या पाण्याने फायदा होतो किंवा पाने वाटून दातांवर लावतात.
१५] फुलांच्या काढ्याने पाचनतंत्र सुचारू होते.
१६] सामान्य प्रसूतीसाठीही अपराजिताचा उपयोग करतात. मुळं कमरेभोवती बांधतात.
१७] टाँसिल्सवर गोकर्णाच्या पाण्याने गार्गल करतात.
१८] सांधेदुखी कमी होते.
१९] फायलेरियावर फायदा होतो.
२०] सापाचे विष उतरविण्यासाठी अपराजिताचा इलाज करतात.
२२] शरीरावरचे पांढरे डाग जातात.
२३] वात पित्त कफाचे संतुलन राखण्यास गोकर्ण उपयोगी ठरतो.
२४] फुलांमधे इम्युनिटी वाढवणारे गुणधर्म आहेत.
२५] तसेच ब्लड प्रेशर नियमित होते.
२६] केस गळती थांबते. केसांची चांगली वाढ होते. पांढरे केस कमी होतात.
२७] मासिक धर्म नियमित होतो. तसेच मासिक पाळीतील पोटदुखी जाते.
२८] थायराईडवर उपयुक्त आहे. हार्मोन्सचे संतुलन साधते.
२९] ज्वर कमी होण्यास मदत होते.
३०] गोकर्णाच्या फुलांचा काढा बुद्धिवर्धक आहे.
३१] गोकर्णाच्या काढ्याने कँसरची जोखीम कमी होते.
३२] गोकर्ण मृत पेशी दूर करून त्वचा चांगली करते.
३३] गोकर्णाच्या निळ्या फुलांचा फुड कलर म्हणून उपयोग करतात.
चार-पाच फुलं पाण्यात भिजत ठेवून ते पाणी पिणे किंवा उकळून गाळून ते पाणी पिणे अशा प्रकारे फुलांचा उपयोग करतात. बिया भाजून त्याचाही उपयोग प्लिहाविकार, युरिनसंबंधी आजार, मधुमेह, सांधेदुखी अशा अनेक विकारांवर होतो. संपूर्ण वेलीचा विविध प्रकारे उपयोग होत असतो. म्हणूनच अपराजिताला औषधीशास्त्रात खूप महत्त्व आहे.
शरीर स्वस्थ, निरोगी असेल तर मनस्वास्थ्यही चांगले राहते. म्हणूनच अपराजिताला पुजेअर्चेत मानाचे स्थान देऊन महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयास आहे.
गोकर्णाचे वर सांगितलेले अनेकानेक औषधी उपयोग असले तरी तज्ञांच्या, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच ह्या वनौषधींचा उपयोग करावा. औषधाची मात्रा, औषध घेण्याची पद्धत हे डाॅक्टरांची सल्ला घेऊनच ठरवावे. कारण कुठली ही वनौषधी शरीरोपयोगी असली तरी त्यांच्या उपयोगाचे वाईट परिणामही होतात.
सतत आजारी असणारा माणूस, गर्भवती स्त्रिया, बाळ अंगावर पीत असेल तर अशा स्त्रिया ह्या लोकांनी अपराजिताचा उपयोग करू नये. गोकर्णाच्या सेवनाने जुलाब होणे उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो.
सौ. विद्या चिडले.
बेंगळूरु
२५|२|२०२३.
