— रविंद्र कुलकर्णी, निवृत्त अधिक्षक अभियंता, महाजनको, मुंबई —
रविवार दिनांक १० एप्रिल २२ रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी नऊ वाजल्यापासूनच बंगलोरच्या रसिक मराठी जनांची पावले आपसूकच गांधीनगरमधील महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहाकडे वळू लागली. निमित्त होते महाराष्ट्र मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या अभिमान व योगदान पुरस्कार समारंभाचे. सकाळी ठीक ११ वाजता अभिमान व योगदान पुरस्काराचे या वर्षाचे विजेते अनुक्रमे उद्योगपती विक्रम किर्लोस्कर व श्रीमती पद्माताई टोळ यांचे सभागृहात आगमन झाले. कार्यक्रमाचे अतिशय सफाईदार सूत्र संचालन सौ. सुचित्रा खांडेकर यांनी केले.
सौ. रेवती कुलकर्णी यांनी पद्माताई टोळ यांचा परिचय करून देताना, त्यांच्या कला, क्रीडा, संगीत, समाजसेवा तसेच मंडळासाठी त्यांनी चतुरस्त्र सेवा देऊन केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.
सौ. स्मिता बर्वे यांनी पद्माताईंना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन केल्यानंतर आदरणीय विक्रमजी किर्लोस्कर यांच्या हस्ते पद्माताईंना योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बोलण्याचा मोह न आवरतां आल्याने ऐनवेळी पद्माताईंच्या तीन चार मैत्रिणींनी आपली भावनेने ओथंबलेली मनोगते व्यक्त करताना पद्माताईंचा जीवनपटच हळुवारपणे उलगडला. अर्थातच उत्तरादाखल केलेल्या भाषणात पद्माताईंनी वेळोवेळी मित्रमैत्रिणीनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला व यापुढेही मंडळासाठी काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
त्यानंतर अभिमान पुरस्कार विजेत्या उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांच्या बद्दल बोलताना श्री. अभय दीक्षित म्हणाले की खरेतर विक्रम सरांचा परिचय करून देण्याची गरजच नाही तरीही त्यांनी विक्रम किर्लोस्कर यांनी बंगलोरमधील औद्योगिक क्षेत्रातील केलेल्या आमूलाग्र बदलाचे थोडक्यात विवेचन केले.
सौ. शिल्पा श्रीखंडे यांच्या मानपत्र वाचनानंतर श्री पद्माकर जावडेकर यांच्या हस्ते विक्रम किर्लोस्कर यांना अभिमान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर श्री. अजित एदलाबादकर यांनी विक्रम किर्लोस्कर यांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. एदलाबादकर यांनी विचारलेल्या औद्योगिक तसेच वीज क्षेत्रातील विविध प्रश्नावर विक्रम सरांनी अतिशय प्रभावीपणे व ठाम मत प्रदर्शन केले. प्रेक्षकांमधून विचारल्या गेलेल्या प्रश्नांनाही विक्रम सरांनी समर्पक उत्तरे दिली. इंग्रजीतून चाललेली ही मुलाखत जवळ जवळ दीड तास चालली. पण त्यामुळेच बंगलोरमधील विविध औद्योगिक क्षेत्रातील अभियंते व तंत्रज्ञ यांना आणि पाॅवर सेक्टर मध्ये ३५ वर्षे काम केलेल्या माझ्या सारख्या अभियंत्याला ही मुलाखत म्हणजे एक पर्वणीच ठरली.
