ही अभिवाचन कार्यशाळा अतिशय माहितीपूर्ण व आशयघन झाली. वक्ते श्री. विघ्नेश जोशी जसे एक उत्तम कलाकार आहेत तसेच ते साहित्य संपन्न, प्रभावी वक्ते ही आहेत. असंख्य कविता, श्लोक, उतारे त्यांना मुखोद्गत आहेत. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला समर्पक संदर्भांची, विविध अनुभवांची व उत्तम सादरीकरणाची जोड होती.
या कार्यशाळेत आवाजाची फेक कशी असावी, त्यातील चढ-उतार, प्रसंगानुरूप आवाजातील बदल, विरामचिन्हांचे महत्त्व, स्पष्ट उच्चार व लेखनातील भाव श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे कसा पोहोचला पाहिजे यावर मार्गदर्शन मिळाले. लाटानुप्रासाच्या सरावाने मजा आली.
एक उत्कृष्ट कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणीचे मनःपूर्वक आभार!!
अरुंधती वझे
महाराष्ट्र मंडळातील अभिवाचन कार्य शाळा आमच्या सर्वांच्या दृष्टीने खरंच उपयुक्त ठरली.
श्रीयुत विघ्नेश सरांनी अभिवाचनाची मूलभूत माहिती आणि त्याचे तंत्र समजावून सांगितले. अभिवाचन हे केवळ वाचन नसून श्रोत्यांच्या मनात त्या साहित्याचे दृश्य उभे करण्याचे एक संवाद कौशल्य आहे हे त्यांच्या कार्यशाळेतून पटले.
साहित्यातील भावनेनुसार आवाजाचा पोत गती आणि आघात बदलणे अक्षरांचा उच्चार स्पष्ट व अचूक असायला हवा हे आमच्याकडून प्रात्यक्षिकाद्वारे करवून घेतले. अभिवाचन करताना चेहऱ्यावरील अभिव्यक्तीचा वापर कसा करावा हे शिकवले. वाचन करण्यापूर्वी मजकुराचे किमान दोन-तीन वेळा शांतपणे वाचन करावे व अर्थ समजून घ्यावा. दृष्टी संपर्क असणे खूप महत्त्वाचे असते. बसून किंवा उभे राहून वाचन करताना हाताचे नियंत्रित हावभाव व गती सांभाळणे महत्त्वाचे.
आवाजाचा पोत सुधारण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे सुद्धा त्यांनी सांगितले.
एकंदरीत अभिवाचन कार्यशाळेमुळे खूप काही शिकण्यास मिळाले.
महाराष्ट्र मंडळ व विघ्नेश जोशी सरांचे खूप धन्यवाद
जयश्री पोतनीस
महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेली अभिवाचन कार्यशाळा हा एक स्तुत्य उपक्रम होता. विघ्नेश जोशी ह्यांचे खूपच छान मार्गदर्शन लाभले. भाषा, उच्चार आणि त्याच बरोबर आशय आणि अभिनय हे अभिवाचन करण्यासाठी किती महत्वाचे आहे हे आज कळले आणि हे तंत्र अवगत करण्यासाठी सराव किती महत्वाचा आहे, हे देखील कळले. विघ्नेशजीनी खुमासदार किस्से सांगून कार्यशाळेची रंगत अजूनच वाढवली. अभिवाचनाचा प्रत्यक्ष अनुभव बरच काही शिकवून गेला. भविष्यात अशा उपक्रमात सहभागी होण्यास आवडेल. उत्तम नियोजनाबद्दल महाराष्ट्र मंडळाचे पुन्हा एकदा धन्यवाद!
नीरज


