अभिप्राय..महाराष्ट्र मंडळ संस्थापक दिन उत्सव
३० मार्च, २०२५
ह्या वर्षीचा (२०२५ )संस्थापक दिन गुढीपाडव्याच्या दिवशी आल्याने, कार्यक्रम नेहमीप्रमाणे सकाळी न करता, संध्याकाळी सव्वा पाच वाजता आयोजित केला होता. मराठी नवीन वर्षाची सुरुवात अशा सुंदर कार्यक्रमाने झाल्यामुळे अर्थातच उपस्थिती उत्तम होती आणि सर्वांचा उत्साह व आनंद द्विगुणित झाला होता. मंडळाच्या आवारात प्रवेश करताच, सुंदर रांगोळी आणि गुढीने सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर, चविष्ट पन्ह्याचा आस्वाद घेऊन, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद घेऊन, सर्वजण वातानुकूलित सभागृहात स्थानापन्न झाले.
कलात्मक रीतीने सजवलेल्या स्टेजवरील गुढी पाहण्यात दंग असतांनाच मराठमोळा पेहेराव केलेल्या १२-१४ जणांच्या (त्यात स्त्रिया व पुरुष दोघेही सामील होते) ‘ढोल -ताशाच्या पथकाने सभागृहात प्रवेश केला. भगवा झेंडा घेऊन ढोलाच्या तालावर पदन्यास करणाऱ्या तरुणाने त्यांचे नेतृत्व केले होते.. सुमारे १५ मिनिटे, ढोल, ताशा आणि झांजेच्या दमदार आवाजाने सभागृह भरून गेले होते.
कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि पुरस्कार विजेते, ह्यांनी दीप प्रज्वलन केल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्र मंडळ बेंगळूरु ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विनायक कवठेकर ह्यांनी उपस्थित असलेले मान्यवर आणि सर्व प्रेक्षकांचे स्वागत केले. आपल्या भाषणात, त्यांनी मंडळाबद्दल काही माहितीही दिली. इ स १९२० मध्ये ‘मराठा तितुका मेळवावा’ ह्या ध्येयाने प्रेरित होऊन, स्व.बापूराव जोशी ह्यांनी एका लहानशा जागेत मंडळ सुरू केले. मंडळाचा विस्तार होत गेला तेव्हा १९५८ मध्ये ट्रस्टची स्थापना झाली. इ स २००७ मध्ये संस्थापक दिवस साजरा करावा आणि त्या दिवशी मंडळासाठी अविरत काम केलेल्या एका व्यक्तीस योगदान पुरस्कार आणि कोणत्याही क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मराठी व्यक्तीस अभिमान पुरस्काराने सन्मानित करावे असा निर्णय घेण्यात आला आणि लगेचच तो अमलात आणण्यात आला, इत्यादी माहिती दिली.
ह्यानंतर, सूत्र संचालिका सौ. सुचित्रा खांडेकर ह्यांनी योगदान पुरस्काराच्या मानकरी, सौ. ऋता दीक्षित ह्यांची ओळख करून दिली. त्या M. Sc.Zoology पदवीविभूषित आहेत. इ. स. १९७७ पासून त्या मंडळाच्या सदस्य आहेत. मंडळाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी प्रकाशयोजना, दिग्दर्शन ते भूमिका साकारण्यापर्यंत अनेक प्रकाराने भाग घेतला आहे. मंडळाच्या इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये त्या सदैव सक्रिय असतात. गेली कित्येक वर्षे मंडळाच्या वाचनालयाची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. तसेच इनर व्हील क्लब नॉर्थ आणि स्नेहधारा ह्या सामाजिक संस्थांमध्येही त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. श्रीमती शिल्पा रायकर ह्यांनी त्यांना दिलेले मानपत्र वाचून दाखवल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष श्री कवठेकर, मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार संगोराम ह्यांच्या हस्ते श्रीफळ, शाल, हार, भेटवस्तू, मानपत्र आणि फेटा देऊन, त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती ऋता आपल्या भाषणात म्हणाल्या की ह्या सन्मानाने त्या अतिशय भारावून गेल्या आहेत. त्यांचे आजोबा कलकत्त्यातील महाराष्ट्र मंडळाचे सनदी सदस्य (Charter Member) होते, त्यामुळे त्या महाराष्ट्र मंडळाशी सहजपणे जोडल्या गेल्या. मंडळात विविध प्रकारचे काम करताना ज्या सभासदांनी त्यांना उत्तेजन दिले त्यांचा आवर्जून उल्लेख करून, त्यांच्याबरोबर काम केलेल्या सर्वांचेही त्यांनी आभार मानले. ह्या निमित्ताने श्रीमती ऋता दीक्षित ह्यांनी मंडळाला १ लाख रुपयांची देणगी दिली.
त्यानंतर, सूत्र संचालिका सौ. सुचित्रा खांडेकर ह्यांनी अभिमान पुरस्काराचे मानकरी, श्रीयुत जितेंद्र जाधव ह्यांची ओळख करून दिली. श्रीयुत जाधव ह्यांनी संरक्षण क्षेत्रात महत्वाच्या प्रणालींवर काम केले आहे. ते CSIR- NAL चे संचालक होते. L.C.A.- लाईट कॉम्बॅट एयरक्राफ्ट – तेजसच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. सध्या ते A. D. A. चे म्हणजेच एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे डिरेक्टर जनरल आहेत. हा विभाग भारताच्या अत्यंत प्रगत अशा लढाऊ विमानांशी सम्बधित संशोधन करत आहे. त्यांना दिलेले मानपत्र वाचल्यानंतर श्रीफळ, शाल, हार, भेटवस्तू आणि फेटा देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला.
उत्तरादाखल दिलेल्या भाषणात त्यांनी त्यांच्या कामाच्या स्वरूपाबद्दल माहिती दिली. त्यानंतर श्री. अजित एदलाबादकर ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीत, विचारलेल्या सर्व तांत्रिक-यांत्रिक प्रश्नांची उत्तरेही अतिशय समर्पकपणे आणि सोप्या शब्दात स्पष्टीकरण सांगून दिली. उपस्थितांमधील काही जाणकारांनी, विमानाच्या जनरेशन मधला फरक, इंजिन, नवी लढाऊ विमाने पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत का, अशांसारखे तांत्रिक प्रश्न विचारले, तर काही जिज्ञासूंनी हरवलेल्या विमानाचा शोध, त्याची कारणे, विमानामध्ये A.I. चा वापर किती व कसा केला जातो, इत्यादी अनेक प्रश्न विचारून आपल्या ज्ञानात भर घातली. श्री. जाधव ह्यांनी, भारताचे पूर्व राष्ट्रपती स्व.अब्दुल कलाम हे त्यांचे ‘आदर्श’ होते आणि एका विशिष्ट प्रोजेक्टवर संशोधन चालू असताना, विमानतळावरून थेट त्यांच्या लॅबमध्ये प्रोजेक्ट कसा प्रोग्रेस करत आहे हे पाहण्यासाठी ते येत असत असे अभिमानाने सांगितले.
सर्वात शेवटी, भारताकडे असलेली संरक्षण सामग्री, आपल्या शत्रू राष्ट्रांशी टक्कर द्यायला पुरेशी आहे का, ह्या प्रश्नाला उत्तर देताना श्री जाधव म्हणाले कि, जनतेने वर्तमानपत्रात वाचलेल्या आकडेवारीवर विश्वास ठेवून तुलना न करता, भारताच्या प्रगत तंत्रज्ञानावर आणि युद्धशास्त्रातील प्राविण्यावर विश्वास ठेवावा. तसेच, भारत सुरक्षित आहे आणि स्वतःचे रक्षण करण्यास समर्थ आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
प्रश्नोत्तरांचा हा कार्यक्रम अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण झाला.
त्यानंतर, मंडळाचे अध्यक्ष श्री. ओंकार संगोराम ह्यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले, आणि निवृत्तीनंतर मंडळात काम करण्याची श्री जाधव ह्यांची इच्छा नमूद करून ठेवत आहोत असे निवेदन केले.
शेवटी, सूत्र संचालिकेनी मंडळात होणाऱ्या आगामी कार्यक्रमांविषयी निवेदन केले आणि अत्यंत नेटकेपणाने प्रस्तुत केलेला हा कार्यक्रम सम्पन्न झाला. अखेरीस, खेळीमेळीच्या वातावरणात चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्या नंतर, उपस्थित मंडळी पांगली.
श्री. जावडेकर, श्री. भिडे, श्री. देशपांडे, श्री.दीक्षित इ. अभिमान व योगदान पुरस्काराने गौरवलेले मानकरी, तसेच स्व. बापूराव जोशी ह्यांचे नातेवाईक ह्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शान वाढली. आयोजकांनी वेळेचे नियोजन उत्तम केले होते, त्यामुळे कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन, वेळेत संपला, हेही नमूद करावेसे वाटते. त्याबद्दल त्यांचे कौतुक.
तारा गोपीनाथ
