सनविवि अभिप्राय,इ स न वि वि - एप्रिल २०२५ अभिप्राय…संस्थापक दिन— अभिमान व योगदान पुरस्कार

अभिप्राय…संस्थापक दिन— अभिमान व योगदान पुरस्कार

नमस्कार मंडळी,

दिनांक ३० मार्च २०२५ रोजी, संध्याकाळी सव्वापाच वाजता बेंगळूरु महाराष्ट्र मंडळात संस्थापक दिन  मोठ्या दिमाखात पार पडला. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर परंपरेनुसार श्रीसत्यनारायणाची पूजा झाली व सर्वांना प्रसादाचा लाभ मिळाला.

त्यानंतर मंडळाच्या ‘महानाद‘ ढोल ताशा पथकाने अतिशय उत्साहाने कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

छत्रपती शिवाजी  आणि संभाजी महाराजांचा जयघोष करून गणपती बाप्पाच्या स्मरणाने आपले ढोल-ताशा-झांजा कौशल्य सादर केले. त्यानंतर श्रीमती सुचित्रा खांडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून योगदान व अभिमान पुरस्कारांबाबत माहिती तथा त्यांचे मानकरी यांचेही स्वागत केले. 

१९२० साली, कै.श्री. बापूराव जोशी यांनी सुरु केलेल्या या मंडळास १०५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.

ह्या वर्षीचे अभिमान पुरस्काराचे मानकरी श्री जितेंद्र जाधव व योगदान पुरस्काराच्या मानकरी श्रीमती ॠता दीक्षित यांचे अनुक्रमे महाराष्ट्र मंडळ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक कवठेकर व मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार संगोराम ह्यांनी मानाने स्वागत करून, त्यांना व्यासपीठावर स्थानापन्न केले. 

ह्या पुरस्काराची परंपरा २००७ सालापासून अमलात आणली जात आहे.

सर्वप्रथम श्री संगोराम ह्यांनी श्रीमती दीक्षित  यांचा मंडळाचे गौरव मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कार्याचा कौतुकाने आढावा घेतला. श्रीमती दीक्षित ह्यांनी त्यांना मंडळात लाभलेल्या सहकार्याचा, मदतीचा व संधींचा विशेष उल्लेख करून कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तसेच त्यांनी मंडळास धनादेशाची मौल्यवान भेट देऊन उपकृत केले.

ह्या सोहळ्याचे अभिमान पुरस्कार मिळालेले मानकरी श्री.जितेंद्र जाधव ह्यांचा महाराष्ट्र विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.विनायक कवठेकर ह्यांनी गौरव मानपत्र व शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. लगेचच श्री.जाधव ह्यांच्या उल्लेखनीय कतृत्वाचा संपूर्ण आढावा घेऊन अभिमान वाटावा असा गौरव व्यक्त केला. त्यानंतर श्री.जाधव ह्यांनी त्यांना मिळालेल्या सुखद आनंदाचा गहिवरून उल्लेख करून मंडळाचे मनापासून आभार मानले. श्री.अजित एदलाबादकर ह्यांनी श्री.जाधव ह्यांच्याशी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामाविषयी सखोल व विशेष चर्चा केली. ह्या मुलाखतीतून त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी केले. ह्यातून हवाई तंत्रज्ञानाची माहिती विस्तारीतपणे प्रस्तुत केली. त्यांच्या कार्याविषयी प्रश्नोत्तरेही झाली. त्यामुळे कार्यक्रम अधिक रंजक व बोधप्रद झाला. 

शेवटी श्री.संगोराम ह्यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालक श्रीमती सुचित्रा खांडेकर ह्यांनी योग्य प्रकारे पुढील उपक्रमांचा उल्लेख करून कार्यक्रमाची सांगता केली. 

बेंगळूरु महाराष्ट्र मंडळात संयोजकांनी, मराठी व महाराष्ट्रीयन मानकऱ्यांचा केलेला कौतुक सोहळा संस्मरणीय झाला.  

                                                            —- नंदिनी रांजेकर

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *